
सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणारी ॲमेझॉनची वेब सिरीज ‘द लॉर्ड ऑफ द रिंगज् : द रिंगज् ऑफ पॉवर’ ही आजवरची जगातली सर्वांत मोठ्या बजेटची अतिशय भव्य सिरीज असणार आहे.
वेबसिरीजची ‘बजेट’पॉवर!
गिरीश वानखेडे
सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणारी ॲमेझॉनची वेब सिरीज ‘द लॉर्ड ऑफ द रिंगज् : द रिंगज् ऑफ पॉवर’ ही आजवरची जगातली सर्वांत मोठ्या बजेटची अतिशय भव्य सिरीज असणार आहे. अमेरिका, इंग्लंड, दक्षिण कोरिया यांच्यासह भारतात अशा भव्य सिरीजच्या निर्मितीमागचा एकमेव उद्देश प्रेक्षकांची, सबस्क्राईबरची संख्या वाढवणे हाच आहे. अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि सबस्क्राईबरची संख्या वाढवण्यासाठी अशा मोठ्या बजेटच्या सिरीज तयार केल्या जात आहेत. एक वेबसिरीज दुसऱ्या वेबसिरीजला टक्कर द्यायच्या नादात आणखी जास्त खर्चिक होत चालल्या आहेत.
ध्या भव्य-दिव्य, महागड्या, मोठ्या बजेटच्या वेबसिरीज बनवण्याचा ट्रेंड वाढत आहे. ॲमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणारी ॲमेझॉनची वेबसिरीज ‘द लॉर्ड ऑफ द रिंगज् : द रिंगज् ऑफ पॉवर’ ही आजवरची जगातली सर्वांत मोठ्या बजेटची, अतिशय भव्य सिरीज असणार आहे. या सिरीजचे पाच सिझन असतील. लेखक जे. आर. आर. टॉलकिन यांच्या ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या सुपरहिट चित्रपटापासून प्रेरित होऊन ही वेब सिरीज बनवण्यात आली आहे. बजेट असणार आहे एक अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८० अब्ज रुपये! अशा खर्चिक, भव्य-दिव्य सिरीज बनवण्याचा उद्देश काय असेल, असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात नक्कीच निर्माण होतो.
जगात वेबसिरीजच्या निर्मितीतून प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतःला श्रेष्ठ आणि यशस्वी बनवण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वीची नेटफ्लिक्सवरची सर्वांत जास्त खर्चिक वेबसिरीज आहे ‘स्ट्रेंजर थिंगज्’. या सिरीजच्या प्रत्येक भागासाठी ३० मिलियन डॉलर खर्च करण्यात आलेत; पण ‘स्ट्रेंजर थिंगज्’च्या बजेटला मात देऊन ॲमेझॉनने ‘द लॉर्ड ऑफ द रिंगज् : द रिंगज् ऑफ पॉवर’ या सिरीजची निर्मिती केली आहे. या सिरीजचे शो रनर आहेत जे. डी. पायने, पॅट्रिक मॅके. ‘ज्युरासिक पार्क’, ‘द ऑर्फनेज’सारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक जे. ए. बायोना या सिरीजच्या पहिल्या दोन भागांचे दिग्दर्शन करणार आहेत. नुकतेच या सिरीजचे टिझर लॉन्च करण्यात आले. या टिझरमध्ये सिरीजचे नाव वितळलेल्या धातू रसापासून बनल्याचे दर्शवण्यात आले आहे.
भारतीयांना अशा भव्यतेची झलक दूरदर्शनवर प्रसारित रामायण, महाभारत, तमस या मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. ओटीटी विकसित झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर ‘गेम ऑफ थ्रोनस्’मध्ये ही भव्यता पुन्हा अनुभवता आली. या सिरीजचे बजेट एका भागासाठी १५ मिलियन डॉलर होते. त्या काळातील ही सर्वांत जास्त महागडी सिरीज होती. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉट स्टार केवळ गेम ऑफ थ्रोनस् आणि आयपीएलमुळेच भारतात आपले बस्तान बसवू शकले आणि नंबर एकवर पोचले.
