अमृतानुभव (हर्षद सहस्रबुद्धे)

harshad sahasrabudhe
harshad sahasrabudhe

भारताच्या विविध प्रांतांत दडलेले कलाकाररूपी मोती शोधून त्यांची सांगीतिक ओळख करून देणारी "हार्मनी' ही "म्युझिकल वेब सिरीज' सध्या खूपच चर्चेत आहे. जागतिक कीतीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि सिरीजची अतिशय मनापासून केलेली मांडणी यांमुळं ती उल्लेखनीय ठरली आहे. संगीताचा अमृतानुभव देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सिरीजचे उलगडलेले पैलू.

विविध राज्यं, परंपरा आणि असंख्य भाषांनी नटलेल्या आपल्या देशात स्वतःचं तन-मन-धन अर्पून कलेची उपासना करणारे असंख्य कलाकार आहेत. अशा कलाकारांची जीवनशैली अतिशय वेगळी असते. "भौतिक सुख' ही संकल्पना यांना जवळपास ठाऊकच नसते. देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या अशा हिऱ्यांपैकी, काहींना शोधून जगासमोर आणण्याचा अतिशय कौतुकास्पद प्रयत्न, जागतिक कीर्तीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आपल्या "हार्मनी' या नव्या "म्युझिकल वेब सिरीज'मार्फत केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वेब सिरीज "ऍमेझॉन प्राइम'वर पाहण्याकरता उपलब्ध झाली आहे. पाच भागांमधे असणारी ही नवी सिरीज, राष्ट्रीय पुरस्कार विजेती, रंगभूमी कलाकार आणि रेहमान यांची चाहती असणारी श्रुती हरिहर सुब्रमण्यन हिनं दिग्दर्शित केली आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, सुमारे 32 लाख 87 हजार 263 चौरस किलोमीटर इतक्‍या अवाढव्य क्षेत्रफळावर पसरलेल्या आपल्या भारतभूमधून, कलेकरता आपलं संपूर्ण आयुष्य वेचून, तिची मनोभावे उपासना आणि जोपासना करणाऱ्या मनस्वी प्रभूती शोधून आणताना आपल्याला सिक्कीम, मणिपूर, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमधल्या काही भागांचं मनोहारी दर्शन घडतं.
विराजसिंह गोहल यांचा कॅमेरा, मिकना शेरिग लेपचा हा गुणी बासरीवादक, ज्या जंगलाशी, नद्यांशी एकरूप होतो त्यांची ओळख करून देतो. फक्त हिमालयन जंगलात वाढणाऱ्या विशिष्ट जातीच्या बांबूंचा, तिथल्या रानफुलांचा परिचय घडवतो. खूप उंचीवरून केलेलं एरियल शूट, मणिपूरमध्ये नद्यांवर नैसर्गिकरित्या तयार झालेली नयनरम्य "फ्लोटिंग सर्कल्स' दाखवतं. तिथं वास्तव्यास असणाऱ्या लोरेम्बम बेदबतींची आणि त्यांच्या विशिष्ट ढंगाच्या गायकीची ओळख करून देत असताना, त्यांच्या घरात मंजुळ किलबिल करत घरटं बांधणारे पक्षी दाखवतो. हाच कॅमेरा, कधी मुंबई इथं बहाउद्दिन डागर साहेबांच्या तीर्थरूपांच्या प्राणपणानं जपलेल्या रुद्रवीणेच्या तारांशी एकात्म पावतो, तर कधी साजिथ विजयनच्या "मेढावू' या चर्मवाद्याच्या कंपनांचा जिवंत अनुभव आपल्यापर्यंत पोचवू इच्छितो. ही सिरीज बनवताना, नावापासून अनेक गोष्टींचा विचार अतिशय बारकाईनं करण्यात आला आहे. "हार्मनी' या शब्दाचा उगम ग्रीक, लॅटिन आणि जुन्या फ्रेंच भाषेतला आहे. एक अद्‌भुत असा स्वराविष्कार निर्माण करण्याकरता, साधारण एकाचवेळी किंवा एकामागून एक अशा पद्धतीने, वेगवेगळ्या सुरांचा आणि वाद्यांचा सुयोग्यपणे जमून आलेला मिलाफ म्हणजे हार्मनी. ख्रिस्ताची चार वचने (गॉस्पेल्स) एकत्र येऊन जे एक मार्गदर्शक सूत्र बनतं, त्यालादेखील "हार्मनी' असं संबोधलं जातं. "हार्मनी' या सिरीजमध्ये, भारताच्या चार प्रांतांमधून चार गुणी कलाकार एकत्र येऊन आपली कला एका मंचावर सादर करतात. ही कला सादर करताना, त्यांना सध्याच्या अत्यंत प्रगत अशा तंत्रज्ञानाची जोड मिळते. इलेक्‍ट्रॉनिक म्युझिक, वर्ल्ड म्युझिक आणि फ्युजनचा बादशहा म्हणून सुपरिचित असणारा संगीतकार ए. आर. रहमान, हे चार कलाकार आणि केएम म्युझिक कॉंझर्व्हेटरीमधले (रहमाननं संगीतातल्या उच्चशिक्षणाकरता सुरू केलेली शिक्षणसंस्था) विद्यार्थी आणि तंत्रज्ञ मिळून सादर करतात, एक अतिशय अद्‌भुत असा देखणा स्वराविष्कार! हा आविष्कार सादर करण्याआधी, चार प्रांतातल्या चार मनस्वी कलावंतांचा घेतलेला शोध, कलेला वाहून घेण्यामागची या कलाकारांची मनोभूमिका, त्यांचं स्वतःचं असं तत्त्वज्ञान, प्रांतवैशिष्ट्यं यांचं वेधक आणि वेचक चित्रण आपल्याला "हार्मनी' या म्युझिकल वेब-सिरीजद्वारा घडतं.

