लांबी X रुंदी X काळ ! (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
रविवार, 8 एप्रिल 2018

चित्रकार पूर्ण प्रदर्शनातून त्याचं भाष्य, संवेदना, कल्पना, विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात काही अंशी तो सफलही होतो. माझ्या मते, चित्रकाराला त्याच्या चित्रांमधून काहीतरी सांगायचं असतंच; नाहीतर तो केवळ एकच चित्र काढून थांबला असता. काही चित्रांत नुसतेच रंग असतात, अबोध आकार असतात...म्हणजेच त्या स्पष्ट न होणाऱ्या आकाराच्या पातळीपर्यंत तो चित्रकार जातो...अशा अबोध आकारांचा वेध घेणं हेच तर त्याचं सांगणं नसावं ना? तर कधी कधी तो असे काही रंगलेपन आकारत जातो, त्या रंगांतून-आकारांतून पाहणाऱ्याच्या मनात प्रतिमांचे कल्लोळ उठू शकतात.

चित्रकार पूर्ण प्रदर्शनातून त्याचं भाष्य, संवेदना, कल्पना, विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात काही अंशी तो सफलही होतो. माझ्या मते, चित्रकाराला त्याच्या चित्रांमधून काहीतरी सांगायचं असतंच; नाहीतर तो केवळ एकच चित्र काढून थांबला असता. काही चित्रांत नुसतेच रंग असतात, अबोध आकार असतात...म्हणजेच त्या स्पष्ट न होणाऱ्या आकाराच्या पातळीपर्यंत तो चित्रकार जातो...अशा अबोध आकारांचा वेध घेणं हेच तर त्याचं सांगणं नसावं ना? तर कधी कधी तो असे काही रंगलेपन आकारत जातो, त्या रंगांतून-आकारांतून पाहणाऱ्याच्या मनात प्रतिमांचे कल्लोळ उठू शकतात. कधी त्यांना त्यात झाडाच्या सालींचा खरखरीतपणा दिसेल...कधी सुकलेल्या पानांचं हरवलेपण दिसेल...कधी खळखळ वाहणाऱ्या ओढ्यातला अवखळपणा दिसेल...कधी एकही ढग न उमटलेलं विस्तीर्ण गूढ आकाश दिसेल...एक चित्र जे सांगतं ते हजार शब्दांतूनही व्यक्त होत नाही; असं सर्रास म्हटलं जातं. मात्र, हे काही बाबतींत शक्‍य नसतं. कारण, प्रत्येक व्यक्त होणाऱ्या माध्यमाला विशेष ताकदही आहे आणि मर्यादासुद्धा!

चित्रपटात किंवा रंगमंचावरच्या नाटकात एखादी कल्पना प्रभावीपणे मांडता येते. ती नटमंडळी, ते प्रॉप्स (नेपथ्य), मिळालेला काही तासांचा वेळ या त्या माध्यमाच्या जमेच्या बाजू असतात. शिवाय, नाटकात आणि चित्रपटात ‘श्राव्य’ या घटकाचा खास ताकदीनं उपयोग होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकात पाहा ः झोपडीतलं दृश्‍य असेल...विंगेतून धापा टाकत एंट्री करणाऱ्या छोट्या मुलाला ती नटी म्हणते  ः ‘‘आरं, येवढा काळोख होईस्तवर कुटं हुंदडत व्हतास? भाकरीचा चतकोर हाय, त्यो तुला देतो. खाऊन घी. बिचारं माझं प्वार दिसभराचं उपाशी हाय...’’
तो छोटा मुलगा म्हणतो ः ‘‘आये, वर बाहीर ढगात चंद्र भाकरीच्या चतकोरावानी का झालाय गे?’’

या वाक्‍यानं प्रेक्षक-श्रोता थिएटरमध्येच, झोपडीत बसून बाहेरच्या नसलेल्या काळोखातल्या चतकोरीच्या चंद्रप्रकाशाची प्रतिमा आपल्या मनात अनुभवतो. चित्रपटात हाच काळोखाचा शॉट, कट टू चंद्रप्रकाशाचा शॉट...कट टू झोपडीतला ती असल्याचा शॉट...असं सगळं सहज जोडत चित्र उभं करता येतं. प्रेक्षक-श्रोता त्यातलाच भाग बनून जातो. गुंतत जातो. थोडसं मागं मूक चित्रपटाच्या काळात आपण गेलो तर बॉडी लॅंग्वेज आणि एक्‍स्प्रेशन्सला महत्त्व असायचं आणि त्यांचा अंतर्भाव सगळ्या चित्रीकरणात परिणामकारकरीत्या केलेला असायचा. चित्राच्या बाबतीत मात्र हे दाखवताना खूप मर्यादा येऊ शकतात. त्यात मूव्हमेंट, श्राव्य, संवादातून प्रतीत होणारी भूक, भाव ही बलस्थानं, तसंच थिएटरमधल्या काळोखाची जी स्पेस प्रेक्षक-श्रोत्याभोवती असते या सगळ्या बाबी तिथं वजा असतात. चित्रकलेच्या मर्यादांविषयी मला दुःख करत बसायचं नाहीये. मात्र, एखाद्या कलाकाराचा ‘रेट्रॉस्पेक्‍टिव्ह शो’ पाहणं म्हणूनच गरजेचं! कारण, इथं त्याला ती अमुक एक काळाची स्पेसही मिळते, जीमधून त्या चित्रकाराचा विचार, रंगलेपन, एकूण पद्धत, पेपर, कॅनव्हास किंवा अनेक पोत हाताळण्यातली सक्षमता किंवा अभ्यास अशा बाबी प्रेक्षकाला पाहायला मिळू शकतात. हे असं प्रदर्शनातल्या चित्रांमधून घडू शकतं. मात्र, एक-दोन चित्रांतून तो चित्रकार आणि त्याचं भाष्य समजणं मला वाटतं कठीण! किंवा सातत्यानं त्याची दोन-तीन चित्रं अनेक प्रदर्शनांतून पाहायला मिळाली तर त्याच्या चित्रांची पुसटशी ओळख होऊ शकते; म्हणूनच चित्रातल्या स्पेसइतकीच काळाची स्पेसही चित्रकाराच्या दृष्टीनं आवश्‍यक असते. आज जे मातब्बर चित्रकार आपल्या माहितीचे आहेत अशा चित्रकारांनी किंवा ज्यांना लौकिक मिळाला नाही, अशाही चित्रकारांनी आपल्या आयुष्यातली काही दशकं खर्ची घातली आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांच्या सांगण्याला, त्यांच्या चित्रांना ‘लांबी गुणिले रुंदी गुणिले काळ’ असं मोजमाप असायला हवं!

Web Title: hemant joshi write article in saptarang