

Gulzar Birthday
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
प्रिय गुलजार...
तुम्हाला आदरार्थी अहो-जाहो म्हणू की एकारार्थी संबोधू? याबद्दल माझ्या मनात आत्ता गोंधळ उडाला आहे. अजून दोन दिवसांनी तुमचा वाढदिवस. माझ्यापेक्षा तुम्ही ५३ वर्षांनी मोठे, म्हणजे आजोबांच्या वयाचे. पण आज या पत्रापुरतं तरी मी तुम्हाला एकारार्थी संबोधतो!
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
जिंदगी है, बहने दो
प्यासी हूँ मै प्यासी रहने दो
हे गाणं मी जेव्हा ऐकलं तेव्हा सतरा-अठरा वयाच्या विचित्रशा टप्प्यावर होतो आणि डोक्यात एकदम ट्यूब पेटली. मला तेव्हा जीवनाबद्दल एकाच वेळी आकर्षण आणि त्याच वेळी मरणाची हवीहवीशी भीतिदायक ओढ वाटत होती. या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर तरंगण्याच्या त्या वयात हे गाणं कानावर पडलं आणि मेंदूचा अँटेना हे गाणं कुणी लिहिलंय याचा शोध घेऊ लागला. मग समजलं की, गुलजार नामक कवी-गीतकार आहे. आणि हळूहळू आणखी खोदत गेल्यावर मला तुझी एकाहून एक सरस गाणी सापडू लागली.