

Geopolitics and International Relations
esakal
भूगोलाचा वापर करून सत्ता कशी उदयाला येते आणि मग ती आपल्या फायद्यांसाठी भौगोलिक मर्यादांचा वापर कसा करते, याचा अभ्यास म्हणजे भू-राजकारण. त्याच्या अभ्यासाने देशांमधले मैत्री करार, युद्धं, व्यापारी मार्गांची रचना, तंत्रज्ञानातल्या कुरघोड्या यांसारख्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो. जसजसं तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं तसतसं राष्ट्रांच्या भौगोलिक स्थानाबरोबरच सायबर वॉरफेअर, एआय, लोकसंख्या आणि स्थलांतर यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार भू-राजकारणात होऊ लागला.
सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे बातम्यांमध्ये किंवा टीव्हीवरच्या चर्चांमध्ये हमखास ऐकू येणारा शब्द म्हणजे जिओ-पॉलिटिक्स किंवा भू-राजकारण. पण ते तर दूर कुठेतरी चालतं, ते का समजून घ्यायचं? त्याचा रोजच्या जीवनाशी काय संबंध? असं आपल्याला वाटतं. पण आपल्या गाडीतल्या पेट्रोलची किंमत युक्रेन युद्धावर ठरते. आपल्या स्मार्टफोनमधल्या चिप्स तैवान सुरक्षित असेल तरच मिळतात. आपल्या डेटाची सुरक्षा अमेरिका आणि चीनमधल्या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेवर अवलंबून असते. आपल्या नोकरीचं भवितव्य भारत जागतिक व्यापारातल्या गुंतागुंती कशा सोडवतो यावर अवलंबून असतं. त्यामुळे खरंतर भू-राजकारण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.