राजकारणाचे डर्टी पिक्चर!

Politics
Politics

कसदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर आधारित ‘अर्थसत्य’ चित्रपटाची कथा विजय तेंडुलकरांची होती आणि त्यात दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ‘चकव्यूह में घुसने से पहले’ ही कविता अर्थपूर्णरीत्या वापरण्यात आली होती. या चित्रपटात तत्त्वनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हतबलता दाखवण्यात आली होती. गुंड रामा शेट्टीचा खून करून इन्स्पेक्टर अनंत वेलणकर शेवटी जेलमध्ये जातो. ‘एक पलडे में नपुंसकता, एक पलडे में पौरुष और ठीक तराजू के काँटे पर अर्धसत्य’ अशी या कवितेची अंतिम ओळ होती. राजकारण आणि पोलिस यांच्या संबंधातील पूर्णसत्य, अर्धसत्य किंवा अंतिम सत्य काय आहे, याचा निश्‍चित थांगपत्ता आजही कोणाला लागलेला नाही...

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पियो गाडी, या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा धक्कादायक मृत्यू, पोलिस अधिकारी सचिन वाझेला झालेली अटक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची झालेली बदली, हाच सध्याचा चर्चा विषय आहे.

आता काही पोलिस अधिकाऱ्यांमुळं मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून, ती सुधारण्याचं आश्‍वासन नवनियुक्त आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे. ही भाषाही आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. अर्थात पोलिस दलात सर्व काही अलबेल आहे, असे महाविकास आघाडी सरकार गेले काही दिवस सातत्याने दर्शवत असले, तरी नगराळे यांनी त्याला छेद देणारे वक्तव्य केले आहे, हेही खरे. 

सुशांतसिंह राजपूत, पूजा चव्हाण आणि सचिन वाझे या तीनही प्रकरणांत गृहखात्याची अकार्यक्षमता दिसून आली. त्याआधी कोरोनाच्या प्रारंभकाळात उद्योगपती वाधवान यांना, नियम बाजूला ठेवून पाचगणीला जाण्याची परवानगी मिळाली. एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना झालेली अटकही टीकेचा विषय ठरली. या प्रकरणांमध्ये विरोधकांच्या टीकेचा गृहमंत्री समर्थपणे मुकाबला करू शकले नाहीत. तरीही देशमुखांची पाठ थोपटली जात असली, तर कमालच म्हणायला पाहिजे.

सचिन वाझे यांना तत्काळ निलंबित करून अटक करा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फ़डणवीस यांनी विधानसभेत धमाल उडवून दिली. राठोड यांचा राजीनामा वेळेवर घेण्यात आला नाही आणि वाझेविरुद्ध कारवाई करण्यात राज्य सरकारने विलंब लावला. त्यात ‘वाझे म्हणजे काय ओसामा बीन लादेन आहे का? चौकशी आधीच फाशी देता येणार नाही,’ असे उद्‍गार काढून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर फुलटॉसच दिला. त्यामुळे देवेंद्र यांनी ऋषभ पंतप्रमाणे षट्कारांची बरसात केली ! ‘इट इज एलिमेंटरी, माय डिअर वॉटसन’, असे म्हणणाऱ्या सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्सप्रमाणे आत्मविश्‍वास असणारा देवेंद्र फडणवीस नावाचा एक नवा गुप्तहेर महाराष्ट्रातही जन्माला आलेला आहे... वाझेकांडाचे बरेच पुरावे महाराष्ट्राच्या या शेरलॉक होम्सनेच पुढे आणले. एनआयएकडे कोणती माहिती आली आहे, एनआयए यापुढे काय पावले टाकणार आहे, त्याचे सूतोवाचही देवेंद्र यांच्या प्रभावी वक्तव्यातून होत होते. 

