सेलिब्रिटींना गंडवणारी ‘ठग’गिरी!

सेलिब्रिटी नेहमी कोणत्या ना कोणत्या हव्यासाचे शिकार असतात. चित्रपटसृष्टीत टिकून राहायचे असेल, तर धनाढ्य आणि राजकीय व्यक्तींशी ओळख असणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटत असते.
jacqueline fernandez and sukesh chandrasekhar
jacqueline fernandez and sukesh chandrasekharsakal
Summary

सेलिब्रिटी नेहमी कोणत्या ना कोणत्या हव्यासाचे शिकार असतात. चित्रपटसृष्टीत टिकून राहायचे असेल, तर धनाढ्य आणि राजकीय व्यक्तींशी ओळख असणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटत असते.

- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com

सेलिब्रिटी नेहमी कोणत्या ना कोणत्या हव्यासाचे शिकार असतात. चित्रपटसृष्टीत टिकून राहायचे असेल, तर धनाढ्य आणि राजकीय व्यक्तींशी ओळख असणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटत असते. चित्रपटसृष्टीत येणाऱ्या नवागतांमध्ये ही भावना अधिक तीव्र असते, तर प्रस्थापित झालेल्यांची सगळ्या बाजूंनी पैसे कमावण्याची मानसिकता त्यांच्यासाठी तापदायक ठरते. स्टारच्या भाऊगर्दीत आपण चमकून दिसावे, आपली विशिष्ट ओळख असावी, असा हव्यास बऱ्याच जणांना असतो, मग त्यासाठी ते काहीही करतात. त्यामुळेच सुकेश चंद्रशेखरसारखे महाठग त्यांना सहज फसवतात.

एका मोठ्या चित्रपटगृहात एक मोठ्ठा रेड कार्पेट इव्हेंट सुरू आहे... या कार्यक्रमात अनेक मोठे चित्रपट तारे आणि तारका उपस्थित आहेत... एकापाठोपाठ सेलिब्रिटी येतात आणि रेड कार्पेटवर पोज देतात... त्याक्षणी शेकडो कॅमेऱ्यांच्या शटरचा आवाज होतो... सेलिब्रिटीची सर्वोत्तम पोज कैद करण्यासाठी प्रत्येक कॅमेरामन धडपडत असतो. त्या रेड कार्पेटजवळ एक सभ्य व्यक्ती सुटाबुटात वावरत असते. सेलिब्रिटीचे फोटो सेशन झाले की ही व्यक्ती अगदी नम्रपणे त्यांच्याकडे जाऊन आपल्यासोबत फोटो काढण्याची विनंती करते. फॅन्सबरोबर फोटो काढणे ही सेलिब्रिटींसाठी नित्याची बाब असते. म्हणून मग तेही या व्यक्तीबरोबर फोटो काढून घेतात. मग अमुक कंपनी माझी आहे, असा परिचय देत ही व्यक्ती आपले बिझनेस कार्ड पुढे करतो. तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफरपैकी एकाबरोबर संधान बांधून या व्यक्तीने आपल्याला हवा तसा फोटो मिळवण्याची सोय करून ठेवलेली असते.

अशा सेलिब्रिटींचे मोबाईल क्रमांक अनेकांकडे असतात. या सुटबूटवाल्याकडेही तो असणे साहजिक आहे. काही काळानंतर ही व्यक्ती या इव्हेंटमध्ये काढलेला फोटो त्या सेलिब्रिटीला पाठवते आणि आपल्या बिझनेसची माहिती देऊन मीटिंगही फिक्स करते. त्यात आपण कोट्यधीश असून चित्रपट क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात अनेक बड्या हस्तींबरोबर आपला घरोबा असल्याचे सांगते; मग मित्रत्वाच्या नात्याचे पुढचे पाऊल म्हणून ही व्यक्ती त्या हेरलेल्या सेलिब्रिटीला एखादी बीएमडब्ल्यू कारसारखी महागडी भेटवस्तू पाठवते.

अशा व्यक्ती सुकेश चंद्रशेखरच्या जातकुळीतील असतात, ज्या नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू देऊन, तर कधी श्रद्धा कपूरला तिच्यावर सुरू असलेल्या एनसीबीच्या खटल्यातून क्लीन चिट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन हळूहळू आपल्या नात्याचं जाळं घट्ट करत जातात. याच दरम्यान दगडाखाली हात अडकलेले किंवा प्रसिद्धीसाठी धडपडणारे, जॅकलीनसारखे काही सेलिब्रिटी अलगद या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. सुकेश चंद्रशेखर हा काही पहिला माणूस नव्हे, ज्याने बॉलीवूड ताऱ्यांच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतला. यापूर्वीही अनेक महाठग बॉलीवूडमध्ये अवतरले होते. असे असतानाही अनेक सेलिब्रिटी अशा लोकांच्या जाळ्यात का अडकतात, हेच आपण जाणून घेणार आहोत.

