मेंढ्यासोबत चालताना... (हेरंब कुलकर्णी)

heramb kulkarni
heramb kulkarni

हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली.
मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत होते. अखेर एका रिकाम्या शेताजवळ पोचल्या. तिथं त्या चरायला लागल्या. तिथंही मर्यादा सोडून दुसरीकडं जाऊ नये म्हणून हाकलणं सुरूच होतं...

व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली "बनगरवाडी' वाचल्यापासून मेंढ्या पाळणाऱ्या माणसांविषयी विलक्षण उत्सुकता आणि कणव आहे. बनगरवाडी ज्या गावावर लिहिली त्या गावातही जाऊन आलो. तेव्हाची बनगरवाडी आज कशी बदलली आहे हे बघून आलो. सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमध्ये मेंढपाळ असलेल्या गावात जाऊन मुलाखती घेतल्या. वर्षभर इकडंतिकडं फिरणारे मेंढपाळ नगर जिल्ह्यातल्या ढवळपुरीत येतात. तिथं त्यांच्या मुलांची आश्रमशाळा बघितली. अनेक वर्षं त्यांचे शैक्षणिक प्रश्न समजून घेतोय.

आईसुद्धा लेकरू वैतागून कधीतरी दुसऱ्याकडं सांभाळायला देते. दिवसातले 24 तास मेंढ्यांसोबत हे लोक कसे राहत असतील, याची उत्सुकता होती. हे बघायला सकाळीच पोचलो. रात्रीच्या जागरणानं सकाळी घर काहीसं आळसावलेलं दिसत होते. घरातल्या महिलेचा स्वयंपाक सुरू होता. लहान मुलगी कुत्र्याशी खेळत होती. वाघुरात मेंढ्या आणि शेळ्या बाहेर पडायची वाट बघत होत्या. महिलेचा पती बाहेरगावी गेला होता आणि मुलगा उद्या कोणत्या शेतात मेंढ्यांना बसवता येईल याची शोधाशोध करायला गेला होता. सोबतची लहान मुलगी बारा वर्षाची. तिची चौकशी केली, तर नणंदेची ही पोरगी मेंढ्या वळायला सोबत आणलेली. ""शाळा किती शिकली?'' असं विचारलं, तर ती कधीच शाळेत गेलेली नव्हती. मला सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा हक्क, त्याच्या जाहिराती, परिषदा सारं क्षणात आठवून गेलं. अशी किती तरी लेकरं असतील हिच्यासारखी. ही मुलगी थोडी तोतरी बोलत होती. ""डॉक्‍टरला वगैरे दाखवले का?'' विचारलं, तर ""नाही'' म्हणाले. ही मुलगी अशीच मोठी होणार. निरक्षर आणि त्यात व्यंग म्हणजे मेंढ्यांमागंच फिरत आयुष्य घालवावं लागणार.

महिलेनं स्वयंपाक करायला तीन दगडांची चूल केलेली. आजूबाजूच्या काड्या आणि पाचट जाळून चूल पेटवलेली. त्यावर पोळ्या सुरू होत्या. चुलीखालचा जाळ कमी-जास्त होत होता. त्यातून पोळ्या नीट भाजल्या जात नव्हत्या. ""भाजीला काय?'' विचारलं. हिरवी भाजी काही मिळाली नव्हती. त्यांच्याकडे डाळी असतात. ती डाळ करणार होती. पोळी आणि डाळ इतकाच स्वयंपाक त्यांनी केला. डाळीत टाकायला फार काही नव्हतं आणि फोडणीला तेलही कमीच होतं. नंतर आंघोळीला गरम पाणी करायला त्याच चुलीवर ठेवलं. ""आंघोळ कुठं करणार,'' असं विचारल्यावर महिलेच्या डोळ्यांत वेदना दिसली. त्यांनी प्लॅस्टिकचा कागद दाखवला. म्हणाल्या ः ""तिथं दोन लाकडे रोवून आडोसा करते आणि आंघोळ उरकते.'' मला बाथटब आणि मार्बलची चकचकीत बाथरूम आठवली आणि इकडं रोज अब्रू कशी झाकायची हा प्रश्न. तितक्‍यात मुलगा गावातून आला. आंघोळीला जाण्यापूर्वी तिघंही वाघुरात गेले. मेंढ्या आणि त्यांची पिल्लं यांच्या जोड्या नीट लावल्या. पिल्लं पित होती आणि इकडं यांचीही आवरायची घाई सुरू होती.

हे कुटुंब मूळ साताऱ्याचं. फिरतफिरत हे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्‍यात आलं आणि तिथंच स्थायिक झालं. पारनेर तालुक्‍यात शेकडो कुटुंबं मेंढ्या घेऊन फिरत राहतात. तिथं शेती घेतलेली; पण जिरायत जमीन. एक पीक कसंतरी होते. त्यामुळं ते वाट्यानं करायला दिलेलं. फक्त पावसाळ्याचे चार महिने गावाकडं निवारा म्हणून जातात. बाकी गावाचं नातं काहीच नाही. या सर्वांचे जन्म असेच मेंढ्याच्या सोबत फिरताना झालेले.. त्या महिलेला बाळंतपणाचे अनुभव विचारले. त्या म्हणाल्या ः ""भाऊ, बाळंतपनाच्या आदल्या दिवशीपर्यंत मी मेंढ्यामागंच होते. ज्या दिवशी बाळंतपण झालं, त्या दिवशी सोबत महिला कोणीच नव्हत्या. जवळच्या शेतात बाळंत झाले. तिथंच एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवसापासून पाटीत लेकरू घेऊन फिरायला लागले.'' बाई अगदी सहज सांगत होत्या. मेंढीचं कोकरू आणि लेकरू एकाच वेळी सांभाळलं.

