हॅपी बर्थ डे बार्बी!

गेली सहा दशकं जगन्मान्य असलेली बार्बी डॉल आता ६५ वर्षांची झालीय. आज आम्ही वयाने तिच्या इतके मोठे नाही, तरीही ‘ती’ अजूनही आमच्यापेक्षा किंवा आपल्या मुलांपेक्षाही लहान आहे.
barbie doll
barbie dollsakal

- निनाद बोडस

गेली सहा दशकं जगन्मान्य असलेली बार्बी डॉल आता ६५ वर्षांची झालीय. आज आम्ही वयाने तिच्या इतके मोठे नाही, तरीही ‘ती’ अजूनही आमच्यापेक्षा किंवा आपल्या मुलांपेक्षाही लहान आहे. तिचं असं लहानपण फारच लोभस आहे. तिने अवघं जग जिंकलंय आणि त्याआधी प्रत्येक बालमनाची मैत्रीण किंवा मित्र झालीय. प्रत्येक किशोरवयीन मुलीची जीवाभावाची सखी म्हणून आज ती मिरवतेय. थोडक्यात लहान मुलांचं विश्व बार्बीमय झालंय...

‘ती’ जशी होती तेव्हा

‘ती’ अशीच आजही आहे

तिचं दिसणं तिचं हसणं

आजही मोहक आहे...

मी जिच्याबद्दल बोलतोय ‘ती’ आज ६५ वर्षांची झाली. ‘ती’ आम्हाला आमच्या लहानपणी भेटली नि तारुण्यात येईपर्यंत तिने साथ दिली... प्रेमाचं गिफ्ट काय असतं ते तिनेच आम्हाला शिकवलं. आज आम्ही वयाने तिच्या इतके मोठे नाही, तरीही ‘ती’ अजूनही आमच्यापेक्षा किंवा आपल्या मुलांपेक्षाही लहान आहे.

तिचं असं लहानपण फारच लोभस आहे. खरं सांगायचं तर तिची कीर्ती, तिचा सहवास, तिचा संवाद, तिची आस, तिची साथ आणि तिचा आधार आमच्यासारख्या उपनगरांत राहणाऱ्यांपर्यंत यायला काही वर्षांचा अवधी जायला लागला. मजल-दरमजल करत करत ती आमच्यापर्यंत पोहोचली, भावली, खेळली, रमली नि आमचीच झाली... मी बोलतोय ते, ६५ वर्षं जगातील प्रत्येक लहान मुलीच्या भावविश्वात अधिराज्य गाजवणारी फॅशन डॉल ‘बार्बी’बद्दल.

तिने अवघं जग जिंकलंय. आपल्या विविध रूपांत आणि स्वरूपांत भावभावनांचं जाळं विणत तिने मुलांच्या इवलुशा हृदयात आणि मनात हक्काचा कोश निर्माण केलाय अन् त्यात आपला लहानपणीच्या सुखद आठवणींचा भुंगा अडकून पडलाय.

म्हणूनच आज आजी-आजोबा, आई-बाबा आणि भाऊ-बहिणीनंतर तिच्याच कुशीत जाऊन रुसलेल्या बच्चेकंपनीला मायेची ऊब मिळत आलीय. जगभरातील सर्वच मुलांशी तिची झालेली गट्टी आजही टिकून आहे. कट्टीच्या करंगळीची साथ सोडून बट्टीच्या दोन बोटांचा सहारा आजही ‘बार्बी’ नावाच्या डॉलसोबत मनात रुंजी घालतोय...

आज ६५ वर्षांच्या झालेल्या बार्बीच्या जन्माची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे. अमेरिकेतील रुथ हँडलर यांच्या मनात फॅशन डाॅलची संकल्पना जर्मनीत रुजली. मोठ्या प्रयत्नानंतर त्याचं मूर्त स्वरूप ९ मार्च १९५९ मध्ये अमेरिकेत बार्बी नामक फॅशन डाॅलच्या रूपाने अवतरलं. रुथ हँडलर यांनी घर सांभाळत आपल्या पतीच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली.

मॅटल कॉर्पोरेशन नावाने सुरू केलेल्या कंपनीच्या माध्यमातून त्या विविध खेळण्यांचे उत्पादन करत असत. १९५६ मध्ये हँडलर कुटुंबीय दोन मुलं, बार्बरा आणि केनेथ यांच्यासह युरोपला फिरायला गेले होते. तेव्हा जर्मनीची प्रसिद्ध लिली डॉल रुथ यांनी विकत घेतली. छोट्या बार्बराला ती भलतीच आवडली. तेव्हा अमेरिकेत केवळ लाकूड किंवा कागदाच्या बाहुल्या बनायच्या.

