आकाराचं असं घडणं अनिवार्य! (हेमंत जोशी)

hemant joshi write article in saptarang
hemant joshi write article in saptarang

रोजच्या व्यवहारातल्या अगदी साध्यासुध्या कंगव्यासारख्या वस्तूचा, आकृतिबंधाचा "प्रतिमेकडून प्रतिमेकडे' या माझ्या चित्रमालिकेत शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. जिथं जिथं वेगवेगळ्या आकारांचे कंगवे दिसत, म्हणजे अगदी "केळकर वस्तुसंग्रहालय' ते ब्यूटी सेंटर्सपासून फुटपाथकडंही माझी नजर सहजच वळे. असंच फुटपाथवरल्या एका विक्रेत्याकडं उगाचच कंगवे पाहत असताना तो विक्रेता म्हणाला ः ""साहेब, लेडीज की जेंट्‌स कंगवा पाहिजे?'' मी त्याच्याकडं लक्ष न देता एक बाकदार वळण असलेला आणि दात्यांच्या आतल्या जागेवर पोटासारखा भाग असलेला कंगवा उचलला. तो म्हणाला ः ""हा तुमच्यासाठी नाही, लेडीजसाठी आहे!'' का कुणास ठाऊक...पण त्याच्या बोलण्यानं त्या कंगव्यात मला स्त्रीची प्रतिमा जाणवली. थेट माझ्या "प्रतिमेकडून प्रतिमेकडे' या चित्रमालिकेत एका चित्रात गर्भवती स्त्री आणि तिच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या रूपात ही प्रतिमा उतरली. प्रतिमेच्या शोधात हे असं काही गवसतं आणि निर्मितीचा आनंद द्विगुणित होतो. मात्र, हे चित्र करता करता माझ्या विचारांच्या अवकाशात ती दोन अवकाशं वेगळं काही रुजवत होती. एक- ते बीज जिथून आलं ते बाह्य अवकाश आणि दुसरं - ज्या अवकाशात (गर्भाशयात) तो आकार फुलणार होता ते अवकाश. एका आकाराचं दोन अवकाशांत प्रवास करणं. त्या कंगव्याचा आकृतिबंधसुद्धा आपला आशय सोडून दुसऱ्या अवकाशात प्रवेश करतो. एका चित्रकाराच्या नजरेतून, भूमिकेतून पाहिलं तर हा आकाराचा आणि अवकाशाचा, एका प्रतिमेतून दुसऱ्या प्रतिमेचा आभास निर्माण करण्याचा खेळ किती विलक्षण आहे! या सृष्टीत अशा चित्रमय घटना घडतच असतात.

एका बीचा आकार पाहा ः तीमधून निर्माण होणारा कोंबाचा आकार वेगळा... त्या कोंबाला फुटलेल्या पानाचा आकार, रंग वेगळा...असंख्य फांद्या, पानं मिळून झालेल्या झाडाचा आकार वेगळा...त्यावर धरलेल्या फळाचा, फुलाचा आकार वेगळा (जणू निसर्गानं त्यात इनबिल्ट यंत्रच बसवल्यासारखं हे घडत असतं!). आकारांची मालिकाच!
हे तर झालं सजीवांचं; पण निर्जीव गोष्टीही आकार बदलत असतात. अगदी दगड, वाळवंटसुद्धा! डोंगरावरून तुटून अनेक महाकाय शिळा घरंगळत तुटत-फुटत खाली येतात, तर पावसाच्या संततधारेमुळेसुद्धा दगडांच्या आकारात बदल होत जातात. नदीकाठच्या अनेक दगडांचे पाण्याच्या फटकाऱ्यानं आकार बदलतात. नदीच्या प्रवाहात वाहत जाणारे दगड-गोटे आपलं रूप बदलतात. त्यांच्या पोटात दडलेल्या स्फटिकांचा शुभ्रपणा दिसायला लागतो. असे स्फटिक, वेगवेगळ्या विचित्र आकाराचे दगड गोळा करण्याचा, ते संग्रही ठेवण्याचा छंद अनेकांना असतो. हे आकार आपल्या अनुभवविश्वातल्या कुठल्या तरी आकाराशी साधर्म्य पावलेले भासतात किंवा नसतातही. मात्र, ते थेट कित्येकांच्या दिवाणखान्यात विराजमान झालेले मी पाहिले आहेत. आता वाळवंटाचंच पाहा. वाऱ्यामुळे वाळूचे असंख्य कण इकडून तिकडे हलतात आणि जे काही नाट्य रोज घडतं ते नयनमनोहर असतं. मला तर त्या वाळवंटात रेषांच्या लाटाच दिसतात. रणरणत्या उन्हातही राजस्थानला आलेले पर्यटक आवर्जून हे पाहायला जातात. भारतातल्याच काय, जगातल्या अनेक नावाजलेल्या फोटोग्राफर्सच्या शिदोरीत आणि लाखोंहून अधिक पर्यटकांच्या हृदयात या प्रतिमा नसल्या तरच नवल!
एकूण, या सजीव-निर्जीवातही आकाराचं असं घडणं अनिवार्य असतं! असा घडणारा किंवा घडू शकणारा सजीव-निर्जीवातला बदल मी माझ्या एका काल्पनिक चित्रात मांडलाय...

एक बी दगडाच्या कुशीत पडलं होतं ऊन्ह सोसत...काही महिने लोटल्यानंतरही दोघांच्यात वाढही झाली नाही की घटही...दगडाचं सोडा; पण बीचंसुद्धा झाड झालं नाही...मातीचा एक लोट आला आणि गाडून गेला इवल्याशा बीला...मग आलेल्या पावसाच्या सरीनं शमवली दगडाची आग आणि बीची तहानसुद्धा... बीला कोंब फुटला...तो वाढू लागला...पाना-फुला-फळांनी बहरून गेला...त्याचा मोठा वृक्ष झाला.
दगड मात्र वाऱ्या-पावसाच्या माऱ्यानं झिजू लागला...हळूहळू त्याचाही आकार बदलू लागला...नको ते सारं झडून गेल्यानं त्याचं काळं तुकतुकीत "शरीर' दिसू लागलं...कुण्या एका शिल्पकाराच्या ते नजरेत भरलं...आणि त्याला सुंदर रूप प्राप्त झालं...

...त्या झाडावर पक्ष्यांच्या भूपाळ्या सुरू झाल्या....फळांची पखरण (नैवेद्य), फुलांचा अभिषेक घडू लागला....मग कुणी वाटसरू त्याच्या सावलीला दोन घटका विसावला...जाता जाता सहजच नतमस्तक होऊन जाऊ लागला. कदाचित माझ्या कल्पनाविश्वातलं हे चित्र तुमच्याही मनातल्या कॅनव्हासवर (अवकाशात) जाऊन विसावलं असेल ना! पाहा, दोन आकारांचं दोन अवकाशांत प्रवास करणं...एका आशयाचंही दुसऱ्या अवकाशात आकार घडवणं...ते हेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com