Vijayanagara Empire Heritage Site
esakal
Vijayanagara Empire Heritage Site : विजयनगरचे वैभव आणि किष्किंधेचा इतिहास; सोलो ट्रिपमधून उलगडलेले हंपीचे सौंदर्य
विवेक जाधव- vivek.jadhav@esakal.com
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील पाच दिवस. या दिवसांत नेमकं कुठे जायचं, हे काही केल्या ठरत नव्हतं. अशातच अचानक हंपीला जाण्याचा विचार मनात डोकावला. समीर नावाच्या माझ्या मित्राने एका स्थानिक मार्गदर्शकाचा नंबर दिला. ९ तारखेला रात्री कल्याणहून हंपीसाठी ‘हॉस्पेट एक्स्प्रेस’चं तिकीट काढलं. ते कन्फर्म झालं. लगेचच दिलेल्या नंबरवर संपर्क करून रूमही बुक केली. आतापर्यंतच्या प्रत्येक प्रवासात मित्र सोबत असायचे; मात्र या वेळी हंपीला एकटा होतो. त्यामुळे हा प्रवास स्वतःशी होणाऱ्या संवादाचा, आत्मशोधाचा प्रवासही होता.
९ तारखेला रात्री कल्याणहून सुटलेली हॉस्पेट एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता हॉस्पेटला पोहोचली. रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षासह अज्जू भैय्या उभा होता. हॉस्पेट ते हंपी हे अवघ्या अर्ध्या तासाचं अंतर आहे; मात्र त्या अर्ध्या तासातच अज्जू भैय्याने, आमची पहिलीच भेट असूनही आम्ही अनोळखी आहोत, असं क्षणभरही जाणवू दिले नाही. हंपीच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच तो हसत मराठीत म्हणाला, ‘‘विवेक, आपलं हंपीत स्वागत आहे.’’ मी थोडं आश्चर्याने विचारलं, ‘‘हे तुला समीरने शिकवलं ना?’’ त्यावर तो अजून मोठ्याने हसत म्हणाला, ‘‘नाही सर, सोनल आक्काने शिकवले आहे.’’ मी हंपीत विरुपाक्ष मंदिराच्या शेजारीच खोली आरक्षित केली होती. हंपीत पोहोचल्यावर आधी खोलीवर गेलो. आंघोळ, नाश्ता उरकला आणि तोपर्यंत अज्जू भैय्याची रिक्षा हंपी दाखवायला जणू उतावीळच झाली होती. हंपी हे बेल्लारी जिल्ह्यात वसलेले एक ऐतिहासिक गाव आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे गाव प्राचीन विजयनगर साम्राज्याची भव्य राजधानी होती. तसेच, रामायणातील अनेक प्रसंगांशी संबंधित ठिकाणे हंपीत पाहायला मिळतात, ज्यामुळे हे ठिकाण केवळ ऐतिहासिकदृष्ट्या नव्हे, तर पौराणिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे ठरते.