नाजूक लिली बाहुली पाहून अमेरिकेतही असं उत्पादन व्हावं, असं रुथला वाटू लागलं; पण आपली बाहुली चिमुकलीबरोबरच किशोरवयीन मुलीलाही आदर्श वाटावा, अशी रुथ यांची संकल्पना होती; पण त्यात अडथळे अनेक होते. रुथ यांनी हार मानली नाही.

बार्बीचा जन्म झाला नि बाहुलीच्या जगात उत्क्रांती झाली. बाळाने बाळसं धरावं तसं बार्बीनामक फॅशन डॉलला जगभरातून मागणी येऊ लागली. अतिशय नाजूक आणि निरागस डोळे असलेली अशी बाहुली आपल्याजवळ असावी, अशी स्वप्नं तेव्हा जगातील प्रत्येक मुलीला पडू लागली. बार्बी देखणी असली तरी ती सामान्यांच्या आवाक्यात नव्हती. महागडी असल्याने ती मिळवण्याचा कित्येक मुलींचा हट्ट त्या काळातील बाप पूर्ण करून शकला नाही... अशा मुलींनी नंतर मात्र आपल्या बाळासाठी पहिलं गिफ्ट म्हणून आवर्जून बार्बी आणल्याची अनेक उदाहरणं आज सांगितली जातात.

माझं लहानपण तोडक्या मोडक्या बाहुल्या बघण्यात गेलं. अगदी घरगुती कापडाने बनवलेल्या, प्लास्टिकच्या सहज चेपल्या जाणाऱ्या किंवा खेळणीवाल्याकडे काही आण्यात मिळणाऱ्या बाहुल्यांनी आमचं बालपण साजरं झालं. त्या बिचाऱ्या बाहुल्यांना साधं उभंही राहता येत नसे... बार्बीने मात्र दोन पायांवर उभं राहून दाखवलं.

हात वर करून नि खाली वाकून दाखवलं. वेगवेगळे डिझायनर कपडे घालून दाखवलं. बोलक्या डोळ्याने संवाद साधला. आई-वडिलांनंतर आधाराची एक भक्कम साथ दिली. बार्बीच्या येण्याने टिपिकल बाहुलीला ग्लॅमर मिळालं. तिच्यामुळे लहान मुलांचं, मुख्यतः मुलींचं भावविश्र्वच बदलून गेलं. ती आली, तिने पाहिलं नि जिंकून घेतलं सारं, असंच काहीसं झालं त्या काळी...

बार्बीची बलस्थानं होती, गुलाबी कांती, सोनेरी केस, निळे डोळे आणि निरागस भाव... अगदी नाजूक लोभस. केन नामक पार्टनरबरोबर तिची असलेली जोडी बाहुलीविश्वात कमालीची लोकप्रिय ठरली. आधी कशीबशी उभी राहू शकणारी बार्बी डॉल नंतर बॅटरीच्या साह्याने डान्स फ्लोअरवर नाचूही लागली. हळूहळू तिने प्रत्येक कुटुंबात प्रवेश केला. सर्वांना आपलंसं करायला तिच्यासाठी जातीभेद, रंग, भाषा वा प्रांत काहीच आड आलं नाही. सगळ्यांच्या पलीकडची ममतेची नि प्रेमाची भावना तिने शिकवली, तीही न बोलता.

राजकन्या, परी, शोनाली, गुंडू, लाडली, स्विटी, छकुली, राजस, गुड्डी वगैरे विशेषणं मुलींसाठी असताना त्यात, ‘बार्बी डॉल’ नावाची भर पडली. ‘मुलगी अगदी गोड आहे... सेम बार्बी डॉलसारखी’ असं कौतुक अधूनमधून तेव्हा कानावर पडू लागलं. त्या काळी चिमुकल्यांच्या प्रत्येक ‘बर्थ डे’ला बार्बी डॉल गिफ्ट द्यायचा ट्रेंडच बनला होता.

आपला लाडका सांताक्लॉजही तेव्हा बेरोजगार झाला होता म्हणे... १९८४ मध्ये बार्बीचं मल्टिमीडिया क्षेत्रात पदार्पण झालं आणि मग ती बच्चेकंपनीला नित्यनेमाने भेटू लागली. अगदी आबालवृद्धांची लाडकी होऊन राहिली. व्हिडीओ गेम, ॲनिमेटेड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये दिसणारे बार्बी अन् केन बघता बघता बाहुली न राहता एक जिवंत व्यक्ती कधी वाटू लागल्या ते कुणालाच कळलं नाही.

