सृजनाच्या बिया! (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
रविवार, 21 जानेवारी 2018

दुपारच्या टळटळीत उन्हात गावाच्या खालच्या अंगाला असलेल्या कोळीवस्तीत मी आलो. कोळ्यांची घरं तिथं इतक्‍या दाटीवाटीनं उभी होती, की दोन घरांच्या मधून वाट काढत मी ड्रॉईंग बोर्ड, रंगांच्या साहित्याची बॅग सावरत कसाबसा तिथं पोचलो. तसं आधी दोन-तीन वेळा इथं येऊन गेलो होतो; पण त्या वेळी लॅंडस्केप करायला बसलो नव्हतो. उन्हाची एक विशिष्ट दिशा, सावल्यांचा एक विशिष्ट कोन चित्रकाराला नेहमीच आकर्षित करत असतो; पण आत्ता तरी तसं ठसठशीत इथं काही नव्हतं.
मधल्या भागात अंगणवजा जागा होती. ही जागा बहुतेक सामायिक असावी. घरांच्या कोंडाळ्यातली ब्रीदिंग स्पेस...जशी चित्रातही आवश्‍यक असते तशी!

दुपारच्या टळटळीत उन्हात गावाच्या खालच्या अंगाला असलेल्या कोळीवस्तीत मी आलो. कोळ्यांची घरं तिथं इतक्‍या दाटीवाटीनं उभी होती, की दोन घरांच्या मधून वाट काढत मी ड्रॉईंग बोर्ड, रंगांच्या साहित्याची बॅग सावरत कसाबसा तिथं पोचलो. तसं आधी दोन-तीन वेळा इथं येऊन गेलो होतो; पण त्या वेळी लॅंडस्केप करायला बसलो नव्हतो. उन्हाची एक विशिष्ट दिशा, सावल्यांचा एक विशिष्ट कोन चित्रकाराला नेहमीच आकर्षित करत असतो; पण आत्ता तरी तसं ठसठशीत इथं काही नव्हतं.
मधल्या भागात अंगणवजा जागा होती. ही जागा बहुतेक सामायिक असावी. घरांच्या कोंडाळ्यातली ब्रीदिंग स्पेस...जशी चित्रातही आवश्‍यक असते तशी!

पावसाळा सुरू होण्याआधी तिथल्या मंडळींना वाळ्‌वणं करून घ्यायची असल्यानं शेणानं सारवलेल्या त्या मोकळ्या जागेत जेमतेम येणाऱ्या उन्हात प्लास्टिक अंथरून लाल मिरच्या पसरून ठेवलेल्या होत्या. काहींनी घरांच्या छपरांवर टोपल्यांमधून आपापली ही सोय भागवली होती, तर कुणीतरी एका छोट्या स्टुलावर ताटात वाळवण ठेवलेलं होतं. पावसाचे वेध लागलेलं काळवंडलेलं ऊन्ह मधूनच उग्र रूप धारण करत होतं. खरं तर मी इथं खिळून राहिलो तो यामुळंच!

मी चित्र काढायला बसलोच... खडबडीत पृष्ठभागाच्या किरमिजी जांभळ्या रंगाच्या जांभ्या दगडाच्या भिंती असलेली कौलारू छपरांची घरं. काही घरं दुमजली दिसत होती. म्हणजे घराचं जोतं कंबरभर उंचीचं. त्यावर एकमजली घर.
साधारणतः सगळ्याच घरांना छोट्या छोट्या खिडक्‍या होत्या. झडपा नसलेल्या; पण काही लोखंडी गजांच्या, तर काही लाकडी फळ्या ठोकून बंद केलेल्या. काही घरांची ‘चाळवणी’ केलेली दिसत होती. (छप्पर गळू नये म्हणून तुटली-फुटली कौलं काढून त्या जागी नवीन कौलं पावसाळा सुरू होण्याआधी बसवतात, तसंच कौलांमध्ये अडकलेला पालापाचोळा काढून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करतात...या प्रक्रियेला ‘चाळवणी’ म्हटलं जातं). मध्ये मध्ये नवीन कौलंही बसवलेली होती. जुन्या-नव्या कापडांच्या चिंध्या जोडून जशा दऱ्या (सतरंज्या) विणल्या जातात, तसे सुंदर पॅटर्न त्या नव्या कौलांमुळं छपरावर दिसत होते. चिऱ्यांच्या भिंतींना मात्र जुनेपणा आलेला होता, तरीही त्यांनी आपला उग्रपणा सोडलेला नव्हता. एका उंच जोत्याच्या घराला नुसते चिऱ्यांवर चिरे ठेवून अलीकडच्याच काळात केलेल्या पायऱ्या दिसत होत्या. त्यांचं नवेपणही उठून दिसत होतं. त्या पायऱ्यांमध्ये दिवा ठेवायला केलेला कोनाडा (म्हणजे एक छोटा चिरा रचताना तो थोडा सरकवून बसवून केलेली जागा) होता; पण तोही इतका भाव खाऊन जात होता!