‘गेम ऑफ थ्रोनस्’नंतर भारतीयांना भव्यता पाहायला मिळाली ती ‘इनसाईड एज’ या सिरीजमध्ये. ॲमेझॉनची निर्मिती असलेली ही सिरीज आपले गारुड पसरवण्यात अयशस्वी ठरली. भारतात सर्वप्रथम मार्केटिंग स्ट्रॅटजी वापरून भव्यपणे प्रदर्शित करण्यात आलेली पहिली वेबसिरीज होती ‘सेक्रेड गेम्स’. या सिरीजच्या प्रत्येक भागासाठी तीन कोटी रुपये याप्रमाणे १० भागांसाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. एका मराठी चित्रपटासाठी अंदाजे दीड ते दोन कोटी रुपये खर्च केले जातात, पण या सिरीजवर त्याच्या कैकपट पैसे खर्च करण्यात आले. या सिरीजच्या केवळ मार्केटिंगसाठी २० कोटी रुपये खर्च झाले होते. या मालिकेमुळेच भारतात नेटफ्लिक्सला सर्वांत जास्त सबस्क्राईबर मिळाले होते. ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनचे बजेट होते १०० कोटी रुपये. म्हणजे प्रत्येक भागासाठी किमान १० कोटी रुपये. भारतातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठ्या बजेटची मालिका आहे. नेटफ्लिक्सच्या या सिरीजच्या यशामुळे ॲमेझॉनलाही असे वाटू लागले, की यांच्या प्लॅटफॉर्मवरदेखील याच्या तोडीची मालिका असणे आवश्यक आहे. म्हणूनच ॲमेझॉनने ‘मेड इन हेवन’ ही सिरीज तयार केली. या सिरीजची निर्मिती एक्सल एंटरटेन्मेंट या बॅनरखाली जोया अख्तरने केली होती.
या सिरीजचे बजेट होते १०० कोटी रुपये. या सिरीजचे कथानक वेडिंग प्लॅनर असलेल्या पात्रांच्या आयुष्याशी संबंधित होते. त्यामुळे या सिरीजमध्ये संगीत, गाणी, नृत्य या सगळ्यांचा समावेश होता. प्रत्येक भाग पाहताना आपण एखादा हिंदी चित्रपट पाहत आहोत अशी अनुभूती प्रेक्षकांना येत असे. त्यानंतर क्रमांक लागतो तो ‘मिर्जापूर’ या सिरीजचा. या सिरीजच्या पहिल्या सीझनचे बजेट होते १२ कोटी रुपये. पहिला सीझन यशस्वी झाल्यावर दुसऱ्या सीझनच्या बजेटमध्ये घसघशीत वाढ करण्यात येऊन ते ६० कोटी रुपयांवर पोचले. त्याखालोखाल नंबर येतो ‘ब्रिद-इन टू द शाडोज’ या अभिषेक बच्चन अभिनित वेबसिरीजचा. या सिरीजच्या निर्मितीसाठी २० कोटी रुपये; तर जाहिरातीसाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. शाहरूख खानच्या रेड चिली एण्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या सिरीजचे बजेट ५० कोटी रुपये होते; मात्र ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली नाही. यावरून हे लक्षात येते, की एखाद्या सिरीजच्या निर्मिती आणि जाहिरातीसाठी केला जाणारा खर्च यावर त्या ओटीटी प्लॅटफॉर्मला मिळणाऱ्या सबस्क्राईबर्सची संख्या अवलंबून आहे.
