आठवणींची रंगीत खिडकी! (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
शुक्रवार, 23 मार्च 2018

पहाटे पाचच्या सुमाराला पाचगणीच्या बसस्टॅंडवर उतरलो आणि शहारून अंगावर काटा आला. हाडात
जाणाऱ्या थंडीनंही आणि मी वगळता त्या स्टॅंडवर कुणीच दिसेना म्हणूनही. एसटीची बस उभी असलेली दिसली. केबिनमध्ये कुणीतरी असणार, या विचारानं डोकावलो.
कंडक्‍टर म्हणाले ः"" मुंबईला जायचंय का? सात वाजता "वाई बस' आहे.''
त्यांना मध्येच तोडत मी म्हटलं ः ""आत्ताच मुंबईहून आलोय. मित्र येणार आहे
न्यायला. तो येईपर्यंत आत बसू का?''
आत थंडगार खुर्चीवर बसत, आणलेला हाफ स्वेटर होता तो घातला. मित्राचा फोन सतत आउट ऑफ कव्हरेज!

पहाटे पाचच्या सुमाराला पाचगणीच्या बसस्टॅंडवर उतरलो आणि शहारून अंगावर काटा आला. हाडात
जाणाऱ्या थंडीनंही आणि मी वगळता त्या स्टॅंडवर कुणीच दिसेना म्हणूनही. एसटीची बस उभी असलेली दिसली. केबिनमध्ये कुणीतरी असणार, या विचारानं डोकावलो.
कंडक्‍टर म्हणाले ः"" मुंबईला जायचंय का? सात वाजता "वाई बस' आहे.''
त्यांना मध्येच तोडत मी म्हटलं ः ""आत्ताच मुंबईहून आलोय. मित्र येणार आहे
न्यायला. तो येईपर्यंत आत बसू का?''
आत थंडगार खुर्चीवर बसत, आणलेला हाफ स्वेटर होता तो घातला. मित्राचा फोन सतत आउट ऑफ कव्हरेज!
शेवटी मेसेज पाठवलाः "पाचगणी बसस्टॅंडवर आलो आहे. वाट पाहतोय...''- दुसरा पर्यायच नव्हता.
चहाची टपरी दिसते का म्हणून बाहेर आलो. दात चांगलेच वाजत होते. समोर विजेच्या खांबाचे पिवळे
दिवे मिणमिणत होते...त्याचा एक छान त्रिकोणी उजेड त्या दाट धुक्‍यात दोनेक फुटांवरच गुडुप झाला
होता. शेजारच्या अंधुकशा दिसणाऱ्या झाडावर आणि छपरांवर वाळत घातलेल्या गोधडीसारखं धुकं सुस्त
पडलं होतं...समोर रात्री कुणीतरी पेटवून ठेवलेल्या शेकोटीतले काही निखारेसुद्धा राखेच्या करड्या
रंगाच्या पांघरुणात गुरगुटून धुमसत होते...मधूनच उरफाट्या तेजस्वी ठिणग्या बाहेर उड्या मारत
होत्या.
...वरच्या दिव्यांचा मंद पिवळसर त्रिकोणी प्रकाश...खाली धगीतून येणार उग्र पिवळा रंग...मधूनच
रस्त्यावरून येणाऱ्या गाडीचा आडवा प्रकाशझोत...शेकोटीतून निघणाऱ्या धुराचं त्या वरच्या धुक्‍यात जाऊन मिसळणं...माणसांसारख्या दिसणाऱ्या झाडाच्या आकृत्या...
"लव्ह ऍट फर्स्ट साईट' म्हणतात तसंच...
बॅगेत चित्र काढण्यासाठीचं साहित्य होतं; पण हात कसले गारठलेले! म्हटलं, मनात साठवू या हा अनुभव चित्रासारखाच!
ऋतुबदलामधली पाऊस, ऊन्ह, सावल्या, धुकं ही "सौंदर्यसाधनं' चित्रवृत्तीला नेहमीच आकर्षित करतात.
समोर एक कार दिवे बंद करून थांबली. मला वाटलंच, अजय आला! बंद गळ्याचा पांढरा पुलओव्हर, हिरवी कॅप, जॉगिंग ट्रक्‍स, पांढरेच स्पोर्ट शूज, हातात सिगारेट... अजय लगबगीनं येत मिठी मारत म्हणाला ः ""सॉरी, सॉरी. अरे, फोन डिस्चार्ज झाला होता. चार्जिंगला लावला, तुझा मेसेज बघितला आणि आलो तडक!''