अनेक सेलिब्रिटींचे विश्व हे निराळेच असते. रेड कार्पेट इव्हेंटला हजेरी लावणे, मुलाखती, फोटोसेशन यापलिकडे त्यांचे जग नसते; पण त्यामधून त्यांना जे लोक भेटतात, त्यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध जुळतात. त्यातले किती लोक खरेच नाते ठेवायच्या लायकीचे, प्रामाणिक आहेत, याचा ठाव त्यांना कधीच नसतो. त्यामुळे अशा भामट्यांबरोबर त्यांचे नाते सहजपणे बनते. सुकेश चंद्रशेखर हादेखील असाच. त्याने नोरा, श्रद्धा यांच्याशी मैत्री केली आणि मग त्यांच्या नावाचा उपयोग करत बॉलीवूडमध्ये इतरांशी मैत्री केली. याच दरम्यान त्याने जॅकलिनशी सूत जुळवले आणि त्या दोघांमध्ये किती घनिष्ठ संबंध आहेत, हे दाखवणारे फोटो समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले. जॅकलिन मात्र सुकेशबाबत अनभिज्ञ होती. जेव्हा सुकेशचे बिंग फुटले, तेव्हा तिच्यासोबत सर्वांनाच सुकेश २०० कोटी रुपये खंडणीच्या प्रकरणात आरोपी असल्याचे समजले. म्हणजेच काय तर जॅकलिनने सुकेशबरोबर मैत्री करताना त्याची पार्श्वभूमी जाणून घेतलीच नाही.

जॅकलिनसाठीची भूमिका चांगली लिहिली जावी, यासाठी तो पटकथा लेखकाला पैसेही द्यायचा. त्याच्याकडून मिळणाऱ्या चार्टर्ड विमान, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे अशा सुविधांना ती भुलली होती, असे समजायला हरकत नाही. ऑगस्ट २०२१ मध्ये जेव्हा त्याला अटक केली, तेव्हा त्याला निकिता तांबोळी, चाहत खन्ना, आरुषी पाटील, सोफिया सिंगसह इतर सेलिब्रिटींनी भेट दिली होती. हे पैसेवाले लोक आपले वजन वापरून तुरुंगातून नक्की बाहेर पडणार, अशी या सेलिब्रिटींना खात्री असते.

आज जॅकलिनची जी स्थिती झाली आहे, ती उद्या कोणत्याही सेलिब्रिटीची होऊ शकते. याचे अजून एक कारण म्हणजे सेलिब्रिटी अगदी सहज कोणाच्याही नादी लागतात. अशीच अजून एक घटना नुकतीच उजेडात आली. ‘ओम’ आणि ‘शिक्षा मंडल’ वेबसीरिजफेम अक्षतराज सलुजा नावाच्या प्रसिद्ध लेखकाला अटक झाली. त्याने एका निर्मात्याला तुझी वेबसीरिज पास करून देतो, असे सांगत त्याच्याकडून काही रक्कम वसूल केली. यासाठी त्याने त्या निर्मात्याला एका ओटीटी प्लॅटफॉर्मचे संमतीपत्रही दाखवले, अर्थातच ते पत्र खोटे होते. यामध्ये त्याचे तीन सहकारी सहभागी होते. या प्रकरणात त्यांनी ४८ लाख लुबाडले. त्यापैकी साडेसात लाख सलुजाच्या खात्यात जमा झाले. या आधारावर त्याला अटक झाली. म्हणजेच या क्षेत्रात सलुजासारखे यशस्वी झालेले लोकदेखील अशा मृगजळामागे धावतात आणि फसतात.

सेलिब्रिटी नेहमी कोणत्या ना कोणत्या हव्यासाचे शिकार असतात. चित्रपटसृष्टीत टिकून राहायचे असेल, तर धनाढ्य आणि राजकीय व्यक्तींशी ओळख असणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटत असते. चित्रपटसृष्टीत येणाऱ्या नवागतांमध्ये ही भावना अधिक तीव्र असते, तर प्रस्थापित झालेल्यांची सगळ्या बाजूंनी पैसे कमावण्याची मानसिकता त्यांच्यासाठी तापदायक ठरते. एकदा का या क्षेत्रात नाव झाले, की या ताऱ्यांना प्रत्येक संधीतून पैसा कमवायचा असतो, आणखी श्रीमंत व्हायचे असते. शाहरुखचा दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एक मजला आहे, ही एक बातमी आहे. त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत नवागतांना तितकेच मोठे आणि श्रीमंत व्हायचे असते. संजय दत्तलाही डॉन लोकांशी मैत्री करणे, हत्यारे बाळगणे, महागड्या कार बाळगणे आवडत होते. हे तो कोणत्या तरी हव्यासापोटीच करत होता. संजय दत्तची अंडरवर्ल्डबरोबरची मैत्री काही जणांना प्रभावित करते.

