रहाट (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मोबाइलचा गजर झाला. प्रातर्विधी आटोपून मी वॉकसाठी बाहेर पडलो. का कुणास ठाऊक, बरोबर स्केचबुक आणि आणि रंगसाहित्याची झोळी घेतली. अजून पूर्ण उजाडलंही नव्हतं. धुक्‍याचा पडदा अजून तसाच होता; झोपून उठल्यावर पांघरूण आवरायचं राहून गेल्यासारखा. दवानं भिजून टपटपणारी कुंपणाच्या वेलीवरची पानं-फुलं शहारली होती. वेलीवरून ओघळणाऱ्या दवानं खालचा डांबरी रस्ता आणि मातीचा भागही ओला झाला होता.

मोबाइलचा गजर झाला. प्रातर्विधी आटोपून मी वॉकसाठी बाहेर पडलो. का कुणास ठाऊक, बरोबर स्केचबुक आणि आणि रंगसाहित्याची झोळी घेतली. अजून पूर्ण उजाडलंही नव्हतं. धुक्‍याचा पडदा अजून तसाच होता; झोपून उठल्यावर पांघरूण आवरायचं राहून गेल्यासारखा. दवानं भिजून टपटपणारी कुंपणाच्या वेलीवरची पानं-फुलं शहारली होती. वेलीवरून ओघळणाऱ्या दवानं खालचा डांबरी रस्ता आणि मातीचा भागही ओला झाला होता.

चालता चालता रस्त्यावरची मनातली खूण अंधूकशी दिसू लागली; कुंपणापलीकडचं पारिजातकाचं झाड! त्याच्या फुलांचा सडा त्या धुक्‍यातल्या रस्त्यावर पडलेला दिसू लागला. क्षणभर वाटलं, आकाशातल्या धूसर पांढऱ्या ढगांचा तुकडाच त्यात अडकलेल्या चांदण्यांसकट अलगद जमिनीवर उतरलाय! पुढं होऊन त्यातली चार फुलं उचलली. त्या टपोऱ्या फुलांच्या पाकळ्यांवर आणि देठांवर दवबिंदूंनी माळ ओवली होती. मिटणाऱ्या तारकांचा शुभ्रपणा आणि उगवणाऱ्या सूर्याचा तेजस्वी शेंदरी रंग त्या नाजूक फुलात गुंफणाऱ्या निसर्गाच्या निर्मात्याला मनोमन वंदन केलं. त्या फुलांच्या मंद सुगंधाचा दीर्घ श्वास घेतला. कर्रऽऽर्रर्र...गेट उघडल्याचा आवाज झाला.

बाहेर येणाऱ्या शेजारच्या काकांनी विचारलं ः  
‘‘अरे, कधी आलास? मॉर्निंग वॉकला निघालास का...? चल, मी पण...’’
माझ्या हातातलं स्केचबुक आणि झोळी पाहत अडखळत म्हणाले ः ‘‘स्केचिंग करायला चालला आहेस वाटतं रहाटावर; तुझ्या फेव्हरिट स्पॉटवर...? पण आता बदललंय रे बरच! मात्र, तुम्हा मंडळींना कशात काय दिसेल याचा नेम नाही. भेटू या.’’
माझ्या उत्तराची वाट न पाहता ते निघूनही गेले. मी वाडीच्या (फुलझाडांची लागवड केलेली बाग) दिशेनं पावलं वळवली...
‘आता बदललंय बरंच’ या वाक्‍यानं मी चक्रावून गेलो. म्हणजे, बदल माणसाला सहजी पचनी पडत नाही हेच खरं! काय बदललं असेल या विचारानं मी एकदम नॉस्टॅल्जिक झालो.
...वाडीतल्या झाडांचं शिंपण करण्यासाठी लावलेल्या कुंई कुंई वाजणाऱ्या रहाटाचा (विहीर किंवा तळ्यावर लावलेला मोठा माळेचा रहाट) आवाज मला चालता चालता येऊ लागला...तो आवाज स्पष्ट होऊ लागला... रहाटाच्या आवाजावरून त्याच्या लाकडी तुळयांमधलं वंगण संपत चाललं असल्याचं जाणवत होतं. तो घाणा फिरवणाऱ्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगुरमाळांची किणकिणही हळू हळू ऐकू येऊ लागली. रहाटाच्या माळेतल्या मडक्‍यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाजही आता स्पष्ट येऊ लागला. भर पावसात डोंगरवाटेत जागोजागी उंचावरून पडणाऱ्या ओहोळांची संततधार जशी असते, तसं ते विहिरीत पडणारं पाणी त्या कुरकुरण्याबरोबर मस्त ताल धरून बसलं होतं. बांधातून स्वच्छ नितळ पाणीसुद्धा एका विशिष्ट पट्टीचा (काळी दोन की तीन सांगता येणार नाही!) सूर पकडून खळखळ वाहत होतं. ही सगळी गायक-वादक मंडळी पेश करत होती तो राग कुठला होता ते माहीत नाही; पण इथं कुठलाच स्वर वर्ज्य नसावा... सगळंच शुद्ध!

