‘येलूर’ वन्स अगेन

वाळवे तालुक्यातील येलूर गावाने गेल्या मेमध्ये सुमारे पस्तीस वर्षांनंतर ‘ हा खेळ नशिबाचा’ या नाटकाचा प्रयोग सादर केला.
ha khel nashibacha drama after 35 years in yelur village
ha khel nashibacha drama after 35 years in yelur village Sakal

वाळवे तालुक्यातील येलूर गावाने गेल्या मे मध्ये सुमारे पस्तीस वर्षांनंतर ‘ हा खेळ नशिबाचा’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. ही घटना ग्रामीण नाट्यचळवळीचे जणू पुनरुज्जीवनच आहे. सर्व कलावंतांनी नव्या जोमाने हा डाव पुन्हा मांडण्याचा निर्धार केला.

यंदा नव्या वर्षात पुन्हा एकदा ‘नाती तुटली रक्ताची’ नाटकाचा प्रयोग होत आहे. खेड्यातही कुटुंबातला, समाजातला संवाद तुटल्याची खंत व्यक्त होत असताना असे नाट्यप्रयोग त्यावरचा उपाय आहे.

- धनाजी चव्हाण, इटकरे

पन्नास वर्षांपूर्वीपासून नाट्यपरंपरा असणाऱ्या वाळवा तालुक्यातील येलूर गावातील नाट्यचळवळ आता पुन्हा जोर धरत आहे. गावातील हौशी कलाकारांनी बसवलेल्या नाटकांची पुनर्बांधणी करून जुन्या व नव्या दमाचे हौशी रंगकर्मी गावच्या रंगभूमीला ऊर्जितावस्था आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या काळी सादर झालेल्या नाटकांची जाहिरात पत्रके येलूरकरांनी अडचणीच्या काळात जोपासलेल्या नाट्यपरंपरेची आजही साक्ष देत आहेत.

सत्तर-ऐंशीच्या दशकात येलूर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ‘बोलकी भिंत’ नाटक बसवले. त्याचा पहिला प्रयोग गावातील बाजारपेठेत सादर झाला. त्या वेळची वेशभूषा म्हणजे घरातल्या ज्येष्ठांची जुनी धोतरं, साड्या, विजार, टोपी, पुठ्ठ्याचे मुकुट अशी मिळेल ती असायची.

उपलब्ध रंगभूषा, वेशभूषा आणि नेपथ्याच्या जोरावर सादर झालेल्या या नाटकाचा प्रयोग मात्र त्या वेळी चांगलाच गाजला. जुन्या काळातील रामू अण्णा रेडकर, बाबा दुकानदार, नांगरे गुरुजी, राम कांदेकर, रंगूतात्या,

पांडुरंग कागलकर, गोविंद महाडिक, जे. टी. महाडिक ही नाटकवेडी माणसं धडपडणारी. त्यांनी शाळेच्या मुलांना ऐतिहासिक, पौराणिक नाटिकांमधून छोट्या-छोट्या भूमिका द्यायला सुरवात केली. गणेशोत्सवात गणेशविवाह, महाभारत, रामायणातील प्रसंग सादर व्हायचे. दररोज वेगवेगळे प्रसंग सादर होत असल्याने प्रेक्षकही जमायचे.

त्यातूनच वसंत जाधव लिखित ‘सोयरीक’ हे कौटुंबिक नाटक बसवले गेले आणि गावची रंगमंचीय वाटचाल सुरू झाली. कलाझंकार नाट्य मंडळाची पहिली स्थापना केली गेली. या संस्थेतर्फे बसवलेल्या ब्रह्मानंद शिंदे लिखित ‘हा खेळ नशिबाचा’ या तीनअंकी नाटकाचे गावातील बाजारपेठेत तीन प्रयोग झाले. नाटकाला प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर या रंगकर्मींनी गावकुसाबाहेर दौरे करायला सुरवात केली.

आसपासच्या कुरळप, इटकरे, ऐतवडे बुद्रुक, दुधगाव, नेर्ले, जक्राईवाडी येथे झालेल्या प्रयोगांना प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. हळूहळू गावात नाटक रुजायला लागलं. कला झंकार मंडळ, विठ्ठल प्रसाद नाट्यमंडळ, संघर्ष नाट्यसंपदा मंडळ अशी विविध नाट्यमंडळे उदयास आली. १९७३ मध्ये ‘सोयरीक’ हे नाटक सादर झाले.

१९७६ ला ‘गौरीशंकर’, ७८ ला ‘हा खेळ नशिबाचा’, ८२ ला ‘कशी ओवाळू रे भाऊराया?’ आणि १९८६ ला दुसऱ्यांदा ‘हा खेळ नशिबाचा’ अशी दर्जेदार नाटके गावातील नाट्यमंडळांनी सादर केली. यांसह ‘दसरा उजाडला’, ‘सरपंच खुनी-पाटील बेईमानी’, ‘धनी माझा कुंकवाचा’, ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘नयनी दाटले अश्रू’, ‘हा पिंजरा काटेरी’ आदी नाटके गावाच्या नाट्यचळवळीची साक्ष देतात.

