ऑस्कर वेधी ‘छेल्लो शो’

ऑस्करसाठी भारताकडून ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड झाली. सालाबादाप्रमाणे घोषणा झाल्यापासून विविध मुद्द्यांवर विवादही सुरू झाले आहेत.
Oscar
OscarSakal
Updated on
Summary

ऑस्करसाठी भारताकडून ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड झाली. सालाबादाप्रमाणे घोषणा झाल्यापासून विविध मुद्द्यांवर विवादही सुरू झाले आहेत.

- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com

ऑस्करसाठी भारताकडून ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड झाली. सालाबादाप्रमाणे घोषणा झाल्यापासून विविध मुद्द्यांवर विवादही सुरू झाले आहेत. हा चित्रपट इटालियन भाषिक ‘सिनेमा पॅराडिसो’वर आधारित असल्याचे बोलले जाते; पण सुरुवात आणि काही प्रसंग सोडले तर या कथानकाचा प्रवास वेगळ्या वाटेवरून जाणारा आहे. वादात अडकला असला तरी ‘छेल्लो शो’ भारताला नवे स्थान मिळवून देईल का, हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न भारतीय सिनेमारसिकांची उत्सुकता वाढवणारा आहे.

ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी यावर्षी ‘छेल्लो शो’ (द लास्ट फिल्म शो) हा पॅन नलिन दिग्दर्शित गुजराती चित्रपट भारताची ऑफिशियल एन्ट्री म्हणून पाठवला जात आहे. पॅन नलिन (नलिन कुमार पंड्या) हे अमेरिकेत स्थायिक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट भारतात १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. भारतात प्रदर्शनाची धुरा रॉय कपूर फिल्म्स, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सॅम गोल्डिंग कंपनी सांभाळणार आहे. ऑस्करसाठी पाठवला जाणारा चित्रपट त्या देशात प्रदर्शित झालेला असावा, अशी ऑस्करची अट असल्यामुळे उशिराने का होईना पण हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यासोबतच या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हा चित्रपट अनेक सेलेब्रिटींना दाखवला जाणार आहे. करण जोहरने नुकताच हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट जागतिक पटलावर भारताला नवे स्थान मिळवून देईल, असा विश्वास करणने व्यक्त केला आहे. मात्र, सालाबादप्रमाणे या चित्रपटाच्या निवडीची घोषणा झाल्याक्षणापासून विविध मुद्द्यांवर विवाद आणि आरोप यावरून उठलेले वादळ अजूनही शमलेले नाही.

‘छेल्लो शो’बाबत एक आक्षेप घेतला जात आहे, तो या चित्रपटाच्या कथेवरून. हा चित्रपट इटालियन भाषिक ‘सिनेमा पॅराडिसो’ चित्रपटावर आधारित असल्याचे बोलले जात आहे; पण कथानकाची सुरुवात आणि काही प्रसंग समान असले तरी या चित्रपटाच्या कथानकाचा प्रवास मात्र वेगळ्या वाटेवरून जाणारा आहे. ‘सिनेमा पॅराडिसो’मध्ये एका छोट्या गावातील मुलाची गोष्ट आहे, जो शहरात एका चित्रपटगृहातल्या प्रोजेक्शनिस्टबरोबर मैत्री करतो, मग त्याच्या मदतीने चित्रपट पाहत लहानाचा मोठा होतो आणि मोठेपणी कुशल दिग्दर्शक बनतो. ‘छेल्लो शो’मध्येही असाच मुलगा आहे, जो प्रोजेक्शनिस्टच्या मदतीने चित्रपट पाहातो; पण या चित्रपटातले मुख्य पात्र गावातले चित्रपटगृह बंद पडल्यावर मित्रांच्या मदतीने गावात उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साहित्याचा वापर करून चित्रपट तयार करतो. या दोन्ही चित्रपटांमध्ये पोस्टर वगळता फारसे साम्य नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे.

दुसरा विवाद हा की, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी पाठवण्यात आलेला चित्रपट हा त्याच देशात तयार झालेला असावा, असा ज्युरीचा नियम आहे. पॅन नलिन हे अमेरिकेत स्थायिक आहेत. साहजिकच त्यांनी एका अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती तिथेच केली आहे. जर या चित्रपटाचे निर्माते अमेरिकन असतील तर याला भारतीय चित्रपट कसे म्हणता येईल?

