esakal | हॅपी डेज : समाजसेवा अन्‌ शिक्षणात रमून गेलो
sakal

बोलून बातमी शोधा

हॅपी डेज : समाजसेवा अन्‌ शिक्षणात रमून गेलो

हॅपी डेज : समाजसेवा अन्‌ शिक्षणात रमून गेलो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापुरातील नू.म.वि. मराठी शाळा, श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय येथील सेवेनंतर मी निवृत्त झालो. सेवाकालावधीत फक्त माझ्या हातून ज्ञानार्जनाचे कार्य झाले. ज्ञानमंदिरातील अनेक बालकांना उत्तम संस्काराचे धडे देण्यात मी स्वत:ला धन्य समजत होतो आणि तोच आशीर्वाद आज माझ्या पाठिशी असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन मी सुखाने घालवित आहे.

सेवानिवृत्तीनंतर काय करायचे, याचे नियोजन आधीच केले होते. त्यात प्राधान्यक्रम कुटुंबियांना दिले. दोन मुले, सुना, कन्या व नातवंडे यांच्यासमवेत राहून त्यांना शक्‍यतो मदत करण्याची भूमिका घेतली. समाजातील विषमता दूर करण्यासाठी तांड्यावर, वस्त्यावर जाऊन तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले. कोरोना महामारीच्या काळात आपले आरोग्य, आहार, मानसिक संतुलन उत्तम कसे ठेवावे, कोविड लस घेण्याबाबत जनजागरण करुन समाजसेवेचे कार्य केले.

रोजच्या दिनक्रमात वाचन, लेखन, सायकलिंग, पोहणे, नियमित चालणे, परस बाग तयार करणे, चित्रपट पाहणे, नाटक पाहणे, भरपूर प्रवास करणे इत्यादी छंद जोपासले आहेत. अनेक मित्रांच्या संपर्कात राहून सामाजिक कार्य करत आहे. उतरत्या वयात नोकरीत वरिष्ठ पदावर असतानाचा भूतकाळ विसरुन आज आपण आजोबा, सासरे, शेजारी या भूमिका निभावण्यात मला माझा आनंद मिळाला. अतिसंताप, अतिशोक, चिंता टाळून मनावर नियंत्रण मिळवून आनंदाने दिनचर्या पूर्ण करत मी जीवनाला एक नवे वळण लावले.

सेवानिवृत्त हा शब्दच फक्त शासकीय कालमर्यादेचा असतो. सेवेत असताना आपल्यावर काम करण्यासाठी अनेक बंधनं असतात. पण मर्यादीत चाकोरीतून सेवानिवृत्तीनंतर मोकळ्या वातावरणात डोकावून पाहिल्यास आपले जीवन आनंदी, निरामय रहावे यासाठी करण्यासारख्या असंख्य गोष्टी असतात. त्याचा शोध मी निर्मळ मनाने घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. दैनंदिन कामात एखादी गोष्ट करावयाची राहून गेल्यास काहीतरी चुकल्यासारखे वाटते. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन खरेच आनंदी राहील का?असे गोंडस प्रश्न माझ्यासारख्या असंख्य बांधव आणि भगिनींसमोर उभे ठाकलेले असतील.

या प्रश्नांना तेवढ्याच क्षमतेने कौटुंबिक वातावरणाचा मागोवा घेऊन, जुन्या परंपरेपासून थोडेफार बदललेल्या मुले व सुनांच्या आचारविचारांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. अनेक मित्र व हितचिंतकांनी मला काही छोटा- मोठा व्यवसाय कराण्याचे सूचित केले. त्या सर्वांच्या सूचनांचा मी आदर करतो पण तसे काही केल्यास मुक्त जीवनाचा मला आनंद घेणे अशक्‍य होईल. म्हणून वृद्धापकाळानंतरचे जीवन, आवडी- निवडी जोपासून आनंदाने जगणे मी पसंद केले. आपल्या हातून सत्कर्म घडो, अशी मनोमनी ईश्वरचरणी प्रार्थना करुन मी सेवानिवृत्तीनंतरचा एक- एक क्षण आनंदात घालवत आहे.

loading image
go to top