भारताप्रमाणेच दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध दिग्दर्शक बाँग जून हो यांच्या बिग बजेट ‘स्नो पिअर्सर’ या यशस्वी चित्रपटावरून त्याच नावाची अत्यंत खर्चिक वेबसिरीज नेटफ्लिक्सने तयार केली. या सिरीजचे आजवर तीन सीजन पूर्ण झाले आहेत. जेव्हा आपण वेब सिरीजचे सिंहावलोकन करतो, तेव्हा भव्य सिरीजच्या यादीमध्ये गेम ऑफ थ्रोनस्, मॅंडलोरियनसारख्या सिरीज दिसतात. मॅंडलोरियन ही स्टार वॉरची सिरीज हॉट स्टारवर उपलब्ध असून, याचे बजेट प्रत्येक भागासाठी १५ मिलियन डॉलर्स होते. ‘सी’ या ॲपल टीव्हीवर उपलब्ध सिरीजचेही बजेट प्रत्येक भागासाठी १५ मिलियन डॉलर इतके होते. ‘क्राऊन’ या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजचे बजेट प्रत्येक भागासाठी १३ मिलियन डॉलर इतके होते. आजवर मार्व्हलने ‘मार्बल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ शृंखलेत बनवलेल्या लोकी, फाल्कन, द विंटर सोल्जर, वांडा व्हीजन अशा सर्व सिरीजच्या प्रत्येक भागाचे बजेट २५ मिलियन डॉलर इतके होते. वेस्टवर्ल्ड, डेडवूड यादेखील अत्यंत महागड्या वेब सिरीज आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या स्वतःच अवाढव्य मालिकांची निर्मिती करत आहेत. याच ट्रेंडचे अनुसरण करत नेटफ्लिक्सदेखील मालिकांची निर्मिती करत आहे. ‘फ्रेंडस्’ ही नेटफ्लिक्सवरील सर्वांत जास्त यशस्वी मालिका आहे. ‘फ्रेंड्स’चे बजेट प्रत्येक भागासाठी १० मिलियन डॉलर इतके होते. फ्रेंड्स बनवणाऱ्या वॉर्नर ब्रदर्सने स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला, त्यामुळे नेटफ्लिक्सवरून ही मालिका निघून गेली. अशा कारणांमुळे अनेक प्लॅटफॉर्म स्वतःच सिरीज तयार करत आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करण्यासाठी मोठ्या बजेटच्या भव्य मालिका तयार करण्यावर हे प्लॅटफॉर्म भर देत आहेत.
नेटफ्लिक्सने नुकतीच ‘ग्रे मॅन’ या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे बजेट आहे २०० मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे १६०० कोटी रुपये. हा चित्रपट तयार करण्याचे मुख्य कारण म्हणजे नेटफ्लिक्सकडे ॲव्हेंजर्स, मार्व्हलसारखा स्वतःचा असा कोणताही सुपर हिरो नव्हता. त्यामुळे ग्रे मॅन हा स्वतःचा सुपर हिरो योजून त्याचे युनिव्हर्स तयार करण्याची नेटफ्लिक्सची योजना आहे. मार्व्हलचे उदाहरण नजरेसमोर ठेवून नेटफ्लिक्स भविष्यात ग्रे मॅनवर आधारित चित्रपट आणि सिरीज बनवणार आहे.
अशा भव्य सिरीजच्या निर्मितीमागचा एकमेव उद्देश प्रेक्षकांची, सबस्क्राईबरची संख्या वाढवणे हाच आहे. अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत जास्तीत जास्त दर्शकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि सबस्क्राईबरची संख्या वाढवण्यासाठी अशा मोठ्या बजेटच्या सिरीज तयार केल्या जात आहेत. या सिरीज जाहिरातींच्या पैशांवर अजिबात अवलंबून नसतात. या सिरीज कलानिर्मितीच्या आवडीखातर तयार केल्या जातात; मात्र, अशा स्थितीत एक वेबसिरीज दुसऱ्या वेबसिरीजला टक्कर द्यायच्या नादात आणखी जास्त खर्चिक होत चालल्या आहेत. सध्याच्या काळात सिरीजचे बजेट कोटींवरून अब्जांवर पोचले आहे हे मात्र खरे!