तिसरा मुद्दा हा की, बऱ्याच वेळा एखाद्या लोकप्रिय चित्रपटाचे नाव ऑस्करसाठी चर्चेत असताना आगंतुक पाहुणा बनून कुठलातरी वेगळाच चित्रपट भारताची ऑफिशियल एन्ट्री म्हणून पाठवला जातो. या वर्षीदेखील हेच घडले. आरआरआर परदेशातील प्रेक्षकांमध्येदेखील लोकप्रिय ठरला. त्यामुळे तोच ऑस्करसाठी जाणार अशी खात्री असताना अचानक ‘छेल्लो शो’च्या निवडीची घोषणा करून भारतीय निवड समिती अर्थात फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या समितीचा हा निर्णय चित्रपटसृष्टीतील काही वरिष्ठ आणि ज्येष्ठांना अजिबात रुचला नाही. ११ सदस्यांची ही निवड समिती दरवर्षी प्रादेशिक भाषांमधील ३०-४० चित्रपट पाहून त्यातील एक चित्रपट ऑस्करसाठी भारताची ऑफिशियल एन्ट्री म्हणून निवडत असते.

‘छेल्लो शो’ हा चित्रपट मागच्या वर्षातील निर्मिती असून, तो मागच्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये आयोजित ट्रीबेका चित्रपट महोत्सवात सादर करण्यात आला होता. असे असताना मग या वर्षीच्या पुरस्कारांसाठी हा चित्रपट कसा पाठवला जाऊ शकतो? कारण, चालू वर्षात तयार आणि आपापल्या देशात प्रदर्शित झालेले चित्रपट पुरस्कारांसाठी स्वीकारायचे असा ऑस्कर ज्युरीचा दंडक आहे. हा देखील एक वादाचा मुद्दा आहे.

तसे पाहिले तर असे वाद होणे ही नित्याची बाब आहे. निवडीवरून झालेल्या विवादांचा आढावा घेतला तर लक्षात येते की, यापूर्वी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसाप्राप्त आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘तुंबाड’ किंवा वास्तववादी कथानक असलेला ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट निवडला जाणे अपेक्षित असताना ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली. ‘गली बॉय’ हा चित्रपट ‘एट माईल’ या हॉलीवूडपटावर आधारित होता. म्हणजेच या चित्रपटाच्या कथानकात नावीन्य नव्हते, तरीही त्याची निवड झाली होती. २०१३ साली ‘लंच बॉक्स’चा दावा खोडत गुजराती चित्रपट ‘द गुड रोड’ची वर्णी लागली. ‘लंच बॉक्स’चे दिग्दर्शक रितेश बत्रा यांनी तर चयन समितीला आक्षेप नोंदवणारे पत्रदेखील पाठवले होते. २०१२ साली ‘द गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘विकी डोनर’, ‘पानसिंग तोमर’ या बहुचर्चित चित्रपटांना मागे टाकत एका हॉलीवूड पटावर आधारित ‘बर्फी’ या चित्रपटाची निवड झाली. २००७ साली तर या निवडप्रक्रियेवर खूपच वादंग होऊन प्रकरण न्यायालयात पोचले होते. या वर्षी पंकज कपूर अभिनित, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘धर्म’ हा चित्रपट ऑस्करचा दावेदार मानला जात असताना अमिताभ बच्चनच्या ‘एकलव्य’ची निवड करण्यात आली. २००५ मध्ये ‘ब्लॅक’ आणि ‘स्वदेस’ या चित्रपटांना चित करत ‘पहेली’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला. १९९८ मध्येही आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आवडलेला मणिरत्नम यांचा ‘दिल से’ मागे ठेवून ‘जिन्स’ हा तद्दन चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला. १९६० साली भारताजवळ ‘मुगल ए आझम’सारखा प्रबळ दावेदार असताना वेगळेपणाचा कळस गाठत त्या वर्षी भारताने ऑस्करसाठी कोणताच चित्रपट पाठवला नाही.

ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहिली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अलीकडच्या काळात जे चित्रपट निवडले गेले ते ऑस्कर ज्युरीचे पारितोषिकासाठीचे निकष पूर्ण करण्यासाठी सक्षम नाहीत. आजवर भारताच्या केवळ तीन चित्रपटांनी अंतिम पाचमध्ये स्थान मिळविले होते. १९५७ साली ‘मदर इंडिया’, १९८८ मध्ये ‘सलाम बॉम्बे’ आणि २००१ साली ‘लगान’ या तीन चित्रपटांना ही किमया साधता आली होती. म्हणजेच गेल्या २१ वर्षांत भारत अंतिम पाचमध्येही पोहचू शकलेला नाही. जेव्हा की, जगात सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करणारा देश अशी भारताची ओळख आहे. आपले चित्रपट व्हीएफएक्स, ॲनिमेशन, ॲक्शन, सायफाय विषय यामध्ये हॉलीवूड चित्रपटांची बरोबरी करू शकत नाहीत. आपले चित्रपट ड्रामा प्रकारात श्रेष्ठ ठरू शकतात. जसे की ‘कुछ कुछ होता है’, ‘मुगल ए आझम’, ‘रजिया सुलतान’. मग आपले श्रेष्ठत्व ज्या प्रकारात आहे तसे चित्रपट का बनवले जात नाहीत?

ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड केल्या जाणाऱ्या चित्रपटांना ज्युरी तीन निकषांवर पारखत असते. चित्रपट ज्या भागातला आहे त्या समाजाशी कथेची नाळ जुळलेली असणे, मानवी संवेदना प्रदर्शित करणारे नावीन्यपूर्ण कथानक आणि चित्रपटाची प्रसिद्धी हे तीन महत्त्वाचे निकष आहेत. या कसोटीवर तग धरणारे चित्रपटच ऑस्कर पुरस्कार विजेता ठरतात. दरवर्षी प्रत्येक देश आपली ऑफिशियल एन्ट्री ऑस्करसाठी पाठवत असतो. ऑस्कर पुरस्कार चयन समिती हे सर्व चित्रपट पाहून त्यापैकी सर्वोत्तम पाच चित्रपटांना मानांकित करते. आणि अंतिम सर्वोत्तम पाचमधून एक चित्रपट आंतरराष्ट्रीय सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरतो. या चयन समितीवर ३० सदस्य नियुक्त केलेले असतात. यापैकी १० न्यू यॉर्कमधील, तर इतर २० विविध देशांतील सदस्य असतात.

बेस्ट फॉरेन फीचर फिल्म श्रेणीत आजवर युरोपीय देशांना ५७ वेळा पुरस्कार मिळाला आहे. तीन वेळा आफ्रिकन, तर सात आशियाई चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. आशियाई देशांमध्ये जपानने ११ वेळा अंतिम पाचात स्थान मिळवून एकदा डिपार्चर (२००८) या चित्रपटासाठी ऑस्कर पटकावले आहे. हा चित्रपट मानवी संवेदना प्रदर्शित करणारा होता. २००१ मध्ये आपला ‘लगान’ हा चित्रपट अंतिम पाच चित्रपटांमध्ये होता, तेव्हा ‘नो मॅन्स लॅंड’ या बोस्निया हर्जेगोविनाच्या चित्रपटाला या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे चित्रीकरण खऱ्याखुऱ्या युद्धभूमीवर करण्यात आले होते. या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला प्रत्येक चित्रपट अशीच काही तरी खासियत बाळगून असतो. उदाहरणार्थ २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ‘सोत्सी’ने पुरस्कार मिळवला. या चित्रपटात त्या देशातली गरिबी, गुन्हेगारी आणि बेरोजगारीचा प्रश्न मांडला होता. डेन्मार्कचा ‘इन अ बेटर वर्ल्ड’ (२०१०), कॅनेडियन चित्रपट ‘बार्बेरियन इनव्हेजन’ (२००४), स्पॅनिश चित्रपट ‘द सी इन साईड’ (२००४), जर्मन चित्रपट ‘नोव्हेअर इन आफ्रिका’ (२००१), अर्जेंटिनाचा ‘द सिक्रेट इन देअर आईज’, ऑस्ट्रियन चित्रपट ‘द काऊंटरफिटर्स’ (२००७), चिली देशाचा ‘फनटास्टीक वूमन’ (२०१७), हंगेरियन चित्रपट ‘सन ऑफ सॉल’ (२०१५), दुसऱ्या जागतिक युद्धावर आधारित कथानक असलेला पोलिश चित्रपट ‘ईडा’, गरीब मुलांचे बालपण दाखवणारा ‘रोमा’ हा मेक्सिकन चित्रपट ही अजून काही उदाहरणे. २०१९ हालचाल पुरस्कार विजेता ‘पॅरासाईट’ हा दक्षिण कोरियाचा चित्रपट केवळ दोन वर्गांमधील संघर्ष दाखवत नाही तर आपल्या डोळ्यांसमोर त्या देशाचा प्रत्यक्ष देखावा तयार करतो. पुरस्कार मिळवणारे हे सगळे देश भारताच्या तुलनेत अगदी छोटे आणि फारच कमी चित्रपट निर्मिती करणारे आहेत. याशिवाय तैवान-हाँगकाँग यांसारखे छोटे- छोटे देशदेखील या स्पर्धेत आपल्या पुढे आहेत.