वाझेचे सूत्रधार अजूनही सरकारमध्ये कार्यरत आहेत. गृहखाते, अनिल देशमुख की शिवसेनेचे मंत्री अनिल परब की आणखी कोणी चालवते, असा प्रश्‍न उपस्थित करून, भाजपचे टार्गेट राष्ट्रवादी नसून शिवसेनाच आहे, हे देवेंद्र यांनी लपवून ठेवलेले नाही. पवार नाराज असल्याच्या वृत्तानंतर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हा आता वाझे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह सेनेच्या वर्तुळातून धरला जाऊ लागला. प्रत्यक्षात शिवसेनेच्या कलाप्रमाणे वागणारे परमबीर सिंग यांचीच बदली करणे  मुख्मंत्र्यांना भाग पडले ! अंबानींच्या घरासमोर स्फोटकयुक्त गाडी ठेवण्याचे कृत्य पुन्हा प्रकाशझोतात येण्यासाठी वाझेनेच घडवून आणले, असे आता सांगितले जात आहे. हे जर खरे असेल, तर जेव्हा वाझे वा अन्य एन्काउंटर स्पेशालिस्ट यांनी पूर्वी ‘मर्दुमकी’ची अशी जी जी कृत्ये घडवून आणली, त्यांची सत्यासत्यताही जाणून घेतली पाहिजे. पण त्याची चर्चाही नाही... एन्काउंटर स्पेशालिस्टचा उदो उदो केला जात असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रास्तपणे केली आहे. पण त्यांना त्यांच्या पक्षाचा भूतकाळ आठवत नाही, असे दिसते. युती सरकारच्या काळातच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीत अनेक एन्काउंटर्स झाले होते. त्या काळात व नंतरही भाजप असो वा शिवसेना, काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, एन्काउंटर स्पेशालिस्टचे उदात्तीकरण होतच होते.

एकेकाळी ‘तुमचा दाऊद, तर आमचा गवळी’, असे वक्तव्य खुद्द शिवसेनाप्रमुखांनी केले होते. २००८ मध्ये, तेव्हा एटीएसचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांनी मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक केली. तेव्हा सिंग यांनी कोठडीत असताना साध्वीचा शारीरिक छळ केला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. माझा शाप हुतात्मा हेमंत करकरेंना भोवला, असे उद्‍गारही साध्वीने काढले होते. आज त्या भाजपच्या खासदार आहेत !

१९९२-९३ मध्ये मुंबईत जे दंगे झाले, त्याबद्दल न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाने शिवसेना व हिंदुत्ववादी पक्ष-संघटना तसेच मुस्लिम कट्टरतावाद्यांवर ताशेरे ओढले होते. परंतु तो अहवाल मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फेटाळला होता. मुंबईतील त्या दंग्यात विशेष कार्यपथकाचा भाग असलेल्या रामदेव त्यागी यांच्या नेतृत्वाखाली सुलेमान उस्मान बेकरीवर पोलिसांनी छापा टाकला होता. गोळीबार झाला, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. या बेकरीत स्टेनगन घेतलेले अतिरेकी लपले होते, असे पोलिसांचे म्हणणे होते. पण छाप्यात एकही शस्त्र सापडले नाही व एकही जण अतिरेकी असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. कुठल्याही सुसंस्कृत व लोकशाही देशातले पोलिस अशाप्रकारे कारवाई करत नसल्याचे श्रीकृष्ण आयोगाने म्हटले होते. पुढे मुंबईचे पोलिस आयुक्त झालेले रामदेव त्यागी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांपुढे नतमस्तक झाल्याचेही लोकांनी बघितले. 

वाझेला पोलिस दलात पुन्हा घेण्यासाठी उद्धवजींचा मी मुख्यमंत्री असताना फोन आला होता, असे देवेंद्र फडणवीस आज सांगत आहेत. मात्र त्याचवेळी शिवसेनेची ही पोलखोल त्यांनी का केली नाही? कारण तेव्हा तो त्यांचा मित्रपक्ष होता !

शिवसेनेला आज जे खंडणीखोर म्हणत आहेत, त्यांना तीस वर्षे आपल्या मित्रपक्षाचा हा अवगुण माहीत नव्हता का? असो. ‘कलबुर्गी हत्येचा खटला सुरू, मग दाभोलकर-पानसरे प्रकरणाचा का नाही?’ असा सवालही सीबीआय आणि एसआयटी तपासाबाबत उच्च न्यायालयाने केला होता. राज्याचे मुख्यमंत्री हे केवळ एका पक्षाचे नाहीत. ते राज्याचे आहेत. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष घालायला सांगावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला झापले होते. 

