ज्योती झाली ज्वाला!

पोटगीच्या प्रश्नावरही मोठं आंदोलन उभं राहिलं. त्यानंतर पोटगीसाठी अगदी अगतिक झालेल्या महिलेतून एक एक रणरागिणी तयार व्हायला लागली.
great agitation on the issue of alimony divorce marriage dispute neelam gorhe women empowerment
great agitation on the issue of alimony divorce marriage dispute neelam gorhe women empowermentSakal

- डॉ. नीलम गोऱ्हे

आजही काही जणांना दोन लग्नं करण्यात गैर वाटत नाही. अशा व्यक्ती राजरोस दोन्ही संसार सांभाळताना आम्हाला दिसत होत्या. मुळात ज्या पतीला स्त्रीबरोबर राहायचं नसेल तर त्याला आपण सक्ती कशी करणार, अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधायला आम्ही सुरुवात केली. पोटगीच्या प्रश्नावरही मोठं आंदोलन उभं राहिलं. त्यानंतर पोटगीसाठी अगदी अगतिक झालेल्या महिलेतून एक एक रणरागिणी तयार व्हायला लागली.

संघटनेचं काम सुरू करून तीन-चार वर्षं झाली आणि एक वेगळाच प्रश्न समोर यायला लागला. तो म्हणजे अनेक महिला सांगायला लागल्या, की पतीने दुसरं लग्न केलं आणि गुपचूप संसार थाटला. त्यातील एक तर, आमच्या नेहमीच्या बैठकीत सहभागी होणारी महिला होती.

ती माझ्या दवाखान्यात एक दिवस तब्येत दाखवायला आली होती. प्रचंड अस्वस्थ होती. धाय मोकलून रडायला लागली. तिला चार मुलं होती. एक दहा वर्षांचा, एक सात वर्षांचा आणि एक मुलगी चार-पाच वर्षांची होती. ती सांगत होती, की एका दवाखान्यात ती गेली असता तिला नाव विचारण्यात आलं.

अशाच एका नावाचा दुसऱ्या महिलेचाही पेपर आहे, असं तिला सांगण्यात आलं. त्यात पतीचं नाव तेच... आडनावही तेच. तिचा विश्वासच बसेना. विशेष म्हणजे, त्या बाईचं नावही त्याच सुमारास बाळंतपणासाठी नोंदवण्यात आलं होतं.

एकाच वेळी दोन महिलांशी तो माणूस संसार करत होता आणि १२ ते १५ वर्षांच्या काळात दोघींना चार चार मुलं झाली होती. अशा वेळी पाचव्या मुलाच्या बाळंतपणाच्या वेळी संबंधित महिलेच्या (टोपण नाव स्नेहा) लक्षात आलं, की पतीने दुसऱ्या बाईबरोबर संसार केला आहे. तिने पत्ता शोधला तर धक्काच बसला.

कारण घरापासून साधारण १५ मिनिटांच्या अंतरावर त्याने दुसरा संसार थाटला होता. बेमालूमपणे तो दोन्ही संसार सांभाळत होता. दोन्हीकडे जाणं-येणं करायचा. अशा फसवणुकीचं स्नेहाला खूप वाईट वाटलं. संसार सोडावा, असं वाटून गेलं; पण एक मूल पोटात आणि तीन घरी होती.

तिची अशी अवस्था पाहून माहेरच्यांनी सांगितलं, की आम्ही लग्न लावून दिले तेव्हा काय माहीत नव्हतं तो असं काही करेल ते. आता तू आणि तुझं नशीब! त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की बऱ्याच जणांना दोन लग्नं करण्यात काहीच गैर वाटत नाही. अशा व्यक्ती राजरोस दोन्ही संसार सांभाळताना आम्हाला दिसत होत्या.

आता प्रश्न असा निर्माण झाला, की बहुपत्नीकत्वाला बंदी आहे. कायद्याने दुसरं लग्न दखलपात्र गुन्हा जरी नसला तरीही त्याच्याबद्दल शिक्षेचं कलम आहे. जर गुन्हा सिद्ध झाला तर त्यात शिक्षा होऊ शकते.

