गुजरातने केली स्टार्टअपमध्ये उत्कृष्ट कामगिरी

Startup-Gujrat
Startup-Gujrat

काही वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाचे रतन टाटा यांनी पश्‍चिम बंगालमधील त्यांचा प्रकल्प हलवून गुजरातमध्ये आणल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाटांना उद्योग उभारणीसाठी सर्व प्रकारची मदत देऊ केली होती. राज्याची औद्योगिक प्रगती करण्यासाठी मोदी यांनी वीज, पाणी, वाहतूकव्यवस्था अशा मूलभत सोयी उपलब्ध केल्या. मोदी पंतप्रधान झाल्यावर देशात नवउद्योजक तयार होण्यासाठी त्यांनी ‘स्टार्टअप’ला प्रोत्साहन दिले. त्याचवेळी त्यांच्या स्वतःच्या राज्यातही स्टार्टअपची संख्या कशी वाढेल, याकडे लक्ष दिले. यातूनच देशभरातील स्टार्टअपच्या यादीत गुजरात ‘उत्कृष्ट कामगिरी’ करणारे राज्य ठरले आहे. 

गुजराती माणूस हा उद्यमशील म्हणून ओळखला जातो. परंपरागत व्यवसायांमध्ये गुजरात आघाडीवर असले, तरी आज तंत्रज्ञानाशी संबंधित स्वयंरोजगारही या राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गुजरात युनिव्हर्सिटी स्टार्टअप व आंत्रप्रेन्युअरशिप कौन्सिल ‘ग्युसेक’ ही संस्था नवोद्योजकांसाठी आणि नवनिर्मितीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी स्टार्टअप उद्योजक व नवकल्पकांना साह्य करते.

तंत्रज्ञानविरहित संशोधनालाही ही संस्था प्रोत्साहन देते. त्याचप्रमाणे गुजरात सरकारच्या २०१५मधील नव्या औद्योगिक धोरणानुसार स्टार्टअपद्वारे राज्यातील युवा पिढीला भविष्यात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्टार्टअप आणि इनोव्हेशनसाठी विविध योजनांची आणखी पाच वर्षांसाठी करण्यात आली. नवोदित आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विशेष सवलतींना मान्यता देण्यात आली आहे. त्यांना कर्जाऊ रकमेवरील व्याजामध्ये सवलत देण्याबरोबरच, रोख अंशदान, मार्गदर्शक, सल्लागार उपलब्ध करून देणे असा मदतीचा हात सरकारने देऊ केला आहे. यामुळे गुजरातमधील उद्योग क्षेत्राची झपाट्याने वाढ होण्यास मदत 
होणार आहे. 

उद्योग उभारणीच्या काळात सहकार्य करणे, बीजअनुदान, संस्थात्मक समर्थन, कायदा व नियम सोपे करणे आदी सात मुद्यांवर गुजरातने स्टार्टअपमध्ये अन्य राज्यांपेक्षा भरीव कामगिरी केली आहे. सरकारच्या योजनेखाली सुरू असलेल्या स्टार्टअप व्यवसायांची संख्या गुजरातमध्ये ३३ आहे. त्याआधारे २३६ स्टार्टअप राज्यात चांगल्या प्रकारे सुरू आहेत. यात औषधनिर्माण, वैद्यकीय, आरोग्य, अन्न आणि आहार, भूरचनाशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील स्टार्टअप प्रगतिपथावर आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com