चित्रपट हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रभावी माध्यम आहे. चित्रपटात मनुष्याच्या जीवनातील प्रसंग, विविध भावनांच्या छटा, कठीण प्रसंगांना सामोरे जाणे यांचे दर्शन घडवले जाते.
- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com
चित्रपट हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रभावी माध्यम आहे. चित्रपटात मनुष्याच्या जीवनातील प्रसंग, विविध भावनांच्या छटा, कठीण प्रसंगांना सामोरे जाणे यांचे दर्शन घडवले जाते. त्यामुळे मनुष्य सहजगत्या चित्रपटांवरून प्रभावित होतो. या प्रभावाखाली येणारा वर्ग म्हणजे किशोरवयीन मुले, तरुण आणि अल्पशिक्षित वर्ग. म्हणूनच चित्रपट बनवणाऱ्यांवर ही सामाजिक जबाबदारी आहे, की त्यांनी आपल्या चित्रपटांचा कॉन्टेट ठरवताना त्याच्या जनमानसावर पडणाऱ्या प्रभावाचा विचार करावा.
देशभरातील माध्यमांमध्ये सध्या एकाच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रकरण म्हणजे वसईच्या श्रद्धा वालकरची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने दिल्लीत अतिशय निर्दयपणे केलेली हत्या! आफताबने केवळ श्रद्धाची हत्या केली नाही, तर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी क्रौर्याची सीमा गाठत त्याने मृत शरीराचे ३५ तुकडे केले. कोणी इतका क्रूर कसा असू शकतो? आणि तेही आपण ज्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत करू इच्छितो अशा व्यक्तीबरोबर? ही कल्पना करणेही अशक्य आहे, तिथे आफताबने हे कृत्य खऱ्या आयुष्यात केले. मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने छडा लावला आणि आफताबला जेरबंद केले. पोलिसांना दिलेल्या जबाबात आफताबने आपली करणी पोलिसांना सांगितली.
आपल्या घरच्या मंडळींच्या विरोधाला न जुमानता, मोठ्या विश्वासाने आफताबबरोबर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाचा किरकोळ कारणावरून आफताबने जीव घेतला. प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि हे तुकडे घरातल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचे आणि दरदिवशी एक तुकडा घरापासून लांब नेऊन फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ही कल्पना आपल्याला अमेरिकन वेबसीरिज ‘डेक्स्टर’ पाहून सुचल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. या सीरिजमधील एक पात्र याचप्रमाणे खून करून प्रेताचे तुकडे घरातल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचे दाखवण्यात आले आहे. यापासून प्रेरणा घेऊन आपणही तीच पद्धत वापरल्याचे आफताबने कबूल केले. यावरून एक गोष्ट लक्षात येते की मानवाला अनेक बऱ्या-वाईट गोष्टींचे ज्ञान केवळ पुस्तके किंवा शालेय शिक्षणातूनच नव्हे, तर आसपासची परिस्थिती आणि चित्रपटांसारख्या माध्यमातूनही निरंतर मिळत राहते. सिनेमामध्ये चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले जाते. आपण कशाचा स्वीकार करावा, हा सर्वस्वी ज्याचा-त्याचा वैयक्तिक निर्णय असतो.
हॉलीवूडचे असे अनेक चित्रपट आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जगभरात अनेक ठिकाणी गुन्हे घडले आहेत. स्टॅनली कुब्रिक यांचा ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’ (१९७१) हा लोकप्रिय; पण अत्यंत हिंसक मनोवृत्ती दर्शविणारा चित्रपट होता. या चित्रपटात तरुणांची एक टोळी दाखवण्यात आली होती, जी केवळ मजेखातर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करायची. १९७३ मध्ये काही किशोरवयीन मुलांनी रस्त्यावर राहणाऱ्या एका बेघर माणसाचा खून केला. या प्रकरणात अटक झालेल्या मुलांनी आपण ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’ पाहून हा गुन्हा केल्याचे मान्य केले. याच काळात एका डच युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनीदेखील हा चित्रपट पाहून गुन्हा केल्याची कबुली दिली. ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’ या चित्रपटात एक जण बलात्कार करत असताना ‘सिंगिंग इन द रेन’ हे गाणं गात असल्याचे दाखवण्यात आले होते, तसाच काहीसा प्रकार या मुलांनी डच युवतीबरोबर केला होता.
