गार्ड ते पार्क ! पोरांनी केली करोडो रुपयांच्या उद्योगांची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TIM HOGINS

गार्ड ते पार्क ! पोरांनी केली करोडो रुपयांच्या उद्योगांची निर्मिती

टीम हॉगिंस हा आफ्रिकेतील गरीब घरात जन्मला. त्याच्या वडिलांचा एक छोटासा कॅफे होता, जिथे ते बर्गर वगैरे विकत असत आणि त्याची आई ते बर्गर तयार करत असे. लहानपणी टीम सुटीच्या दिवशी त्याच्या वयाच्या मुलांना वेगवेगळ्या पार्कमध्ये जाताना पहात असे. त्याच्या गावातून या पार्कला जायला बस असायची.

या मुलांचे आई-वडील त्यांना खेळण्यासाठी, करमणुकीसाठी वेगवेगळ्या पार्कमध्ये शहरात घेऊन जात असत. लहान मुलांच्या आनंदी आवाजाने भरलेली ही बस शहराकडे जाताना पाहून टीम खूप खट्टू व्हायचा. त्यांच्या घरची परिस्थिती शहरात जाऊन अशा पार्कमध्ये मनोरंजन करण्याची नव्हती. त्याने त्याचवेळी ठरवले की आपण मोठे झाल्यावर मुलांसाठी असे पार्क तयार करायचे, की जिथे जायला पैसे लागणार नाहीत. विशेषतः उपेक्षित मुलांसाठी असे पार्क तयार करायचे.

टीम दहावीपर्यंत शिकला. त्यानंतर शिक्षण घेणे त्याला परवडणारे नव्हते. त्याचवेळी त्याला कुणीतरी एका मोफत कोर्स विषयी सांगितले. चार आठवड्यांच्या त्या कोर्स नंतर त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळणार होती. हा मोफत कोर्स त्याने केला आणि त्यानंतर त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. या मोठ्या कंपनीचा कारभार तो रोज पाहू लागला. आपणही असे मोठे उद्योजक बनायचे, हे त्याने ठरवले. दोन वर्षे आपले काम तो व्यवस्थित करत होता.

दोन वर्षांनंतर पुन्हा एक संधी त्याच्याकडे चालून आली. एक कोर्स केल्यानंतर त्याला कॉम्प्युटरवर हिशेबाचे काम करायला मिळणार होते. कंपनीत त्याला नोकरी लागली. त्याच्या आयुष्यात त्याने कधीही यापूर्वी कॉम्प्युटरला हात देखील लावला नव्हता. मात्र, आपले काम तो अगदी व्यवस्थित करत असे; पण त्याच्या मनामध्ये अजून पुढे जायचे होते. त्याला आपल्या स्वतःचा उद्योग करावा, असे वाटू लागले.

त्याच्या डोक्यात उद्योगाच्या अनेक कल्पना आल्या. त्यातील एका कल्पनेवर त्याने बऱ्यापैकी अभ्यास सुरू केला. ‘आउट डोअर जिम’ काढण्याची ही कल्पना त्याला प्रत्यक्षात आणावी असे वाटू लागले. तो जिथे काम करत होता तिथल्या मालकांना मात्र हे आवडले नाही. एक तर त्याने नोकरी करावी, किंवा अशा उद्योजकीय कल्पनांचा पाठपुरावा करावा, असे त्या मालकांनी त्याला सांगितले. टीमने हातात काहीही नसताना नोकरी सोडली आणि तो आपल्या स्वतःचे आउटडोर जिम काढण्याच्या मागे लागला. तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप निर्माण होतात. टीमला एक गुंतवणूकदार भेटला.

टीमने जीव तोडून काम केले आणि स्वतःचे एक आउटडोर जिम तयार केले. या त्याच्या यशस्वी उद्योगानंतर टीमने कधीच मागे वळून पाहिले नाही. दक्षिण आफ्रिका आणि इतरही अनेक देशांमध्ये टीमचे आउटडोर पार्क आहेत. तरी अनेक पार्कमध्ये वर्षाचे काही दिवस तो उपेक्षित मुलांना मोफत सोडत असतो. ‘एखादी गोष्ट अशक्य आहे असे जेव्हा कळते, तेव्हा मला ती गोष्ट आकर्षित करून घेते. मग मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करू लागतो आणि ती हस्तगत करतो.’ टीमने आपल्या यशाचे रहस्य मोजक्यात शब्दात सांगितले आहे;

पण केवळ आपण स्वतः यशस्वी होऊन तो थांबलेला नाही तर आफ्रिकेतल्या अनेक गरजू, गरीब, होतकरू मुलांना तो उद्योग करायचे प्रशिक्षण मोफत देत असतो. आपल्याला आलेली संधी नीटपणे घ्या आणि त्या संधीला यशात रूपांतरित करा, असे तो या मुलांना सांगत असतो. अवघ्या ३५ वर्षांचा असलेला टीम करोडपती तर आहेच; पण आपले स्वप्न पूर्ण केल्याचे अपार समाधान त्याच्या जवळ आहे.

जेव्हा गरिबी असते, तेव्हाच तुमचे मन सृजनात्मक विचार करते. म्‍हणून गरिबीला आपली ताकद बनवा.