गेल्या अनेक वर्षांत आपले चित्रपट अंतिम पाचातही पोचले नाहीत; पण देशात दरवर्षी चित्रपट निवडीवरून वाद मात्र होत राहतात. अलीकडच्या काळात जलिकट्टूची निवड लोकांना आवडली नव्हती. मराठीतील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘श्वास’ आणि ‘कोर्ट’ हे चित्रपटदेखील लोकांना आवडले नव्हते. आपण आपल्या चित्रपटांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न न करता वादात आपली ऊर्जा वाया घालवत आहोत.

भारतीय चित्रपट या स्पर्धेत मागे पडण्याची मुख्य कारणे म्हणजे मानवी संवेदनांच्या प्रामाणिक चित्रणाचा अभाव, चित्रपटातील व्यक्तिरेखा वास्तववादी नसणे आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अपुरे प्रयत्न. ‘प्यासा’, ‘दो बिघा जमीन’, ‘मुगल ए आझम’, ‘रजिया सुलतान’ सारखा जिवंतपणा असणारे चित्रपट बनणे जवळपास बंद झाले आहे.

आता जरा प्रसिद्धीचे महत्त्व जाणून घेऊ. आपण ऑस्कर पुरस्कारांसाठी चित्रपट निवडतो सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये, पुरस्कार सोहळा असतो मार्चमध्ये. हा तीन-चार महिन्यांचा कालावधी सर्व ज्युरी सदस्यांना चित्रपट दाखवण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अपुरा पडतो. ज्युरींना अनेक देशांमधून आलेले चित्रपट पाहायचे असतात. म्हणून सप्टेंबरपूर्वी चित्रपट निवडला जाणे गरजेचे आहे, तरच जागतिक स्तरावर चित्रपटाची प्रसिद्धी करता येईल. महत्त्वाचे म्हणजे प्रसिद्धीची विशेष रणनीती आखली पाहिजे. परदेशी प्रसार माध्यमांमध्ये निवड झालेल्या भारतीय चित्रपटांबद्दल लिहिले गेले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांबाबत लिहिणारे लोक नगण्य आहेत. या कारणाने भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळतच नाही. मागच्या वर्षी भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला तमिळ चित्रपट पेबल्स भारतीयांनादेखील ठाऊक नव्हता, मग परदेशांना कसा माहीत असणार? म्हणूनच भारतीय ऑफीशियल एन्ट्री चित्रपटाच्या प्रसिद्धीची विशेष रणनीती आखली गेली पाहिजे. ज्युरीला चित्रपट दाखवणे, समजावून सांगणे, त्याबाबत चित्रपट तज्ज्ञांबरोबर चर्चा घडवून आणणे, चित्रपट क्षेत्रात काम करणारे उत्तम मार्केटर्स शोधणे, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी संपर्क साधणे, अशा गोष्टी या रणनीती अंतर्गत घडल्या पाहिजेत. जिथे ऑस्कर सोहळा संपन्न होतो त्या अमेरिकेत आपल्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी दरवर्षी एक टीम पाठवली गेली पाहिजे.

भारत सरकारनेदेखील अशा चित्रपटांना आर्थिक मदत केली पाहिजे. कारण हे चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करतात. या बाबींची पूर्तता केली तरच यावर्षी आपण ‘छेल्लो शो’ ऑस्कर खेचून आणेल अशी अपेक्षा करू शकतो.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.