त्या काळातील दिवंगत बाळासाहेब पाटील, रामू अण्णा रेडकर, बाबा दुकानदार, जे. टी. महाडिक यांच्यासह ब्रह्मानंद शिंदे, बाळासाहेब ठोंबरे, स्त्रीपात्र साकारणारे अर्जुन कुंभार, नामदेव पाटील, बाळासाहेब बोगर, सुनील पाटील, रणजित आडके,

अशोक गायकवाड, महिला कलाकार के. शकुंतला, निर्मला पवार (कोल्हापूर) आदींनी विविध नाटकांत काम केले. नाटक उभं करायचं म्हणजे केवळ माणसं उभी करून भागत नाही, तर आधी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

कलाकारांचे मानधन तर दूरच. या कलाकारांनीच अगदी जवळचे किडूक-मिडूक विकून आपली नाटकाची हौस पूर्ण केली. काहींनी कमरेचे करदोडे, हातातलं घड्याळ विकलं. सुरवातीच्या काळात अर्जुन कुंभार स्त्री भूमिका वठवत.

त्यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने आसपासच्या गावात नाटकांची मागणी होऊ लागल्यामुळे कलाकारांनी ४० ते ५० रुपये मानधन देऊन कोल्हापूरहून महिला कलाकाराला आपल्या संचात सहभागी करून घेतले. नाटकाला प्रतिसाद सुरू झाल्यानंतर सुरवातीला ५० पैसे, पुन्हा ७५ पैसे, नंतर एक रुपया अशी तिकिटाची आकारणी सुरू केली.

काही गावांत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी म्हणून नाटक सादर करून निधी उभारण्यात आला. तिकीट विक्रीतून आयोजकांकडे सरासरी २५० रुपये जमा व्हायचे. त्यातून स्त्रीपात्रासाठी ४० ते ५० रुपये, ढोलकीवादकाला १५ रुपये, सूरपेटी वादकाला १५ रुपये, पडदे व साऊंडसाठी २५ रुपये व अन्य खर्च ७० रुपये देऊन उर्वरित रक्कम मंदिरासाठी घेत होते.

त्या काळात गडकरी मास्तर, अकबर मास्तर, बापूसाहेब पटणे ढोलकी व पेटीमास्तर के. भानुदास यांनी चांगली साथ दिली. ब्रह्मानंद शिंदे यांनी लिहिलेले ‘हा खेळ नशिबाचा’ हे नाटक पुस्तक रुपात आणण्यासाठी वनश्री दिवंगत नानासाहेब महाडिक यांनी मदतीचा हात दिल्यामुळे आज ते उपलब्ध आहे.

१९९० नंतर हळूहळू मनोरंजनाची वेगवेगळी साधनं, माध्यमं ग्रामीण भागात आली. काही कलाकार काळाच्या पडद्याड गेले. त्यामुळे नाट्यपरंपरेला काही काळ खीळ बसली. पस्तीस वर्षांनंतर पुन्हा नाटक येलूरचे माजी सरपंच, तंटामुक्त गाव समि़ती अध्यक्ष राजन महाडिक यांनी, भावी पिढीने गावच्या आठवणी, कला जोपासाव्यात, या दृष्टीने त्या काळातील जुने कलावंत ब्रह्मानंद शिंदे, सुनील पाटील, रणजित आडके, अशोक गायकवाड यांना बोलावून घेऊन गावची बंद पडलेली नाट्यपरंपरा पुन्हा सुरू करण्याची कल्पना मांडली.

कलाकारांनी खर्चिक बाजू मांडली. जुन्या कलाकारांनी संमती दिली आणि ‘हा खेळ नशिबाचा’ हे नाटक चौथ्यांदा सादर करण्याचे ठरले. ‘व्हाईस ऑफ येलूर’ या नाट्यसंस्थेची स्थापना करण्यात आली. जे जुने कलाकार हयात नाहीत, त्या जागी नवीन कलाकारांची निवड झाली.

काही कालावधीतच नाटक तयार झाले आणि १ मे २०२३ ला येलूर बाजारपेठेत प्रयोग सादर झाला. रसिक प्रेक्षकांनी बाजारपेठ भरून गेली. चित्रपट अभिनेते भुईवाडीचे विजय साठे यांनी दिग्दर्शन केले. नाट्य-चित्रपट अभिनेत्री गीता पाठक,

लेखक ब्रह्मानंद शिंदे, कलाकार सुनील पाटील, रणजित आडके, अशोक गायकवाड, सूरज महाडिक, प्रवीण चव्हाण यांनी उत्कृष्ट काम केले. आता पुन्‍हा ‘नाती तुटली रक्ताची’ या प्रयोगाची घोषणा केली आहे. सहा महिन्यांत नाटकाची तयारीही केली आणि हे नाटक नुकतेच सादर झाले. नाट्यप्रेमींना अप्रुप वाटावे, असेच हे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com