चित्रास्वाद आणि दृष्टिकोन (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
रविवार, 29 एप्रिल 2018

हे सदर सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत एक चित्रकार म्हणून जगताना सभोवतालच्या घडणाऱ्या घटनांचा, दृश्‍यांचा, त्यातल्या त्यात ठळकपणे निसर्गातल्या घडामोडींशी होणारा संवाद इथं शब्दांत आणि जमेल तसा चित्रांत मांडत गेलो. चित्रकार, चित्र आणि भवतालचं हे सजीव-निर्जीव विश्व यांची एक त्रिमिती असते, ती काही अंशी रेखण्याचा प्रयत्न केला. "चित्राकडं, निसर्गाकडं पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन सापडले' असं अनेकांच्या प्रतिक्रियांतून जाणवलं. खरं पाहता हे काही जगावेगळं नव्हतंच, हे सगळं सगळ्यांना पाहता येणं शक्‍य! पण होतं काय...

हे सदर सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत एक चित्रकार म्हणून जगताना सभोवतालच्या घडणाऱ्या घटनांचा, दृश्‍यांचा, त्यातल्या त्यात ठळकपणे निसर्गातल्या घडामोडींशी होणारा संवाद इथं शब्दांत आणि जमेल तसा चित्रांत मांडत गेलो. चित्रकार, चित्र आणि भवतालचं हे सजीव-निर्जीव विश्व यांची एक त्रिमिती असते, ती काही अंशी रेखण्याचा प्रयत्न केला. "चित्राकडं, निसर्गाकडं पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन सापडले' असं अनेकांच्या प्रतिक्रियांतून जाणवलं. खरं पाहता हे काही जगावेगळं नव्हतंच, हे सगळं सगळ्यांना पाहता येणं शक्‍य! पण होतं काय...

...वरील त्रिमितीत कर्ता आणि कर्म वेगवेगळं असतं आणि भवताल तोच असतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर...कर्ता हा वैज्ञानिक असेल तर "कर्मशोध' भवताल तोच, ...कर्ता हा लेखक किंवा कवी असेल तर "कर्मसाहित्य' भवताल तोच, ...अगदी कर्ता हा शेतकरी असेल तर "कर्मशेत' भवताल तोच ...इतकं सरळ आणि साधं आहे.
या सगळ्यात कर्ता आणि त्याची बुद्धी ही जीवनातल्या एका टप्प्यापासून जाणीवपूर्वक घडवली जाते. म्हणजे शालेय जीवनापासून त्याची घडण कशी करायची (सहज होणारी त्यामानानं कमी दिसते) हे ठरवलं जातं. मग त्या त्या विषयाचा अभ्यास काही वर्षं होत राहतो. त्यातला उच्च पदापर्यंतचा अभ्यासही होतो. मग त्या जोडीला करिअर होतं...डॉक्‍टर, इंजिनिअर, वास्तुविशारद, चित्रकार...इत्यादी इत्यादी. त्या विषयातल्या अभ्यासानं, अनुभवानं एक "फोकस्ड्‌' जगणं बनतं आणि निर्माण होतो एक "दृष्टिकोन'. कधी कधी हा"दृष्टिकोन' अनेक ठिकाणी अडसरही होऊ शकतो (मात्र, प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच). चित्रनिर्मिती आणि चित्रास्वाद यांच्या बाबतीत आम्हा चित्रकारांना बऱ्याचदा या गोष्टींना सामोरं जावं लागतं! कधी याचा फायदा होतो, कधी तात्त्विक वाद!

