esakal | तालिबानचे वाढते वर्चस्व.. भारतासाठी धोक्याची घंटा!
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

तालिबानचे वाढते वर्चस्व.. भारतासाठी धोक्याची घंटा!

sakal_logo
By
हर्षद भागवत

अफगाणिस्तानात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकन सैन्यानं बहुचर्चितहवाई अड्डा सोडल्या नंतर अवघ्या आठवडा भरातच तालिबानी आक्रमक झाले आहेत. अफगाण मधील अश्रफ गनी सरकार साठी ही चिंतेची बाब आहे. आठवडाभरातच तालिबानने अनेक जिल्हे हस्तगत केलेआहेत. इराण-अफगाणिस्तान बॉर्डरचा पूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. सुमारे १०० जिल्ह्यांवर त्यांचे प्रभुत्व आहे आणि इतरही परिसर काबीज करायच्या ते तयारीत आहेत. त्यांची राजधानी काबुलशहराकडे कूच वाढतच चालली आहे यावरून चित्र पुरेसं स्पष्ट होतांना दिसत आहे.

सुमारे ७५,००० तालिबानी योद्धांसमोर दोन लाखांची नवीन प्रशिक्षित अफगाणी फौज आहे . अमेरिकन -नाटो सैन्यानं त्यांना गेली अनेक वर्षे प्रशिक्षण दिलेलं आहे . तालिबानी फौजेसह लढताना अनेक अफगाण सैनिक बॉर्डर वरून इराण , ताजिकिस्तान मध्ये आश्रयाला पळून गेले आहेत. यावरून सद्य स्थितीत अफगाणी सैन्यामध्ये लढण्याचा ‘आत्म विश्वास‘ असल्याचा अभाव आहे, असं दिसून येतंय . किमान राजधानी सहित अनेक महत्वाची शहरे वाचवण्याची त्यांची क्षमता आहे काय, हे कळत नाही. बहुसंख्य ग्रामीण भागावर कब्जा करून, अफगाण सरकारवर दबाव आणण्याची तालिबानी चाल आहे.

इतिहास बघितला तर नव्वदच्या, नजीबुल्लाह सरकारची हीच गत झाली होती. कमकुवत राजकीय परिस्थितीचा राजकीय फायदा घेऊन तालिबानी सैन्यानं काबुल वर कब्जा मिळवला आणि सप्टेंबर १९९६ मध्ये राष्ट्रपती नजीबुल्लाह यांना भर चौकात फासावर लटकावले . या इतिहासाची पुन्हा आवृत्ती होऊ शकते. यानंतर तालिबान्यांनी, सामान्य जनतेचं जिणं मुश्किल करून टाकलं, रेडिओ, टीव्ही इ सर्व मनोरंजना च्या साधनांवर बंदी आली. महिलांना शिक्षण घेणं, घराबाहेर काम करणं यावर बंधने अली. बुरखा वापरणं सक्तीचं करण्यात आलं. पूर्ण समाज व्यवस्थाच धोक्यात आली. बायडन महाशय आपल्या अजेंड्यावर ठाम आहेत , त्यांनी अफगाणी जनतेचं भवितव्य त्यांच्याच हवाली केलं आहे. त्यामुळं यापुढे अमेरिकेचा कोणताही हेतू येथे उरलेला नाही ,हे पुरेसं स्पष्ट होतंय. मग निरपराध अफगाण जनतेचा वाली कोण राहणार? हा मोठा प्रश्न उरतोच.

अमेरिकेनं वॉर ऑन टेरर एकतर्फी संपुष्टात आणलं असलं तरी तालिबानच्या अस्तित्वाने आणि त्यांच्याआक्रमक हालचालीमुळे उर्वरित जगासाठी हा धोका कायम आहे . विशेष करून भारतासाठी धोक्याची घंटा आहे . आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे चीनचा या भागातील वावर चिंता वाढवणारा आहे. चीन ने पाकिस्तानच्या माध्यमातून ,अफगाणिस्तानात रस घ्यायला सुरवात केली आहे. भारताला चीन, पाकिस्तान सीमे बरोबर अफगाणिस्तान च्या सीमेवर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. या नंतरची परिस्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी, अफगाण आणि पाकिस्तान मध्ये मूलतत्व वाद्यांचा धुमाकूळ चालू होईल यात काही शंका नाही. दहशत वादाची कर्म भूमी पाकिस्तान या बाबत आश्चर्यकारक शांत कशी काय हा गूढ प्रश्न आहे. भारताने तालिबानी नेत्यांसोबत गुप्त वार्ता केल्याचं बोललं जातंय त्याचा काही तपशील अजून जाहीर झालेला नाही. तालिबान सोबत भारतीय संबंध नजीकच्या काळात कसे असतील याचा कोणताच ठोस निर्णय झालेला दिसत नाहीये. कोणती राजनैतिक भूमिका आहे, याचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाकडून अजूनही झालेला दिसत नाहीं. जर वेळ निघून गेल्यावर निर्णय घेतला तर तो अधिक तापदायक आणि खर्चिक असेल. कारण आता, यूरोपीय देशांना आणि विशेष करून अमेरिकेला या भागात काही घेणं - देणं उरलेलं नाही भारताची सुरक्षा आपली आपणच करावयाची आहे…. आपण लवकरच योग्य पाऊल उचललं नाही तर, ही भारतासाठी एक "धोक्याची घंटा" ठरू शकतेय

- हर्षद भागवत

(आंतर राष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक)

loading image