आता अशा वेळी द्विभार्या प्रश्नाच्या निमित्ताने अजून एक मुद्दा समोर आला. तो म्हणजे, संबंधित पुरुष दोन्हीकडचा संसार करत असला तरी तो दोघींना पूर्ण न्याय देऊ शकत नाही. दुसरीकडे बेताचीच परिस्थिती असेल तर त्या महिलेची ओढाताण व खरं तर दोघांची परवड ठरलेलीच असते.

त्याही पलीकडे काही कुटुंबांमध्ये असं दिसायला लागलं की पहिल्या किंवा काही वेळा दुसऱ्या पत्नीकडे तो पूर्णपणे पाठ फिरवतो. मग समाजात वेगळाच प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे समाजाच्या टाकून दिलेल्या पत्नींचा. त्यांना आपल्या समाजात परित्यक्ता असं नाव दिलेलं आहे.

त्या काळात महाराष्ट्रामध्ये हळूहळू त्याबाबतचा प्रश्न समोर यायला लागला. काही स्त्रियांनी त्याबद्दल न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. त्या तीन कायद्यांन्वये न्यायालयात सुरू असतात. एक म्हणजे, पोटगीचा कायदा, ज्याला आपण सगळे सीआरपीसी १२५ म्हणतो. त्यानुसार गुन्हेगारी कायद्याप्रमाणे पोटगी मिळते.

दुसरा कायदा म्हणजे सिव्हील म्हणजे दिवाणी दाव्यांच्या माध्यमातून पोटगीच्या केसेस केलेल्या होत्या. तिसरा म्हणजे वैवाहिक हक्कांची परतफेड. म्हणजे पतीने नांदावं म्हणून त्याबद्दलचा कायदा. त्यानंतर बरेच कायदे बदलले गेले. तसंच आपल्या चळवळीतूनही काही फरक झाला; परंतु मुळात ज्या पतीला स्त्रीबरोबर राहायचं नसेल तर त्याला आपण सक्ती कशी करणार, अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधायला आम्ही सुरुवात केली.

हळूहळू असं लक्षात आलं, की पुरुष असो किंवा स्त्री त्यांना आपण नांदण्याची जबरदस्ती करू शकत नाही. मात्र, मुलं आणि कुटुंबांना कायद्याच्या चौकटीत ठेवून त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात त्यासंदर्भामध्ये आपण काही नियमांचा आधार घेऊ शकतो.

मग परित्यक्त्यांचा किंवा एकल महिलांच्या प्रश्नांवर स्त्री आधार केंद्राचं काम हळूहळू वाढत गेलं. त्याच सुमारास आम्ही पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक भागात फिरते महिला मदत केंद्र सुरू केलेलं होतं. क्रांतिकारी महिला संघटना आणि स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या पुणे जिल्ह्याच्या तालुक्या-तालुक्यांमध्ये ठराविक दिवशी जात असत आणि तिथे जनतेशी संपर्क साधला जाई.

संपर्कातील महिलांच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदार, तालुका किंवा गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याचं काम होत असे. दुसरं कायदेविषयक प्रशिक्षण आणि त्याचबरोबर बँकांची अन् आरोग्याची माहिती असे आम्ही १६ विषय तयार केले होते. त्याला ‘गृहिणी शिक्षण वर्ग’ असं नाव दिलं होतं.

थोडक्यात, घरातील संसार करत असताना संबंधित महिलेला समाजातील व्यवहारही कळावेत आणि त्याबद्दलचे कायदे व योजनांची माहिती व्हावी म्हणून आम्ही आठवड्यातून एक दिवस अशा प्रकारे चार महिन्यांचा कार्यक्रम सुरू केला.

त्याची तोंडी परीक्षाही घेत असे. सहभागी महिलांना प्रमाणपत्रही देत होतो. सोशल सर्व्हिस इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, कधी कधी माझ्याबरोबर एखाद्या कार्यकर्त्याची सही घेऊन महिलांना प्रमाणपत्र देत असू. त्यामुळे गावागावांच्या महिला आनंदित व्हायच्या.

महिला मंडळाच्या कामाबरोबरच चारचौघांमध्ये वावरू शकू अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळालं, असं त्यांना वाटून जाई. सगळ्या बैठकांमध्येही ठिकठिकाणी पोटगीच्या केसेस असलेल्या महिला भेटायला लागल्या. त्यांच्या अनेक तक्रारी होत्या.

