घर से निकलते ही...

कसं होतं ना...कुणाला सांगायलासुद्धा जरा अवघडच असायचं एकेकाळी. जास्त दूरची गोष्ट नाही. अवघ्या चाळीसेक वर्षांपूर्वीची. विशेषत: विद्यार्थ्यांना कॉलेजात-क्लासला वगैरे जाताना पायी पायी किंवा सायकलवरच जावं लागायचं. स्कूटर किंवा बाईकचा जमानाच नव्हता तो.
ghar se nikalte hi song from papa kahte hain udit narayan
ghar se nikalte hi song from papa kahte hain udit narayanSakal

- डॉ. कैलास कमोद

घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही

रस्ते में है उस का घर

कल सुबह देखा तो बाल बनाती वो

खिड़की में आई नज़र

कसं होतं ना...कुणाला सांगायलासुद्धा जरा अवघडच असायचं एकेकाळी. जास्त दूरची गोष्ट नाही. अवघ्या चाळीसेक वर्षांपूर्वीची. विशेषत: विद्यार्थ्यांना कॉलेजात-क्लासला वगैरे जाताना पायी पायी किंवा सायकलवरच जावं लागायचं. स्कूटर किंवा बाईकचा जमानाच नव्हता तो.

मग कार वगैरेचं स्वप्नसुद्धा कुणी पाहत नसायचं. ...तर अशा काळी पायी पायी रेंगाळत शाळा-कॅालेज-क्लासला जाताना-येताना किंवा अगदी ‘हेतुपूर्वक’ एखाद्या वाटेवरून चालताना एखाद्या घराच्या खिडकीत, सज्जात ‘ती’ दिसायची.

कधी ओझरती, तर कधी स्थिरपणे दिसेल अशी. मग तिची ‘ती’ विशिष्ट वेळ साधून त्या विशिष्ट वाटेनं दररोज ‘फेरी’ सुरू व्हायची. ही गोष्ट तिच्या क्वचित् लक्षात येत नसे. मात्र, बहुतेक वेळा लक्षात येत असायचीच.

मग आपले लांब केस खांद्यावरून पुढं घेऊन ते फणीनं विंचरून त्यांची वेणी बांधण्याच्या निमित्तानं ‘ती’सुद्धा बरोब्बर मुहूर्त साधून रोज खिडकीत उभी राहायची. तो दिसला की त्याच्याकडं पाहत कचकन् नाक मुरडून आत घरात निघून जायची अन् खूप दिवसांनंतर एखादं पुसटसं ‘स्माईल फेकून’ ती अंतर्धान पावत असायची.

महिनोन् महिने केवळ हाच कार्यक्रम सुरू असायचा. मग एखाद्या दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुटीत ती खिडकीतून गायब व्हायची. सुटी संपल्यावर परत खिडकीत ती कधीतरीच दिसायची...पण गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घेऊनच. संपलं!

आता एकतर ‘मुकेश के दर्दभरे नगमें’ गात रडायचं...नाहीतर ‘दुसरी खिडकी’ शोधायची. इतकाच काय तो रोमान्स आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवलेला असेल. अशा या दूरस्थ ‘रोमान्सवाल्या रोमिओं’च्या मनःस्थितीचं मोठं मजेशीर वर्णन गीतकार जावेद अख्तर यांनी या गाण्यात केलं आहे. ते वर्णनच आज जरा पुन्हा अनुभवू या.

मासूम चेहेरा, नीची निगाहें

भोली सी लड़की, भोली अदाएँ

ना अप्सरा है, ना वो परी है

लेकिन ये उस की जादूगरी है

दीवाना कर दे वो, इक रंग भर दे वो

शरमा के देखे जिधर

घर से निकलते ही...

तिला पहिल्यांदा पाहिल्यावर मला माझा श्वास जरासा थबकल्यासारखा वाटला. मग त्या गल्लीच्या वाटेवरून माझं घिरट्या घालणं सुरू झालं. कधी पायी, तर कधी सायकलवरून. सायकलच्या कॅरिअरला मागं वह्या-पुस्तक अडकवून.

हो! तिला कळायला पाहिजे की मी सायकल चांगली चालवतो आणि कॅालेजात शिकतोपण! अहो, काय सांगू...नाना तऱ्हा केल्या. माझी तिच्याकडं ओढ आहे. मी तिच्या प्रेमात पडलो आहे याचा तिलाच अजून सुगावासुद्धा नाही. ही अशी एकेरी वाहतूक किती दिवस चालणार. मलाच प्रश्न पडतो.

एखाद्या दोस्ताला मनातली ही भडभड सांगितली; पण दोस्त सगळे बिनकामाचे निघाले. जवळचे दोस्तही त्या प्रकरणापुरते वैरी बनले. मला मदत करण्याऐवजी माझीच चेष्टा करू लागले.

करता हूँ उस के घर के मैं फेरे

हँसने लगे है अब दोस्त मेरे

सच कह रहा हूँ, उस की कसम है

मैं फिर भी खुश हूँ, बस एक ग़म है

जिसे प्यार करता हूँ, मैं जिस पे मरता हूँ

उस को नही है खबर

घर से निकलते ही...

