श्रमसंस्कृतीच्या नायिकेची झेप... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mi Anjana Shinde Book

मराठी साहित्यातील चरित्र - आत्मचरित्रांचं दालन समृद्ध आहे. अशी पुस्तकं वाचून माणसाला अनेक आयुष्यं जगल्याचा अनुभव आणि आनंद घेता येतो.

श्रमसंस्कृतीच्या नायिकेची झेप...

मराठी साहित्यातील चरित्र - आत्मचरित्रांचं दालन समृद्ध आहे. अशी पुस्तकं वाचून माणसाला अनेक आयुष्यं जगल्याचा अनुभव आणि आनंद घेता येतो. मराठीत आतापर्यंत प्रकाशित झालेली स्त्रियांची आत्मचरित्रं १३० पेक्षा जास्त आहेत. त्यांतली शहरी, मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी समाजातील स्त्रियांची सुमारे शंभर आहेत. उरलेली ३० ही अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त, अल्पसंख्याक, बहुजन समाजातील स्त्रियांनी लिहिलेली आहेत. या दोन्ही गटांत श्रेष्ठ साहित्य मूल्यं असलेली काही आत्मकथनं - आत्मचरित्रं आहेत. काही गाजलेली आहेत, काही बरी असूनही गाजवलेली आहेत.

‘मी अंजना शिंदे’ या आत्मचरित्राचं नुकतंच प्रकाशन झालं. आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून पुण्यात येऊन फ्लॅट - बंगल्यात धुणीभांडी करणारी एक अल्पशिक्षित (जवळजवळ निरक्षर) बाई आपल्या कष्टाच्या जोरावर मोठी भरारी घेते. प्रामाणिकपणा, परिश्रम, लाघवीपणा व हरहुन्नरीपणा यांतून किती उंच झेप घेता येते, त्याचा आलेख म्हणजे हे आत्मचरित्र.

अंजनाबाई फुटपाथवर भाजी विकू लागतात. दररोज पहाटे ४ वाजता उठून मुलांचे डबे तयार करून देतात व मग सायकल चालवत मार्केट यार्डात जाऊन भाजी आणतात, फुटपाथवर दिवसभर भाजी विकतात. मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देतात. नवरा व्यसनी व पुढे पक्षाघाताने आजारी असूनही बाई त्यांना बरं करून समाधानी संसार उभा करतात. त्यांचा धाकटा मुलगा विशाल स्वतःचा उद्योग उभा करतो, आईने जिथं धुणीभांडी केली, तिथंच उच्चभ्रू सोसायटीत महागडा फ्लॅट खरेदी करतो. लोक विचारतात, ‘‘काय भाजी विकायला आलात का शिंदेबाई?’’ त्यावर त्या सांगतात, ‘‘माझ्या मुलाच्या मालकीचा फ्लॅट आहे या सोसायटीत!’

या पुस्तकातला जगण्याचा दणकट संघर्ष उद्धव शेळके यांच्या ‘धग’च्या तोलामोलाचा आहे. अंजनाबाई बोलक्या, सदैव हसतमुख अशा. शेजारी मंडळींच्या मदतीला धावून जाणाऱ्या. पन्नाशी ओलांडल्यावर बाई पोहणं शिकायला पुढे सरसावतात. अल्पशिक्षित असूनही वाचनाची गोडी असते. रोजची वर्तमानपत्रं व पुस्तकं त्या वाचत असत. बाई कुटुंबवत्सल. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये बाई आपली संघर्षाची कहाणी लिहून ठेवतात. मुलगा विशाल अंजना सर्जेराव शिंदे तिचं पुढे शब्दांकन करतो. यातली चित्तरकथा विलक्षण आहे. अनुभव अस्सल आहेत. जगण्याची उमेद वाढवणारी, श्रमसंस्कार व संस्कृतीची नायिका अंजनाबाई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजाराशी लढताना जगाचा निरोप घेतात.

कपाळावर सावित्रीबाईंसारखी ठसठशीत चिरी (आडवं कुंकू) लावणाऱ्या अंजनाबाई यांची ही कथा मराठीतल्या स्त्री आत्मचरित्रांत पहिल्या दहांत गणना करावी लागेल इतकी मोलाची आहे. या दर्जेदार आत्मचरित्राने मराठीचं दालन आणखी श्रीमंत केलं आहे.

Web Title: Hari Narake Writes Book Mi Anjana Shinde Book

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Booksaptarang
go to top