असाच आणखी एक वाईट प्रभाव टाकणारा चित्रपट म्हणजे ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७६). मार्टीन स्कॉरसासे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक कल्ट सिनेमा समजला जातो. या चित्रपटाची जगभरातल्या अव्वल दर्जाच्या १० चित्रपटांमध्ये गणना केली जाते. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या चित्रपटातले मुख्य पात्र साकारले होते, रॉबर्ट डी निरो याने. हा टॅक्सी ड्रायव्हर अगदी एकाकी आणि निराश असतो. तो इलेक्शन कॅम्पेन करणाऱ्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत असतो. या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हा टॅक्सी ड्रायव्हर राष्ट्राध्यक्षाच्या खुनाचा कट रचतो आणि या दरम्यान एका लहान मुलीची देहविक्रय करण्यातून सुटका करतो. १९८१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागून ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी जॉन हिकली ज्युनिअर याला पकडले होते. हा जॉन टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या ज्युडी फॉस्टरच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. तो नेहमीच तिचा पाठलाग करत असायचा. ज्युडी फॉस्टरने या जॉनकडे कधीही लक्ष दिले नाही; पण जॉनने मात्र तिला इम्प्रेस करण्यासाठी तिच्याच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांची हत्या करण्याचे षड्यंत्र रचले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. चित्रपटात दाखवली जाणारी काल्पनिक गुन्हेगारी घटना त्याच चित्रपटात काम करणाऱ्या एखाद्याच्या आयुष्यात वास्तवात घडल्याचे हे एक अनोखे उदाहरण आहे.
‘नॅचरल बॉर्न किलर्स’ (१९९४) हा ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित चित्रपटात एका तरुण जोडप्याला ग्लोरीफाय करण्यात आले होते. हे जोडपं इतरांना लुबाडण्याचे, बॅंक लुटण्याचे काम करत असते. या चित्रपटानंतर ऑलिव्हर स्टोन यांच्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा चित्रपट तयार केला म्हणून समाजाच्या सर्व स्तरांतून टीका करण्यात आली. तसेच लवकरच या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन वास्तवात इतरांना लुबाडणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली. या जोडीने एक बॅंकही लुटली होती. पोलिस चौकशीदरम्यान या जोडीने आपल्या गुन्ह्याचे श्रेय ऑलिव्हर स्टोन यांच्या नॅचरल बॉर्न किलर्स चित्रपटाला असल्याचे सांगितले होते. ‘डार्क नाईट रायजेस’ (२०१२) या चित्रपटानंतर अनेकांनी जोकरचा पेहराव करून खून, चोरी, लूट केल्याच्या घटना घडल्या. काहींनी याच गैरव्यवहारांसाठी बॅटमॅनचा मास्क वापरला.
‘इंटरव्ह्यू विथ द व्हॅंपायर’ (१९९४) ब्रॅड पिट आणि टॉम क्रूज अभिनित हा लोकप्रिय चित्रपट पाहिल्यानंतर एका व्यक्तीने गर्ल फ्रेंडला आपण तिचे रक्त पिणार असल्याचे सांगितले. त्या मुलीला तो विनोद वाटला; पण त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी खरोखरच अनेक वेळा चाकू खुपसून तिचा खून केला आणि क्रौर्याची सीमा गाठत तिचे रक्त प्यायला. आपण याच चित्रपटामुळे प्रभावित होऊन ही कृती केल्याचे त्याने सांगितले. ‘द टाऊन’ (२०१०) या चित्रपटात बॅंक लुटणाऱ्या तरुणांची टोळी दाखवण्यात आली होती. ही टोळी बॅंक लुटण्यासाठी प्रत्येक वेळी नवी पद्धत अवलंबत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्या पद्धतींचा अवलंब करत एका लुटारू टोळीने वास्तवात वेगवेगळ्या ठिकाणी ६२ बॅंका लुटल्या.
हॉलीवूड चित्रपटापासून प्रेरित अनेक गुन्ह्यांच्या घटना घडल्याचे आपण पाहतो. अशी उदाहरणे आपल्या घरच्या बॉलीवूडच्या प्रभावाने घडलेल्याही आढळतात. ‘डर’ चित्रपट पाहून एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांचे पेव त्या काळात फुटले होते. ‘धूम’ पाहून बॅंक लुटण्याचे प्लान बनवणाऱ्या तरुणांच्या अनेक टोळ्या आजवर पोलिसांनी पकडल्या आहेत. यापैकी एका टोळीने तर केरळच्या एका बॅंकेतून आठ कोटींचे दागिने लंपास केले होते. ‘स्पेशल २६’ चित्रपट पाहून भारतातील प्रसिद्ध सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी ‘टीबीझेड’ यांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना आजही आपल्याला आठवते.