कधीतरी वाटेत भेटली तर तिची वाट अडवून ‘तुझ्या मनात काय आहे’ असं विचारायचं, असं मी माझ्या मनाशी पक्कं ठरवलं होतं. रोज मनाशी वाक्यंही जुळवत होतो. एक संधी आली. मेन रोडवर एकदा रस्त्याच्या कडेनं समोरून येताना ती दिसली. नजर खाली रस्त्याकडं झुकवून माझ्या दिशेनं येत होती.

रस्त्यावर वर्दळपण तशी कमीच होती. माझ्याजवळ येताच तिनं धीटपणे नजर वर उचलली...अन् माझी नजर खाली रस्त्याकडं वळली. नाही झालं धाडस बोलायचं. तोंडातून शब्द फुटायचं तर राहू द्याच; पण नजरसुद्धा मी वर उचलू शकलो नाही.

ती सरळ निघून गेली. संधी वाया गेली. आता बसलोय हात चोळत. तिची कुणीएक मैत्रीण आहे असं समजलं. मग तिच्या मैत्रिणीलाही सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा कुठं तरी भेटावं अशी इच्छा व्यक्त केली; पण कशाचं काय...संधी हुकलीच होती.

लड़की है जैसे कोई पहेली

कल जो मिली मुझ को उस की सहेली

मैं ने कहा उस को, जा के ये कहना

अच्छा नही है, यूँ दूर रहना

कल शाम निकले वो, घर से टहलने को

मिलना जो चाहे अगर

घर से निकलते ही...

अलीकडंच समजलं आहे की, आता ती या गावात नसते. गाव सोडून गेली आहे. अर्थात् लग्न होऊनच गेली असणार. हे गाव आता मला सुनसान वाटत आहे. या गावात आता मला काही रस उरलेला नाही.

सत्तरचं दशक किंवा त्याआधीचा काळ ज्यांनी अनुभवला ते लोक आता साठी-सत्तरीत आहेत. त्यातले पुष्कळसे ठणठणीत स्मरणशक्तीनिशी हयात आहेत. त्यांनी ही गंमत अनुभवली आहे. आज ती सांगायला काही हरकत नसावी कुणाची.

जावेद अख्तर यांनी ती गंमत गद्यासारखी पद्यरचना करत उतरवली आहे ‘पापा कहते है’ या सिनेमातल्या या गाण्यातून. हा सिनेमा आहे १९९६ मधला.

खरं तर नव्वदच्या दशकापासून काळ खूप बदलला आहे. तरुणाईमध्ये दोन्ही बाजूंनी चांगली धिटाई आलेली आहे. माना खाली घालणं थांबलेलं आहे...पण हरकत नाही. कुणी तरी केव्हा ना केव्हा मागच्या पिढीची अशी फजिती ऐकवायला पाहिजे होती. ती जावेदसाहेबांनी ऐकवली. उदित नारायणनं आपल्या खणखणीत आवाजात ती मोठ्या झोकात सुनावली.

जवळपास गद्यात्मकच असलेल्या या गीतरचनेला यमनकल्याण रागात संथ चाल लावून संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आधुनिक काळातलं हे गाणं ऐकताना हुबेहूब अशाच चालीवरची निरनिराळ्या बुजुर्ग संगीतकारांची अनेक गाणी आठवतात.

वानगीदाखल काही गाणी बघा...

यही है तमन्ना...तेरे दर के सामने मेरी जान जाए...

(चित्रपट : आप की परछाईयाँ. संगीतकार : मदनमोहन).

सागरकिनारे, दिल ये पुकारे,

तू जो नही तो मेरा कोई नहीं है...

(चित्रपट : सागर. संगीतकार : राहुलदेव बर्मन).

हमे और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते...

(चित्रपट : अगर तुम न होते...संगीतकार : राहुलदेव बर्मन).

ठंडी हवाएँ लहरा के आए...

(चित्रपट : नौजवान. संगीतकार : सचिनदेव बर्मन).

बहोत शुक्रिया...बडी मेहेरबानी,

मेरी जिंदगी में हुजूर आप आए...

(चित्रपट : एक मुसाफिर, एक हसीना.

संगीतकार : ओ. पी. नय्यर).

रहे ना रहे हम, महका करेंगे...

(चित्रपट : ममता. संगीतकार : रोशन).

अशी याच चालीवर बेतलेली अनेक गाणी गेल्या सत्तर वर्षांपासून अधूनमधून ऐकायला येत असतात; तीसुद्धा वेगवेगळ्या संगीतकारांनी केलेली.

‘घर से निकलते ही...’ या गाण्यातल्या शब्दरचनेशी चित्रपटाची कथा, तसंच गाण्यातलं दृश्यचित्र सुसंगत वाटत नाही. नव्वदच्या दशकातला फ्रेश चेहरा जुगल हंसराज आणि मयूरी कांगो अशी ताज्या दमाची जोडी आहे; पण त्यांचा नवखेपणा जाणवतो. हिंदी महासागरात आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ लहान लहान बेटांचा समूह असलेल्या सेशेल्स या देशातलं हे चित्रीकरण आहे.

नॉस्टॅल्जिक करणारी गाण्यातली शब्दरचना आणि चालीचं इतर गीतांशी असलेलं कमालीचं साम्य हे या गीताचं वैशिष्ट्य.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com