त्या मोटेचा आवाज थांबला. मागोमाग शिंपण करणारा नोकर नथू बैलांना चारा घालून तिथून निघून गेला. घाण्याला जुंपलेला पुष्ट, बांधेसूद बैल पुढं टाकलेला चारा निवांतपणे खात होता. त्यामागं कुदळ, फावडी वगैरे बागकामाची अवजारं ठेवण्यासाठी एक खोली होती. मोडक्‍या लाकडाच्या फळ्या जोडून उभ्या केलेल्या भिंतीवर झावळ्यांचं (नारळाचे झाप विणून केलेलं) छप्पर होतं. त्या ओबडधोबड लाकडी फळ्यांमधून दिसणारा आतला काळोख, नथूनं भिंतीला आत्ताच टेकून ठेवलेली कुदळ-फावडी, बैलाला देऊन उरलेली चाऱ्याची गासंडी, त्या फिकट पिवळ्या वाळलेल्या गवतावरचा संधिप्रकाश...

... सगळं सगळं एखाद्या चित्ररचनेसाठी लागणारं "पोटेन्शियल मटेरिअल' तिथं जणू कुणीतरी व्यवस्थित मांडून ठेवल्यासारखंच! शेजारच्या खोल विहिरीतला एक गूढ हिरवा-काळा रंग...त्याच्या तुटलेल्या दगडी भिंतीवर उगवलेली पिंपळाची छोटी रोपटी...ठिबकणाऱ्या पाण्यामुळं मिळालेला तेलकट रंग त्या दगडावर उठून दिसणारा... विहिरीच्या मधोमध पाण्यात अर्धी बुडालेली मातीची मडकी जोडलेली दोरखंडाची माळ...एकेक करत जोडलेल्या भांड्यांचा झालेला गोलाकार...त्याला छेदणारे लाकडाचे आरे...त्यावर ठोकलेल्या मोठ्या खिळ्यांमुळं त्याला मिळालेली नक्षी...त्या माळेतली काही मडकी ओबडधोबड आणि काळसर हिरवी मळी चढलेली...काही गळकी, त्यांतून टपटपणारे पाण्याचे थेंब...पाण्यात बुडालेल्या भांड्यांचा बदलता आकार...हलणारं प्रतिबिंब...
...अनेक आकार, अनेक पोत, अनेक रंग तरी सगळं सुसंगत, तालबद्ध, एकमेकांत सहज मिसळून जाणारं
***

...चित्रात हरवून गेल्याच्या अवस्थेतून मी भानावर आलो ते विहिरीवर लावलेल्या मोटारपंपाच्या आवाजानं. काकांचं म्हणणं पटलं! माझ्या चित्रातली विहीर वगळता सगळं कुठंतरी हरवून गेलं होतं. ते बैल, ती सामानाची खोली, तो रहाट आता तिथं नव्हता. त्याऐवजी तिथं मोटारपंप बसवला गेला होता. माझ्यासाठी त्या रहाटचं एक वैशिष्ट्य होतं. जगण्याला ‘जीवनाचा ‘रहाटगाडा/रहाटगाडगं’ असं अनेकांनी संबोधलंय. ‘रहाटगाडगं’ म्हणजे कसंतरी जगणं! मात्र, माझ्या मते ते तसं नसून जगण्याला दिलेलं ते सौंदर्यवाचक विशेषण आहे. जीवनाचा एक वेगळा अर्थ मला इथं जाणवे. हा रहाट चालण्यासाठी वर घाण्याला बैल जोडलेला असतो. तो गोल गोल फिरत असतो. तेवढ्याच जागेत त्याचा एक परीघ ठरलेला असतो. त्याच्या डोळ्यावरती झापडं लावलेली असतात. सतत गोल फिरण्यानं त्याला चक्कर येऊ नये म्हणून (आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोक पाहतो, त्याच त्याच परिघात जीवन जगत असणारे. असलेली सौंदर्यदृष्टी झाकून ठेवून) तो बैल जी दोन चाकं फिरवतो, त्याच्या मध्य आसावर गोल आकारात दोरखंडाच्या कैचीत अडकवलेली मातीची मडकी खोल पाण्यापर्यंत पोचतील अशा बेतानं बसवलेली असतात (मे महिन्यात पाणी कुठवर आटू शकेल, याचा अंदाज घेऊन). विहिरीत असलेलं पाणी, जीवनरस त्या मडक्‍यांतून भरभरून वरच्या खोळात ओतला जातो. हे पाणी सगळ्या बगीच्याला मिळतं आणि सुंदर बाग फुलते. ते आरे, ती मडकी म्हणजे अशी माणसं जी त्या प्रचंड (विहीरभर) जीवनरसात खोल बुडी मारून आपल्या क्षमतेनुसार तो भरून वर आणून ओतून देतात, ती सुंदर बाग फुलवण्यासाठी.

आज जवळजवळ सगळीकडचे रहाट गायब झालेले आहेत. सोबतच बैलही गेले आहेत. त्या जागी मोटारपंप बसले आहेत हजार हजार हॉर्सपॉवरचे! जगण्याची पद्धत बदलत आहे...अधिक वेगवानही होत आहे...पण सौंदर्याच्या बागा फुलतच राहणार! माझ्यासारख्या अनेकांसाठी चित्रकलेतलीही सौंदर्यस्थळं बदलत राहणार! मलाही कलेतली नवता शोधावी लागणारच!

Web Title: hemant joshi write article in saptarang