'जंजीर'चं उत्तरायुष्यातलं रूप

पोलिस विभागासारख्या संवेदनशील खात्यात प्रामाणिकपणे काम करत आलेले डी.सी.पी. अनंत श्रीवास्तव यांना प्रवाहाच्या उलट दिशेने पोहून एका क्षणी थकायला होतं.
 amitabh bachchan
amitabh bachchansakal
Summary

पोलिस विभागासारख्या संवेदनशील खात्यात प्रामाणिकपणे काम करत आलेले डी.सी.पी. अनंत श्रीवास्तव यांना प्रवाहाच्या उलट दिशेने पोहून एका क्षणी थकायला होतं.

निवृत्तीच्या अगदी जवळ आलेला डी.सी.पी. दर्जाचा पोलिस अधिकारी अनंत श्रीवास्तवची भूमिका ‘खाकी’ चित्रपटात अमिताभकडे आली होती. ‘घायल’, ‘दामिनी’, ‘अंदाज अपना अपना’, ‘लिजेंड ऑफ भगतसिंग’ असे वैविध्यपूर्ण यशस्वी चित्रपट गाठीशी असलेल्या राजकुमार संतोषींच्या दिग्दर्शनाचा स्पर्श लाभलेला ‘खाकी’ २००४ मध्ये आलेला एक दर्जेदार चित्रपट होता. अमिताभनं त्याच्या दीर्घ कारकीर्दीत अनेकदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका वठविल्या आहेत. गोविंद निहलानींच्या ‘देव’मधील पोलिस अधिकारी वास्तवतेच्या अधिक जवळचा आणि विश्वसनीय होता. पण, राजकुमार संतोषींच्या ‘खाकी’मधील अमिताभने रंगवलेला पोलिस अधिकारी माझ्या मते सर्वोत्कृष्ट आहे.

पोलिस विभागासारख्या संवेदनशील खात्यात प्रामाणिकपणे काम करत आलेले डी.सी.पी. अनंत श्रीवास्तव यांना प्रवाहाच्या उलट दिशेने पोहून एका क्षणी थकायला होतं. ते केवळ त्यांच्या आत्मबळाच्या जोरावर तग धरून असतात.

उतारवयातील शारीरिक मर्यादांमुळे त्यांचा संघर्ष अधिक तीव्र होतो आणि त्यांची पूर्ण भिस्त आता मानसिक कणखरतेच्या एकमेव खांबावर येऊन पडते. निष्ठेनं कर्तव्य बजावण्याच्या नादात कुटुंबाकडं आपण लक्ष देऊ शकलो नाही हा अपराधी भाव निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्यांना अधिकच जाणवू लागतो. विभागातील भ्रष्ट वहिवाटीने जायचं नाकारल्यामुळे पदोन्नतीत अडथळे येतात आणि निवृत्तीपूर्वीच कारकीर्द जणू काही थिजून जाते. अशात कर्तव्यनिष्ठेला आव्हान देणारी मोहीम पुढ्यात येते आणि शरीरातील उरलासुरला उत्साह, तसंच कमजोर पडू पाहत असलेलं मानसिक बळ उचल खातं आणि पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे डी.सी.पी. अनंत ते आव्हान स्वीकारतात.

चंदनगड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आय.एस.आय. एजंट अन्सारीला (अतुल कुळकर्णी) मुंबईला आणून न्यायालयासमोर हजर करण्याची ही कामगिरी असते. ‘सर्वगुणसंपन्न’ वरिष्ठ निरीक्षक अक्षयकुमार, पोलिसात नवखा असलेला निरीक्षक तुषार कपूर, शिपाई कमलेश सावंत आणि डी. संतोष असा मुंबईकर पोलिसांचा चमू सोबतीला असतो. त्या आधी झालेल्या पहिल्या प्रयत्नात दहशतवादी हल्ल्यात आठ सदस्यांची पोलिस टीम मारली गेलेली असते. ही कामगिरी जिवाच्या जोखमीची असते. बंदुका, दारूगोळा आणि बुलेटप्रूफ जॅकेट सर्वच बाबतीत असलेलं सरकारी तुटपुंजेपण सोबतीला घेऊन, डी.सी.पी. अनंत यांचा अनुभव आणि धाडसाच्या भरवशावर ही टीम आपल्या मिशनवर निघते. असे प्रसंग भारतासारख्या विकसनशील देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नित्याचेच असतात. या थरारक प्रवासात अक्षयकुमारची बहादुरी, त्याची मनोरंजक अदा मन जिंकून घेते.