"हार्मनी'च्या प्रत्येक भागात आपला भारताच्या विविध प्रांतांशी अल्पपरिचय होतो. या प्रत्येक भागात आपल्याला एक गुणी कलाकार भेटतो. प्रांतीय परंपरा, रूढी, तिथल्या सांगीतिक संस्कृतीप्रती असणारी स्थानिक लोकांची आपुलकी, या सर्व घटकांचं प्रभावी दर्शन होतं. ही सिरीज भारतीय लोकसंगीत व शास्त्रीय संगीताशी संबंधित असली, तरी ती कला, तत्त्वज्ञान, लोकजीवन, प्रांतीय संस्कृती, वैविध्य, निसर्ग आदी प्रांतांत मुक्त संचार करते. पारंपरिक लोकसंगीत, वाद्यांचा परिचय आत्मीयतेनं करून देते. सिरीजच्या प्रत्येक भागाचं संगीत, पार्श्वसंगीत, दृश्‍यमिलाफ, संकलन आणि छायांकन या गोष्टींचं संयोजन अत्यंत विचारपूर्वक करण्यात आलं आहे. दिग्दर्शिकेचा व्यापक विचार आणि सखोल वैचारिक भूमिका यामधून स्पष्ट होते. रंग, नाद आणि दृश्‍यांच्या साह्यानं, स्थानिक वैशिष्ट्यं, कलाकारांचं तत्त्वज्ञान, कला आणि वाद्यांप्रती असणारी त्यांची मनोभूमिका, त्या-त्या ठिकाणचा सुगंधी दरवळ प्रभावीपणे पोचवण्याचा आकर्षक प्रयत्न "हार्मनी'द्वारा करण्यात आला आहे. नंबियार या मूळच्या जमीनदार कुटुंबाच्या अखत्यारीत असणाऱ्या देवळांमधून विशेष समारंभानिमित्तानं वाजवल्या जाणाऱ्या "मेढावू' या वाद्याचं लोकार्पण करताना गुरू पी. के. नारायणन नंबियार यांना करावा लागलेला संघर्ष, भगवान श्रीशंकर तांडवनृत्य सादर करीत असताना "मेढावू' या वाद्याचं नंदीनं केलेलं वादन इत्यादी पुराणातले संदर्भ पहिल्या भागामधून उलगडत जातात. साजिथ विजयनचे "मेढावू' वादन करताना स्फुरण पावणारे बाहू दिसतात. वाद्यवादन करण्यापूर्वी अनेक वर्षं कराव्या लागणाऱ्या साधनेची महती हा विनयशील कलाकार कथन करतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत एक विशेष चमक दिसते. आपल्या पूर्वजांची वाद्यं आणि तसबिरींना धूपारती सादर करणारे आणि रुद्रवीणा वादन करण्यापूर्वी दीपप्रज्वलन करून नमस्कार करणारे उस्ताद बहाउद्दिन डागर साहेबांविषयी मनात आत्यंतिक आदरभाव दाटून येतो. वीणेची गंभीर स्वरकंपनं वातावरण भारून टाकत असतात. सभोवताल नकळत नादवलयांनी संपृक्त होतो आणि गायन-वादन करणाऱ्या कलाकारांशी आपण नकळत एकरूप होऊन जातो. अतिशय गरिबीतून मेहनतीनं वर आलेल्या हसतमुख, शांत-प्रसन्न चेहऱ्याच्या मिकना लेपचाचं निसर्गाच्या जवळीकीतून आलेलं तत्त्वज्ञान कळलं, की शहरी जीवन जगणाऱ्या आणि भौतिक सुखामागं धावणाऱ्या आपल्यासारख्यांना अमाप आश्‍चर्य वाटतं. निसर्गाशी आपण कदाचित कधीच इतकं तादात्म्य पावू शकणार नाही. कलेशी एकनिष्ठ राहण्याकरता, आयुष्यभर अविवाहित राहण्याची बेदबतीची संकल्पनाही आपल्याला चकीत करते. हे चारही कलाकार अतिशय प्रतिभावान असूनही जमिनीवर आहेत. यांचा "अहं' निद्रितावस्थेत आहे. गर्व नावाची संकल्पना यांना माहीत नाही. यांच्याकरता कला ईश्वरासमान आहे. फुलांच्या गंधकोषींइतकीच ती पवित्र आहे. धुपाच्या दरवळाइतकीच सुगंधी आहे. हे कलाकार देशाच्या मातीमधून घडले आहेत. हे हिरे शोधून काढून त्यांना जगासमोर सादर करण्याची "कवितालय' आणि श्रुती सुब्रमनियन यांची संकल्पना अभिनव आहे. "कुतुब-ए-क्रिपा' आणि ए. आर. रेहमान यांचं अप्रतिम पार्श्वसंगीत, रेहमान यांचा ओरिजिनल म्युझिक स्कोअर आणि कलाकारांसोबतचा प्रत्यक्ष वावर या सिरीजला "चार चांद' लावतो. "हार्मनी' हा दिव्य अमृतानुभव संगीतप्रेमींच्या स्मरणात दीर्घकाळ वास्तव्य करेल, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com