सिगारेटच्या धुराबरोबरच परफ्युमचाही मंद गंध पसरला. केबिनमधून बॅग घेऊन कंडक्‍टरचे आभार मानत अजयच्या लांबलचक मर्सिडीजमध्ये जाऊन बसलो.
अजय पेशानं फोटोग्राफर. युरोपात जाऊन हा आणि वडील फोटोग्राफी शिकून आलेले, फोर्टमध्ये बऱ्यापैकी मोठा स्टुडिओ. जवळजवळ सगळ्या मोठ्या जाहिरात-संस्थांमधली कामं यांच्याकडं असायची. एम. एफ. हुसेनही यांच्या स्टुडिओत त्यांची पेंटिग्ज कॉपिंग करण्यासाठी येत असत.
पुढं स्टील फोटोग्राफीचा कंटाळा आला म्हणून तो सिनेमॅटोग्राफीकडं वळला. तिथंही तोच तोच पणा म्हणून सगळं सोडून मध्यंतरी लेखन करायचा. त्याच्या अप्रकाशित पुस्तकासाठी मी जवळपास पंचवीसेक इलस्ट्रेशन्स केली होती. लेखनात त्याचा आवडता विषय म्हणजे मॉर्टल-इम्मॉर्टल लाइफ, युरोपसारखं कंट्रीसाइड लिव्हिंग इत्यादी...
जगण्याच्या एका वळणावर मुंबईचं सगळं सोडून पाचगणीत छोटं बंगलेवजा घर घेऊन इथं राहायला आला तो कायमचाच.
मी इथं आल्यावर जिथं लॅंडस्केपसाठी जायचो, तिथं हा मला सोडायला यायचा. मग घरी रात्री उशिरापर्यंत चर्चा. त्याचे विषय तेच ः इंग्लिश लिटरेचर, कंट्रीसाइड स्टोरीज...इत्यादी. आठवतंय, प्रसिद्ध विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांना घेऊन मी महाबळेश्वरला आलो असता एक दिवस अजयकडं आलो होतो. ते दोघं इंग्लिश लिटरेचर, युरोपियन इफेक्‍ट्‌स ऑन आर्ट, कल्चर, ब्रिटिशांचा भौगोलिक शिरकाव, राजकारण यावरच बोलत होते.
महाबळेश्वरला ब्रिटिशांनी बांधलेल्या काही सुंदर इमारती एमटीडीसीच्या आवारात आहेत, तिथं आम्ही
लॅंडस्केपसाठी जायचो. उंच छताच्या, गेरूसारख्या रंगाच्या भिंती, पांढऱ्या रंगाच्या उंच कमानी, भव्य हॉल, रंगवलेल्या लाकडी खिडक्‍या, हिरव्या रंगाची कौलारू छपरं, लोखंडी जाळ्या अणि जिने, दगडी पायऱ्या, उंच वाढलेले वृक्ष आणि विशिष्ट असा गूढपणा!
माझ्या चित्रांवर मग "फोटोग्राफर्स पॉइंट'नं चर्चा व्हायची. भिंतींवरचे शॅडोमधले टोन्स, हिरव्या रंगातल्या
शॅडोमधली डेन्सिटी, पर्स्पेक्‍टिव्ह...मग त्या काळातलं ब्रिटिशांचं इथलं वावरणं...पुढं-मागं घोडेस्वार-रक्षकांच्या तुकड्यांमधून कुण्या मोठ्या गोऱ्या अधिकाऱ्याला घेऊन ऐटबाज बग्गी कशी येत असेल...नक्षीदार जॅकेट घातलेले, सोनेरी केसांचे, कमरेला तलवारी लटकवलेले, गुडघ्यापर्यंतच्या उंच शूजचा आवाज करत उतरणारे गोरे अधिकारी...मग सॅल्यूट मारून लयबद्ध आवाज करत अश्वदल कसं निघून जात असेल...या असं सगळं गतकाळातल्या जगातलं चित्र रंगवता रंगवता आम्ही त्या जगात भटकून यायचो.
लोंढेकाका आणि अजय आज या जगात नाहीत; परंतु ती चित्रं पाहताना ती आठवणींची खिडकी उघडते
....पुढं-मागं अश्वदल असलेली ऐटबाज बग्गी येते...ब्रिटिशांच्या वेशातले ते दोघं त्या बग्गीतून उतरतात...एक स्मितहास्य करत भव्य हॉलमध्ये निघून जातात...माझ्या विचारांचं घोडदळ टापांचा आवाज न करताच लुप्त पावतं...मी चित्रातली सुन्नता अनुभवत राहतो... अजूनही उभ्या असलेल्या त्या इमारतींसारखी...!

Web Title: hemant joshi write article in saptarang