

GR Iranna artist journey
sakal
कलाप्रवासात शब्दांच्या पलीकडली कथा सांगणारी, अदृश्याला दृश्य- मूर्त रूप देणारी ताकद असते. एखाद्या कलाकाराला ती जन्मभर साथ देते किंवा साक्षात्कारासारखी चमकून जाते. चित्रकार जी. आर. इरन्ना यांच्यासाठी ती ताकद ही जगाकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन देणारी शक्ती आहे. आपला दृष्टिकोन इतरांनाही दृष्टी देईल, असा त्यांचा प्रयत्न आहे.
चित्रकार जी.आर. इरन्ना दिल्लीत स्थायिक झाले आहेत. कला त्यांचा व्यवसाय आणि तीच त्यांचा साथीदारही आहे. अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन झाले आणि त्याच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकार फरीद झकेरिया यांनी त्यांची मुलाखत घेतली. या निमित्ताने जगभरातील कलाप्रेमींचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. ज्यांना इरन्ना यांच्या हिंदुस्तानातील कामाची कल्पना आहे ते हेच सांगतील, की त्यांचा कलाप्रवास सातत्याने केलेला खोल विचार आणि कामाबद्दलची अथक निष्ठा यांवर बेतलेला आहे.