अक्षयकुमारच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम भूमिका असावी. अजय देवगण या चित्रपटात पोलिस खात्यातून कमी केला गेलेला, गुन्हेगारी मानसिकता असलेला खलनायक बनला होता. संताप आणला होता त्याने. अमिताभसमोर हे दोघेही तगडे तरुण शोभून दिसले होते. सौंदर्यवती ऐश्वर्या रायनं तिच्या नकारात्मक भूमिकेत घायाळ करून सोडलं होतं. एका छोट्या भूमिकेत आपला पोलिस शिपाई असलेला नवरा कर्तव्यावर शहीद झाल्याचं कळल्यानंतर कमालीचा अंडरप्ले साकारणारी अश्विनी काळसेकर लक्षात राहून जाते. अर्थातच, पूर्ण वेळ अमिताभ असलेल्या या सिनेमात एका वयस्क, कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या सर्व छटा अमिताभने दाखविल्या होत्या. अतुल कुळकर्णीने साकारलेला डॉ. अन्सारीदेखील प्रभावी होता. मोहिमेवर निघण्यापूर्वी त्याने टीमला केलेल्या छोट्याशा संबोधनाच्या वेळी अमिताभ नव्हे, तर एक प्रगल्भ पोलिस अधिकारी आपण पाहत असतो. ‘‘हम जिस दुश्मन का सामना करने जा रहे है, उसका कोई नाम नही, ना चेहरा. हमे ये नही पता के वो कितने है, लेकीन ये पता है की बहोत सारे है. उनके पास हथियार कौन कौनसे होंगे नही पता; लेकीन वो हमसे बेहतर होंगे ये पता है. वो कब, कहाँ, कैसे हमपर वार करेंगे नही पता, लेकीन वो वार करेंगे ये पता है.’’ या व्यावसायिक संबोधनातून ही व्यक्ती आयुष्यभर हेच काम करत असावी, अशी अमिताभची देहबोली दिसून पडली होती.

मोहिमेचा प्रमुख आणि वयाने ज्येष्ठ, अशा दोन्ही अंगाने अमिताभने रंगवलेला पोलिस अधिकारी हिंदी चित्रपटांमध्ये अजून तरी दिसला नाही. चंदनगडवरून अतिरेक्याला घेऊन निघालेला ताफा मुख्य रस्ता बंद असल्यामुळे तीन-चार किलोमीटर आडवाटेने निघतो आणि एका गावच्या बैल बाजारातील गर्दीत फसतो. त्या क्षणी वेशांतर केलेला अजय देवगण नजरेस पडताच अमिताभ धावतच त्याचा पाठलाग करतो. काही अंतरावर त्याला धाप लागते, दमा उमळतो; दम्याची ढास लागल्यामुळे होणारी जिवाची घुसमट, आरोपी हातातून निसटल्याचं दुःख आणि आता वयामुळे आलेल्या मर्यादांची जाणीव... इतके सगळे भाव जणू काही अमिताभच्या चेहऱ्यावर वाचून घ्यावेत इतके स्पष्ट, इतके नैसर्गिक.

पुढे पुन्हा आडवळणावरील एका जुनाट बंगल्यात अजय देवगणची टोळी पोलिस पार्टीला घेरते. देवगण जुनी खुन्नस काढण्यासाठी अमिताभच्या टीममधील पोलिस शिपायांना त्याला थप्पड मारण्यास भाग पाडतो, त्या वेळी अमिताभच्या चेहऱ्यावरील अपमान आणि उद्विग्नतेचा भाव... अप्रतिम. अशाही स्थितीत ‘तुफान ही फैसला करेगा रोशनी का, दिया वो जलेगा जिसमे दम हो’ हा डायलॉग... केवळ बघत राहावं. त्यापूर्वी एका तणावपूर्ण क्षणी बंडखोरीवर उतरलेल्या अक्षयकुमारला आपण मोहिमेचे प्रमुख असल्याची जाणीव करून देणारी कणखरता... बिनतोड. याशिवाय रस्त्यात आडव्या आलेल्या धर्मांध जमावाला नियंत्रित करतानाचे संवाद, मार्गातील एका गावच्या एस.पी.ला कर्तव्याची म्हणजेच ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ ह्या ब्रीदाची आठवण करून देणारं बौद्धिक, अगणित संकटं अंगावर घेऊन वाचवत आणलेला आरोपी हॉस्पिटलच्या दारातच प्राण सोडतो तेव्हा अमिताभने दाखवलेली जिवाची तगमग अप्रतिमच. पण, त्याचं कौतुक करावं, की अन्सारीला जिवंत परत आणण्याचं वचन मोडल्याबद्दल त्याच्या वृद्ध आईने लगावलेली थप्पड झेलल्यावरची अमिताभची अदाकारी बघावी, गोंधळ उडून जातो. पाठोपाठ येणाऱ्या अमिताभमय प्रसंगात, हे घेऊ की ते घेऊ असं होऊन जातं. राजकीय नेते, पोलिस, सामान्य जनता आणि मीडिया ह्या सगळ्याच घटकांना आरसा दाखविणारा ‘सस्पेन्स थ्रीलर’ होता ‘खाकी’... आणि हा आरसा धरला होता खुद्द अमिताभने. ‘जंजीर’चा ‘अँग्री यंग इन्स्पेक्टर’ म्हातारपणी कसा राहिला असता, त्याचं उत्तर ‘खाकी’तल्या ‘अँग्री ओल्ड बट कन्टेन्ट’ डी.सी.पी.कडून मिळालं होतं. अमिताभच्या अंगी असलेल्या अफाट प्रतिभेचा उपयोग ज्या फार थोड्या सिनेमांत खऱ्या अर्थाने झाला, त्यांत ‘खाकी’चा सामावेश निश्चित.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com