शाखरुखला दुबईच्या शेखबरोबरच्या मैत्रीमुळे हा फायदा झाल्याचा सोप्पा अर्थ अशा लोकांनी काढलेला असतो आणि मग तेही असे फायदे मिळवण्यासाठी श्रीमंत मित्रांच्या शोधात असतात. काही जण तोतया श्रीमंतांच्या जाळ्यात अडकवून स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढून घेतात. या लोकांना माझे खूप मोठ्या लोकांशी संबंध आहेत, हे दाखवण्याची हौस असते. त्यांच्या या मानसिकतेचा काही लोक गैरफायदा घेतात. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक होते, याहून मोठी शोकांतिका कोणती म्हणावी! प्रेरणा अरोरा या निर्मात्यावर अनेक खटले दाखल झाले आहेत. तिच्याविरोधात वासू भगनानीने फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. त्याच्यासारख्या लोकांना चुना लावायला हे लोक मागे-पुढे पाहत नाहीत. अन्नू कपूरलाही एकदा साडेचार लाखांचा फटका बसला होता. या उदाहरणांवरून हे सगळे नट कसे सहज फसतात, हे स्पष्ट होते.

स्टारच्या भाऊगर्दीत आपण चमकून दिसावे, आपली विशिष्ट ओळख असावी, असा हव्यास बऱ्याच जणांना असतो; मग त्यासाठी काही जण पार्ट्या देतात, काही जण डिझायनर कपडे वापरतात, काही जण महागड्या गाड्या वापरतात. यासाठी त्यांना पैसाही लागतो. या दरम्यान ते चुकीच्या लोकांच्या संपर्कात येतात. कारण आपण ज्यांच्याशी संबंध जोडत आहोत ते लोक खरे कसे आहेत, याबाबत ते होमवर्क करत नाहीत. त्यामुळेच सुकेशसारखे लोक त्यांना सहज फसवतात.

यापूर्वी २०१४ मध्ये दिलीप कुमार यांच्याबरोबर अशीच घटना घडली होती. आनंद राहुरीकर आणि सुरेश कुरपाड यांनी दिलीप कुमार यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी अमिताभ आणि शाहरुख यांनी संमती दिली असून कार्यक्रमासाठी चार कोटी रुपये जमा झाल्याचा धनादेशही त्यांनी दिलीप कुमार यांना दाखवला. या कार्यक्रमातून आणखी पाच कोटी रुपये जमा करायचे आहेत, असे त्या दोघांनी सांगितले. दिलीप कुमार कार्यक्रमाला उपस्थित राहिले, इतर स्टारही आले होते. त्या वेळी दिलीप कुमार यांना समजले, की त्यांना दाखवलेला चार कोटींचा धनादेश खोटा होता; उलट त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमातूनच ते दोघे पैसे कमावत आहेत, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी योग्य ती कारवाई केली. अशा परिस्थितीत स्टार सामाजिक जबाबदारी जाणणारा असेल, तरच अशा भामट्यांना खीळ बसते. अक्षय खन्नालादेखील एकदा ५० लाखाचे नुकसान झाले होते. गौरांग जोशीलादेखील ही परिस्थिती झेलावी लागली होती.

नोव्हेंबर २०२१ मध्ये मल्याळी तारका दिशा मारिया पॉल हिच्याविरोधात दिल्लीत १९ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तिने भागीदारीमध्ये १९ कोटींचे कर्ज घेतले; पण तिच्या भागीदाराने तिला फसवून संपूर्ण रक्कम लंपास केली. त्या व्यक्तीवर यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे नंतर तिला समजले.

अमिताभ आणि जया बच्चनबरोबर समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग नेहमी दिसायचे. अमिताभ यांचे जेव्हा दिवाळे निघाले होते, तेव्हा याच माणसाने त्याला मदत केली होती. नव्या तारांना वाटते की, हे स्टार्स मोठे आहेत कारण त्यांचे मित्र मोठे आहेत. अमिताभ मोठे आहेत, कारण राजीव गांधी, अमर सिंग त्यांचे मित्र आहेत. शाहरुख मोठा कारण दुबईचा शेख त्याचा मित्र. हे नवे लोक विसरून जातात की, मोठे स्टार्स आपल्या कामाने मोठे झाले आणि त्यामुळे त्यांचे स्थान सुरक्षित आहे. त्यांना मोठे होण्यासाठी अशा मोठ्या लोकांच्या ओळखीची अजिबात गरज नसते. हे महाठग खूप अभ्यास करून आपले सावज हेरतात. ते प्रत्येक स्टारवर लक्ष ठेवतात. त्यांचा अभ्यास करून त्यांना गोवण्याची पद्धत अवलंबतात. अशी प्रकरणे हॉलीवूडमध्येही घडतात. सिंडी क्रॉफर्डला आपल्या पतीसोबत अशा प्रकाराला सामोरे जावे लागले होते. एका कायलार नावाच्या मॉडेलने आपल्या अपहरण झालेल्या मुलीला सोडवण्यासाठी यांच्याकडून पैसे घेतले. प्रत्यक्षात मात्र तसे घडलेच नव्हते. लिव्ह टायलर, ओमार फ्रिमन, रॉबर्ट डी निरो यांनीही ही परिस्थिती अनुभवली आहे. बरेच वेळा हे महाठग परिचित लोकच असतात. जॅकलिनचे उदाहरण लक्षात ठेवून यापुढे इंडस्ट्रीत येणारे तारे नक्कीच अशा लखोबा लोखंडेपासून चार हात दूर राहतील.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com