पती पोटगीला येतच नाही, न्यायालयात हजर होत नाही वगैरे वगैरे... त्या काळात कायद्यात अशी तरतूद होती, की पती जर हजर झाला नाही तर तशा प्रकारची वकिलाची सही तिला घ्यायला लागायची. त्यासाठी तो वकील फी मागायचा. अशा प्रकारे त्यांची अडवणूक होत होती. आजही काही प्रमाणात असे प्रश्न आहेत;

परंतु कायद्यात दीड हजारपर्यंतच पोटगीची तरतूद होती. काही काळ पाचशे रुपयांपर्यंत पोटगीची तरतूद होती. नंतर मग पोटगीची रक्कम वाढत वाढत दीड हजारपर्यंत गेली. एवढे होऊन पोटगी मिळाली तरी त्याची अंमलबजावणी होत नसे. अनेकदा काही पतीराज म्हणायचे, वेळप्रसंगी तुरुंगात जाईन; पण मी पोटगी देणार नाही. मी तुरुंगात खडी फोडेन; पण पोटगी देणार नाही... मग अशा पोटगी मागणाऱ्या महिला आजही आपल्याला न्यायालयात ठिकठिकाणी दिसतात.

दुसऱ्या लग्नाची मान्यता आहे अशा समाजातील महिलांमध्ये मात्र हळूहळू काडीमोड करून घ्यायचा अशा पद्धतीने साधारण प्रघात वाढलेला दिसायला लागला. काही ठिकाणी एकदमच एकरकमी अशी संपूर्ण आठ-दहा वर्षांची पोटगी एकत्रित घ्यायची आणि दोघांनी काडीमोड करायचा वा संमतीने घटस्फोट घ्यायचा, असा प्रघात दिसायला लागला.

नंतर मुलगा-मुलगी यांचे पुनर्विवाह होताना दिसायला लागले. आता असं सगळं घडत असताना समाजाच्या काही घटकांमध्ये आजही मुलीला पुनर्विवाह करायला विरोध आहे. त्याला मान्यता नाही. काही समाजात बदल चाललेला आहे. ज्या समाजाचा विरोध आहे ते आज उघडपणे बोलत नाहीत. मुलीला माहेरी आणून सोडलं की तिने मरेपर्यंत तिथेच राहायचं किंवा स्वतंत्र जगायचं.

तिची कोणी काळजी घेतं किंवा नाही घेत! ती आणि तिचं नशीब... इतकंच नव्हे; तर तिचं नावसुद्धा पत्रिकेत काही ठिकाणी एकटं म्हणून टाकलं जात नाही. भावांच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम असेल तर तिला तिथे प्रतिष्ठा असते.

जिथे प्रेम नसेल तिथे तिचा वाटा भाऊ स्वतःकडे घेतो. अशाही काही गोष्टी आपल्याला समाजात दिसून येतात. त्यामुळे पोटगीच्या प्रश्नावर मग मोठं आंदोलन उभं राहिलं. त्यामधून अनेक महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं.

त्यातून कार्यकर्त्या तयार होऊ लागल्या. त्या समाजाचं नेतृत्वही करायला लागल्या. पोटगीसाठी अगदी अगतिक झालेल्या महिलेमधून एक एक रणरागिणी आणि स्वतःच्या हक्कासाठी लढणारी स्त्री कार्यकर्ती तयार व्हायला लागली.

म्हणून मी असं म्हणेन, की ‘ज्योती बने ज्वाला’ अशा प्रकारचं वातावरण समाजामध्ये उभं राहिलं. त्यातून स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या कामाचा पाया समाजात अगदी खोलवर रुजला. प्रत्यक्षातही माझी मैत्रीण व आमची धुरंधर कार्यकर्ती ज्योती कोटकर हिने ३५ वर्षें त्या कामात झोकून दिलं. तिच्या व आमच्या सर्वच कामांतून समाजाचा विश्वासही स्त्री आधार केंद्राच्या कामावर वाढायला लागला. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ज्योती झाली ज्वाला!

neeilamgorhe@ gmail.com (लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com