तोतया आयकर अधिकारी बनून छापे घालण्याचे नाटक करत व्यापाऱ्यांना लुटण्याच्या किमान ८ ते १० घटना या चित्रपटानंतर भारतात घडल्या होत्या. ‘खोंसला का घोंसला’ चित्रपट आल्यानंतर एकाच प्लॉटची अनेक जणांना विक्री केल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या होत्या. ‘कबीर सिंग’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटानंतर अनेक तोतया डॉक्टर उदयाला आले होते. ‘बंटी और बबली’ पाहून अनेक जणांनी पैसे कमावण्याचा सोपा मार्ग म्हणून त्यांचाच मार्ग स्वीकारला होता. ‘शूट आऊट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटातील विवेक ओबेरॉयच्या भूमिकेने प्रभावित होऊन गुंडांच्या एका टोळीने एका छोट्या मुलाचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती. ‘दृश्यम्’ चित्रपट पाहून खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. चित्रपटाच्या प्रभावाने घडलेल्या गुन्हेगारी घटनांची ही काही मोजकी उदाहरणे.
चित्रपट हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रभावी माध्यम आहे. चित्रपटात मनुष्याच्या जीवनातील प्रसंग, विविध भावनांच्या छटा, कठीण प्रसंगांना सामोरे जाणे यांचे दर्शन घडवले जाते. त्यामुळे मनुष्य सहजगत्या चित्रपटांशी जोडला जातो, एकरूप होतो आणि तितकाच प्रभावित होतो. चित्रपटाच्या प्रभावी अंमलाखाली येणारा वर्ग म्हणजे किशोरवयीन मुले, तरुण आणि अल्पशिक्षित वर्ग. हे तीन गट म्हणजे लोकसंख्येचा अर्धा हिस्सा. म्हणूनच चित्रपट बनवणाऱ्यांवर ही सामाजिक जबाबदारी आहे, की त्यांनी आपल्या चित्रपटांचा कॉन्टेट ठरवताना त्याच्या जनमानसावर पडणाऱ्या प्रभावाचा विचार करावा. मान्य आहे की, चित्रपट हे समाजजीवनाशी निगडित असतात, समाजाचे दर्पण असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच चित्रपटांत दाखवण्यात येतात; पण या सत्य दर्शनातून जर वाईट प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत असेल, गुन्ह्यांचे उदात्तीकरण होत असेल, तर अशा प्रभावी माध्यमांचा वापर समाजाच्या अधोगतीसाठी केल्यासारखे नाही का होणार?
यात अजून भर पडली आहे ती म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मची. ओटीटीमुळे आपल्याला घरबसल्या फारच सहजपणे जगभरातला कॉन्टेट उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी साऱ्यांनाच पाहता येऊ लागल्या आहेत. अजून एक अडचण म्हणजे ओटीटीला कोणतेही सेन्सॉर नसणे! त्यामुळे हिंसा, अत्याचार, फसवणूक अशा नकारात्मक गोष्टी उत्सुकतेपोटी पाहायला सुरुवात करून दर्शकांना त्याचे जणू व्यसन जडते आहे. ओटीटीवरच्या कलाकृतीचा मुख्य विषय प्रामुख्याने गुन्हे, हिंसा हाच राहिला आहे. त्यामुळे लोक गुन्हा शोधण्याच्याच नव्हे, तर गुन्हा करण्याच्या आणि ते लपवण्याच्या कलेशी अवगत होत आहेत. ‘दिल्ली क्राईम’, ‘पाताल लोक’, ‘मिर्झापूर’, ‘जामतारा’ यांसारख्या वेबसीरिज याचीच उदाहरणे आहेत.
एकंदरीत काय तर, हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन घडणारे गुन्हे आणि गुन्हेगार आता घराघरात स्थान मिळवलेल्या ओटीटीपासूनही वाईट कृतीसाठी प्रभावित होत आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि चित्रपटनिर्मितीसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने सजग राहण्याची वेळ आली आहे; अन्यथा मनोरंजनासाठी बनणाऱ्या कलाकृती समाजाच्या ऱ्हासाचे कारण बनतील. म्हणूनच ‘जागो, दर्शकों जागो..!’
(लेखक प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.