विचारांच्या वाळवीवर उपाययोजना करण्याची गरज

प्रशांत आर्वे चंद्रपूर Prashantarwey250@gmail.com
रविवार, 12 जानेवारी 2020

आजही आम्ही जातीय आधारावर गावागावातून आणि शहरातून वस्त्या जोपासल्या आहेतच. एकीकडे जगातील "सर्वेपि सुखीन संतु' हा उदात्त विचार आम्ही मांडला; मात्र त्याच समाजाने माणसाचे माणूसपण नाकारले. स्मार्ट सिटी करण्याच्या नादात माणसे स्मार्ट झालीच नाहीत. उलटपक्षी माणूस जितका जास्त शिकलेला तितका जास्त जातीशी बांधलेला हे चित्र त्रास देणारे आहे.

बरेच दिवसांत पुस्तकांकडे जरा दुर्लक्षच झाले; म्हणून घरातल्या छोटेखानी ग्रंथालयात डोकावलो. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या "गांधी बीफोर इंडिया' या पुस्तकातील एका संदर्भासाठी ते पुस्तक कपाटातून काढायला गेलो आणि बघतो तर काय! त्या पुस्तकासह अन्य अनेक पुस्तकांचा वाळवीने अक्षरश: फज्जा उडविला होता. डॉ. सदाशिव शिवदे यांचे "ज्वलज्वलंततेजस संभाजी', "मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने', "बाळशास्त्री हरदासांची महाभारतावरील व्याख्याने', जीएंचे "निळासावळा', "प्यापिलान' आणि बऱ्याच अशा पुस्तकांच्या चिंध्या झाल्या होत्या. या वाळवीने मात्र विचारांचे काहूर निर्माण केले. वाळवीच्या हल्ल्यात नष्ट झालेली पुस्तके कदाचित पुन्हा जमवता येतीलही; परंतु आमच्या समाजाला ज्या जातीय, अतिवादी, धर्मांध आणि एकारलेपणाच्या वाळवीने ग्रासले आहे त्याचे काय? परम वैभवच्या कल्पनेत आम्ही आमचा समाज अनेकविध पातळीवर आजारांनी ग्रस्त आहे हे ध्यानात घेतोय का? राष्ट्रवादी विचार अलीकडे फारच ठळक होत जाताना पुन्हा आपल्याला आगरकर आणि टिळक यांच्यातील वादाची आठवण यावी. आजही आम्ही जातीय आधारावर गावागावातून आणि शहरातून वस्त्या जोपासल्या आहेतच. एकीकडे जगातील "सर्वेपि सुखीन संतु' हा उदात्त विचार आम्ही मांडला; मात्र त्याच समाजाने माणसाचे माणूसपण नाकारले. स्मार्ट सिटी करण्याच्या नादात माणसे स्मार्ट झालीच नाहीत. उलटपक्षी माणूस जितका जास्त शिकलेला तितका जास्त जातीशी बांधलेला हे चित्र त्रास देणारे आहे. आज तुम्ही समाजाला काही सांगू पाहताय? काहीही उपयोग नाही. कारण प्रत्येकाने आपल्या विचारांचा किंवा नेत्याचा झेंडा आपल्या मुठीत इतक्‍या घट्टपणे आवळून धरलाय की त्याचे कान बधिर आहेत आणि डोळे घट्ट मिटलेले. त्याला वेगळे काही ऐकायचेही नाही आणि बघायचेही नाही. या साऱ्या गोंधळात भर घालण्याचे काम सरकार नावाची यंत्रणा करीत असते. दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी म्हणायचे, "सरकार आमच्या समस्या सोडवू शकत नाही, कारण सरकार स्वतः एक समस्या आहे.'
लवकरच आम्ही स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहोत. त्याला सामोरे जाताना समाज म्हणून विकासाच्या कोणत्या पायरीवर आम्ही उभे आहोत, हे प्रत्येकालाच बघावे लागणार आहे. मनात खदखदणारा ज्वालामुखी घेऊन हा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत? की जगाच्या पाठीवरील एक प्रगल्भ समाज म्हणून सामोरे जाणार आहोत?
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी सांगितलेला एक प्रसंग. विदर्भातल्या मे महिन्याच्या उन्हात ते नेहमीप्रमाणे जंगलातून प्रवास करीत होते. अरण्यातील वाटातून त्यांची जिप्सी जात असताना अचानक चालकाने गाडी थांबवली. समोर रस्त्यावर काही प्रौढ माकडे वर्तुळ करून झोपलेली त्यांनी बघितली. काय प्रकार आहे काही कळेना म्हणून त्यांनी चालकाला बघायला सांगितले. तो हातात काडी घेऊन त्या माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न करू लागला; मात्र माकडे काही जागची हलेना. आणखी समोर जाऊन बघितल्यावर लक्षात आले की माकडे अगदी गतप्राण झाली होती आणि आजूबाजूच्या निष्पर्ण झाडांवर त्यांची लहान लहान बाळे प्रचंड आरडाओरडा करीत होती. तो प्रसंग हेलावून टाकणारा होता. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जंगलातील पाणी आणि चारा कमी झालेला असतो. जी काही संसाधने उपलब्ध आहेत त्यावर केवळ काहींची गुजराण होऊ शकते. आपली पुढील पिढी जगली पाहिजे, त्यांना चारा, पाणी पुरला पाहिजे म्हणून माकडांच्या अख्ख्या प्रौढ पिढीने प्राणत्याग केला होता. प्राणी जर आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी इतका मोठा त्याग करू शकतात तर आम्ही तर शेवटी माणसे आहोत.
येणारा काळ हा संघर्षाचा आहे म्हणून आम्ही एकमेकांची डोकी फोडायला लागलो तर डोळ्याला डोळा या न्यायाने हे जग आंधळे होऊन बसेल. आज गरज आहे ती विवेकी माणसांनी एकत्र येण्याची. डावा असो की उजवा यांच्यातील विवेकी माणसे एकत्र येऊन एका नव्या समाजाच्या निर्माणाच्या दिशेने प्रयत्न करीत राहणे ही काळाची गरज आहे. हे प्रयत्न लहान असतील, त्याचा आवाजदेखील क्षीण असेल मात्र हेच आवाज उद्याच्या आश्वासक समाजाची निर्मिती करू शकतात. सर्वसमावेशकता हा या देशाचा आत्मा राहिलेला आहे. एकारलेपण आम्हाला विनाशाकडे घेऊन जाईल. देशात पुतळ्यांची उंची वाढत असताना समाजातील माणसे विचारांनी खुजी झालेली कशी चालेल? वाळवीग्रस्त समाज स्वतःला, स्वतःच्या पिढ्यांना आणि जगालादेखील काही भरीव देऊ शकत नसतो, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Growth of mind stoped in new era