माझ्या प्रदर्शनात काही चित्रं मी "फोटो इंक्‍स' या माध्यमात रंगवली होती. केमिकल विषयाचा चांगला अभ्यास असणारे एकजण ते प्रदर्शन पाहायला आले होते. काही रंगांचे इफेक्‍ट्‌स त्यांना खूप आवडले. माझ्याशी त्यांनी आवर्जून चर्चा केली. त्या चर्चेचं फलित असं ः रंग हे केमिकल्स आहेत, काही रंगांमध्ये दुसरी काही केमिकल्स वापरून ताकद वाढवता येते, खुलवता येऊ शकते.' मी तसा प्रयत्न करून पाहिला आणि खूपच सुंदर परिणाम साधता आले किंवा मिळाले. हे इफेक्‍ट्‌स, हे रिझल्ट्‌स कसे काय मिळाले, याचं आश्‍चर्य माझ्या अनेक चित्रकार-मित्रांनाही वाटलं होतं. खरंतर त्या केमिकल-अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, "तुमचे हे रंग एकमेकांत मिसळणं म्हणजे आमची "केमिकल कॉम्पोझिशन्स' आहेत आणि होणारे परिणाम म्हणजे "केमिकल रिऍक्‍शन्स.' बस एवढंच!'

मी चक्रावून गेलो. कारण, त्यांच्या केमिकल "कॉम्पोझिशन्स'मधली "कॉम्पोझिशन्स' म्हणजे चित्रकलेसाठी एक वेगळं समीकरण आहे....कलर-कॉम्पोझिशन, स्पेस-कॉम्पोझिशन इत्यादी इत्यादी. आणि "रिऍक्‍शन्स' म्हणजे त्यातून घडणारे, रंगांतून घडणारे परिणाम!

यातूनच तर अनेक चित्रं घडत असतात! कॉलेजमध्ये असताना "पोर्ट्रेट' किंवा "लाइफ स्टडी'साठी रूमच्या मध्यावर एक मॉडेल बसवलं जायचं. त्याच्या समोर तिन्ही बाजूंना आम्ही एकेक जण बसून ड्रॉइंग करायचो. आपण जिथं बसलेलो असायचो, त्या कोनातूनच त्या मॉडेलचं चित्रण व्हायचं; त्यामुळं प्रत्येकाच्या ड्रॉइंगमध्ये साहजिकच फरक असायचा. (पिकासोच्या काही व्यक्तिचित्रांमध्ये एकाच ड्रॉईंगमध्ये अनेक कोनांतून दिसणारं चित्र पाहिल्याचं आठवत असेल; ज्यामुळं कलाक्षेत्रात खळबळ उडाली होती). हे सगळं मांडताना माझ्या डोळ्यांसमोर एक दृश्‍य झर्रकन सरकून गेलं. त्या मॉडेलसमोर एक डॉक्‍टर, एक साहित्यिक किंवा कवी, एक सामान्य माणूस असेल तर काय होईल...?

डॉक्‍टर त्याच्या शरीराच्या रचनेचा, फिटनेससंबंधीचा विचार करतील... साहित्यिक त्याचं सुंदर वर्णन लिहितील...सामान्य माणूस एकमेकांच्या जगण्याबद्दलचा किंवा तत्सम विचार करू लागेल...प्रत्येकाचा "पॉइंट ऑफ व्ह्यू' वेगळाच होईल का? "पॉइंट ऑफ व्ह्यू' जगाकडं पाहण्याचा, जगण्याचा, आस्वाद घेण्याचा हा ठरत जात असतो. त्या चष्म्यातून पाहण्याचा मोह टाळता येणं कठीण! अनेकदा व्याख्यान-प्रवचनातून आपण ऐकलं असेलच ः "देवाच्या दर्शनाला जाताना आपला मान-मरातब या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून मंदिरात प्रवेश करावा, त्या अवस्थेत आपल्याला दर्शन घडतं.' हेच चित्राच्या बाबतीत मी म्हणेन/म्हणता येईल. आपले सगळे अनुभव, पूर्वग्रह आर्ट गॅलरीच्या बाहेर विसरून चित्र पाहा आणि त्यातला निर्मळ आनंद अनुभवा. चित्रकाराला ते घडवताना जे दिसलं, भासलं असेल त्याहूनही कदाचित अधिक तुम्हाला दिसणं शक्‍य आहे.

Web Title: hemant joshi write article in saptarang