मुलींच्या जगात बाहुलीला स्थान आधीपासूनच होतं; पण बार्बीमुळे ते अधिक भक्कम आणि खास झालं. बाहुलीशी गप्पा मारताना, तिला पावडर-कुंकू लावताना, तिचा अभ्यास घेताना आणि तिला भातुकलीतला स्वयंपाक शिकवताना तुमच्या-आमच्या मुलीतलं आईपण सहज दिसू लागलं. बार्बी बाहुली बऱ्याच मुलींची अबोल सखी झाली. ती असण्याची इतकी सवय लागली की तिचं नजरेआड होणं खुपू लागलं.

बाहुली विषय केंद्रस्थानी ठेवून अनेक कथा लिहिल्या जाऊ लागल्या. काही चित्रपटांत बाहुलीबरोबर बोलतानाचे मुलीचे प्रसंग नात्याचे पदर उलगडणारे ठरले... अपवादात्मक अशा काही चित्रपटांत बाहुलीला भूत म्हणूनही दाखवलं गेलं. तेवढा अतार्किक अट्टहास सोडला तर चित्रपटातला बाहुलीचा वापर आणि वावर तिच्यासारखाच गोंडस ठरू लागला.

जगात एकही असं मूल नाही की जे बाहुलीसोबत जगलं नाही, तिच्या कुशीत झोपलं नाही, आपल्या बोबड्या बोलाने तिला हैराण केलं नाही किंवा गेलाबाजार सेल बदलून बदलून त्या कृत्रिम जीवाला जिवंत ठेवलं नाही... त्या चिमुकल्या जीवाचा श्वास आणि विश्वास होता ती बाहुली आणि पुढेही राहील... कारण बार्बी आता चराचरात व्यापून उरली आहे. तिच्या नावाचा कधीच ब्रॅण्ड झालाय.

बार्बी ड्रेसच्या नावाने तयार होणारे कपडे अगदी लहान मुलींपासून तरुणींमध्येही प्रिय ठरले आणि वापरलेही जाऊ लागले. आजही टेडी बिअरसारख्या सॉफ्ट टॉईजच्या जमान्यात बार्बीचं स्थान अबाधित आहे. खरं वाटत नसेल तर तुमच्या मुलांना विचारा... त्यांनी तुमच्या घरातली एक जागा ऑलरेडी एका बास्केट बार्बी नावाच्या बाहुलीला दिली असेल. त्या जागेचा सातबाराही तिच्या नावावर केला असेल आणि तोही अगदी मनापासून... लांब झगा नि फ्रॉक घालणाऱ्या बार्बीला साडी नेसवली गेली.

घागरा चोली घातली गेली. अगदी लाडात येऊन दूध-भातही भरवला गेला. छोट्याशा मांड्यांवर निजवून अंगाईही गायली गेली. कधी तिच्या पाठीत धपाटेही पडले. रागाच्या भरात तिचे हात, पाय नि मुंडी तोडून तिला विनाकारण शिक्षाही दिली गेली. नंतर धाय मोकलून रडत तिचं सो कॉल्ड ‘ऑपरेशन’ करून तिला पुन्हा जिवंतही केलं गेलं असेल... तुम्हाला खरंच सांगतो कुंकू लावून भारतीय झालेली बार्बी डॉल अब्जावधी चिमुकल्यांवर संस्कार करून गेली. रूथ यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज साकार झालंय नि अमर झालंय.

बार्बीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे केक वेगवेगळ्या दुकानांत आज सर्रास मिळू लागलेत. थोडक्यात लहान मुलांचं विश्व बार्बीमय झालंय... गेली सहा दशकं जगन्मान्य असलेली बार्बी आता ६५ वर्षांची झालीय. एक नक्की, की आपलं वय वाढतंय; पण मिकी माऊस, डोनाल्ड डक, टॉम अ‍ॅण्ड जेरी, छोटा भीम, डोरेमॉन, आवडाबाई, अर्धवटराव आणि ऑफकोर्स डार्लिंग बार्बी डॉल तुम्ही आजही एव्हरग्रीन आहात. तुमचं वय वाढणं शक्यच नाही. तुम्ही पुढील कित्येक पिढ्यांना वेगवेगळ्या रूपात आनंद देत अजरामर राहणार... हॅपी बर्थ डे बार्बी!

ninadbodas916@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com