अशा छोट्या छोट्या गोष्टी ‘चित्रवृत्ती’ मोहित करतात आणि ‘या समोरच्या दृश्‍यात चित्र काढण्यासारखं काय आहे?’ असे प्रश्‍न अशा ठिकाणी निरर्थक ठरतात!
एखादं नयनरम्य स्थळाचंच चित्र काढावं, असं नसतंच मुळी! छोट्या ताना, आलाप, मुरक्‍या घेऊन गायक आपल्या गायनात सौंदर्य भरतो. गात असताना त्याला त्या दिसत असतात. सहज तो त्यामागं जातो आणि जो ते लीलया साधतो, त्या जागा ‘वाह’ ‘क्‍या बात है’नं रसिकांची ‘बक्षिशी’ मिळवतात. चित्रातही थोडंफार असंच असतं; त्या जागा अचूक हेरता याव्या लागतात...
...मग ती कधी छपरावर ठेवलेली टोपली असते
.....कधी वाळ्‌वणासाठी ठेवलेलं स्टूल असतं किंवा कधी खिडकी झाकण्यासाठी लावलेलं प्लास्टिकही! मात्र, हे सगळं त्या अवकाशाशी निगडित असलेल्या अनेक गोष्टींवर ठरतं! चित्रातल्या आकाराचं, आशयाचं देखणेपण (सौंदर्य) नेमकं कुठं आहे, हे पाहणं कठीण आणि ते उतरवणं तर त्याहूनही कठीण! ज्या कलाकारांनी हे लीलया पेललेलं आहे, त्या दिग्गजांच्या चित्रांमधून चित्ररसिकांनी हे अनुभवलं असेल. चित्रातलं मर्म ते हेच!

येता येता त्या वाळ्‌वणातल्या मोठाल्या सुकलेल्या आणि ठुसक्‍या आकाराच्या रसरशीत, तेलकट, तजेलदार मिरच्या मी सहजच उचलून आणल्या होत्या. माझ्या रंगांच्या बॉक्‍समध्ये तसं नेहमीच असं काही काही जमवलेलं असतं...वाळलेली पानं, फुलांच्या पाकळ्या, गुंजा, पक्ष्याची पिसं...आणि असलं बरंच काही!
माझं रंगकाम सुरू होतं. आजूबाजूला रंगांच्या ट्यूब्ज, ब्रशेस, कलर पेन्सिल्स जमिनीवर पसरलेल्या होत्या. लाल रंगाचा ओपेग थर लावण्यासाठी मी पॅलेटवर ट्यूब दाबली; मात्र...! ती ट्यूब नव्हती, तर ती होती लाल रंगाची सुकलेली मिरची! गडबडीत चुकून मी ट्यूब समजून सुकलेली मिरची उचलली होती...मिरचीतल्या बिया साहजिकच पॅलेटवर पसरल्या.
आणि क्षणभर...त्या पॅलेटवर लाल रंगाच्या ट्यूबमधून बियाच बाहेर पडत आहेत, असं मला वाटलं!

माझ्या ‘दृश्‍यभास’ मालिकेत आणखी एका दृश्‍यसंकल्पनेचं ‘बीज’ रुजलं!
एखाद्या अथवा दोन भिन्न आकारांच्या वस्तुमानाच्या एकत्र असण्यानं वस्तूचे चित्रसंदर्भ बदलू शकतात अथवा येणारा चित्रानुभव चकित करणारा असू शकतो.
चित्रावस्थेत अनपेक्षितपणे मिळणारे हे सौंदर्यानुभवाचे क्षण सृजनशील अवकाशात अनेक प्रतिमांचं दर्शन घडवतात! मात्र, हे क्षण कुठं, कधी, कसे सापडतील याचा काही नियम नाही!

Web Title: hemant joshi write article in saptarang