दरवर्षी नित्यनेमाने नवे वर्ष येतच असते. अनेक क्रिएटिव्ह मेसेजही येतात. असा शाब्दिक आनंद व्यक्त करणाऱ्यांच्या काव्यप्रतीभेची तारीफ करायची असते. वर्ष सरत असताना मग ‘इयर एंडर्स’ मांडले जातात. महत्त्वाच्या घटना, घडामोडी, महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन, मोठे पुरस्कार इत्यादींचा ऊहापोह त्यात असतो.
सामान्य माणसांच्या; सॉरी यंत्रांच्या आयुष्याचे ‘इयर एंडर’ मात्र कुणी मांडत नाही. कारण ते तसे केलेले यंत्र आणि यंत्रवत झालेली यंत्रणा ज्यांच्या हातात आहे त्यांना ते आवडणार नाही! असे झाल्याने वर्ष नवे, हर्ष नवा असे काही होते का, हा संशोधनाचा विषय आहे.