वाझेला पोलिस दलात पुन्हा घेण्याची चूक ‘तीनचाकी रिक्षा’ने केल्यानंतर, इतके दिवस त्याबद्दल विरोधी पक्षही गप्पच होता. शिवाय अशाच एका ‘पराक्रमी’ अधिकाऱ्याला भाजपने प्रवेश दिलेला नाही का? मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांना भाजपनेच तर खासदारकी दिली. ‘शीना बोरा हत्येतील आरोपी इंद्राणी आणि पीटर मुकर्जी यांना माझ्यानंतरचे आयुक्त अहमद जावेद हे ओळखत होते. तसेच संयुक्त पोलिस आयुक्त देवेंन भारती यांचे पीटरशी आरेतुरेचे संबंध होते’, असे मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेले राकेश मारिया यांनी म्हटले होते. आपणास पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने अंधारात ठेवले, असे राकेश मारियांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. या प्रकरणात मारियांवर ठपका आला होता व त्यानंतर गृहरक्षक दलावर त्यांची ‘पदोन्नती’ होऊन बदली झाली होती. तेव्हा फडणवीस सरकारचेच राज्य होते. आता ठाकरे सरकारच्या काळातही परमबीर सिंग यांनाही गृहरक्षक दलातच धाडण्यात आले आहे.

‘२६-११ नंतर पोलिसांमधीलच काही प्रभावशाली अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध मोहीम चालवली’, असा आरोप मुंबईचे तेव्हाचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी केला होता. २००२ मध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त रणजितसिंग शर्मा यांनी तेलगी घोटाळा उजेडात आणला. मात्र पुढच्याच वर्षी एसआयटीने याप्रकरणात त्यांनाच अटक केली. थोडक्यात, सरकार कुठल्याही पक्षाचे असो, पोलिसांमधील गैरप्रकार आणि गटबाजी थांबलेली नाही. पोलिसांमधील सरकारी हस्तक्षेप बिलकूल थंबलेला नाही. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास सर्वपक्षीय आशीर्वाद आहेत. अनेक वर्षांपूर्वी प्रकाशसिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलिस व्यवस्थेतील सुधारणांकरिता सर्व राज्यांना आदेश दिलेले असतानाही, त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी झालेली नाही, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका ‘असोसिएशन फॉर एंडिंग जस्टिस’ या संस्थेने केली होती. त्या वेळी राज्यात महायुतीचेच सरकार होते. सुशांतसिंह खटला सीबीआयने आपल्या हातात घेतल्यानंतर आरोपपत्र सादर करण्यास मोदी सरकारने दीर्घ अवधी घेतला. तसेच ईशान्य दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानीतील पोलिसांची कानउघाडणी केली आहे. हे पोलिस केंद्रीय गृहखात्याच्या कक्षेत येतात. तेव्हा कोणीही नाकाने कांदे सोलण्याचे कारण नाही. 

विधानसभेत सनसनाटी निर्माण करून चॅनेलमधला अवकाश व्यापणे, सत्ताधाऱ्यांबद्दल सातत्याने संशयकल्लोळ निर्माण करणे आणि राजकारणात सतत नाट्यमयता आणणे, ही खास करून महाराष्ट्रातील भाजपची व्यूहरचना आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, प्रत्यारोपांची फोडणी देणे, माता-भगिनींना भावनात्मक आवाहन करणे आणि सलीम-जावेद तर काहीच नाहीत, अशा थाटात रोजच्या रोज कॅमेऱ्यासमोर उभे राहून माध्यमांचा ‘सामना’ करणे, हे शिवसेनेचे धोरण आहे. या सगळ्या चित्तथरारक राजकारणात शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी, भाववाढ, इंधन दरवाढ हे कुठच्या कुठे मागे पडले आहे. राजकारण म्हणजे काय, तर दुर्दैवाने ‘एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट’, एंटरटेनमेंट’ असे म्हणायची पाळी आली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com