सकाळचे आता दहा वाजून गेले. ऊन वाढायला लागलं. आंघोळ झाल्यावर घाईघाईनं जेवण केलं आणि वाघूर उघडलं. कोंडलेली वाफ बाहेर यावी तशा रात्रभर कोंडलेल्या मेंढ्या धावत बाहेर यायला लागल्या. त्यांना आवरणं हेच काम होऊन बसलं. एक जण बाहेर रस्त्यावर धावणारी कोकरं पकडून आणत होता. हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. ती लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली.

मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत होते. मेंढ्या एकीच्या मागं चालत राहतात, त्यामुळं वळणं कठीण. अखेर एका रिकाम्या शेताजवळ पोचल्या. तिथं त्या चरायला लागल्या. तिथंही मर्यादा सोडून दुसरीकडं जाऊ नये म्हणून हाकलणं सुरूच होतं; पण थोडं निवांतपण मिळालं. तरुण मुलगा एका झाडाखाली मोबाईल घेऊन बसला. रोजच्या फुकट दीड जीबीनं या मंडळींना विरंगुळा दिला आहे. चित्रपट डाऊनलोड करून ते तो बघत होता. मी त्याला विचारलं ः ""चित्रपटात ही चकचकीत घरं, गाड्या दिसतात आणि तुम्ही असं जगता याचा काही राग येत नाही का?'' तो म्हणाला ः ""नाही. ते लोक शिकलेले असतात, म्हणून त्यांना हे सारं मिळतं.'' त्यानं स्वत:चं समाधान करून घेतलं होतं. नंतर चित्रपट कलाकारांचा विषय निघाला. त्याला सलमान खान किती कोटी घेतो, हेही माहीत होतं. मी त्याला म्हणालो ः ""त्यांना इतके मिळतात आणि तुम्हाला इतके कष्ट करून कमी पैसे मिळतात हे खटकत नाही का?'' त्यावर तो म्हणाला ः ""त्यांचं नशीब असतं.'' आपल्या धर्मव्यवस्थेच्या नशीब वगैरे शब्दांनी गरिबांच्या सांत्वनाची चांगली सोय केली आहे. त्यामुळं बंडखोरी जागत नाही आणि जोडीला सतत मोबाईलच्या स्वप्नील दुनियेनं आजूबाजूचं कडक ऊन आणि कष्ट विसरण्याची सोय केलेली होती.

त्या रिकाम्या शेतातला घास कमी झाल्यावर ही सगळी यात्रा पाणी पाजायला निघाली. तिथून दीड किलोमीटरवर पाणी होतं. भर उन्हात मेंढ्या घेऊन ते निघाले. पुन्हा रस्त्यावर ती धावपळ. समोरून येणाऱ्या गाड्या आणि ते चुकवायला सतत आरडओरडा. तिघांची धावपळ, पळापळ. रहदारी कमी झाल्यावर मी त्याला विचारतो ः ""सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर अपघात होतात का?'' तेव्हा हायवेवरून जाताना अनेकांच्या मेंढ्या कशा गाडीखाली आल्या, ब्रेक लागला नाही म्हणून मेल्या अशी अनेक उदाहरणं त्यानं सांगितली. मेंढ्या पाणी प्यायल्यावर पुन्हा पुढच्या शेतात चरण्यासाठी.. अशा जागा बदलल्या जात आहेत. ऊन आता खूप वाढलंय. सतत ओरडण्यानं आणि पळापळ करून त्यांच्याही हालचाली मंदावल्यात; पण तरीही बसता येत नाही. हळूहळू दिवस मावळतीला आला. मेंढ्या घेऊन ते पुन्हा मागं फिरलेत. पुन्हा रस्त्यावर गाड्या आणि ते चुकवणारे मेंढपाळ.

धनगर वाड्यावर आता पुन्हा आलेत. बाईनी वाघूर नीटनेटकं केलं आणि मेंढ्या आत सोडताहेत... मुलगा आणि मुलगी त्या त्या मेंढीजवळ तिचं कोकरू ठेवताहेत. प्यायला. या जोड्या लावताना मेंढ्या आणि त्यांची कोकरं त्यांना कशी ओळखता येत असतील? कारण सगळी कोकरं सारखीच दिसतात. मी हा प्रश्न विचारला, तर ती महिला म्हणाली ः ""आम्हाला लिहिता-वाचता येत नाही, पुस्तकांतली सगळी अक्षरं आम्हाला सारखीच दिसतात; पण तुम्हाला वेगवेगळे अर्थ लागतात तसंच आहे हे. आम्हाला प्रत्येक मेंढी आणि तिचं कोकरू ओळखू येतं बरोब्बर.'' त्यांच्या या बिनतोड युक्तिवादानं खूप हसलो.

तेवढ्यात गावाला गेलेला तिचा पती आला. सोबत काही लोक होते. महिलेनं हातचं काम सोडून पाणी दिलं, चहा टाकला. त्याला महिलेच्या दिवसभराच्या कामाचं काही देणंघेणं नव्हतं. सोबतचे लोक मुलाच्या सोयरिकीसाठी आलेले होते. तेही मेंढीवालेच होते. त्यांच्याशीही मेंढी व्यवसायाविषयी बोललो. ""मेंढ्या विकून तुम्ही खूप पैसे कमावता, असं लोक बोलतात,'' असं म्हटलं, तेव्हा ते वैतागून आणि वेदनेनं बोलू लागले. ते म्हणाले ः ""शंभर मेंढ्या असतील, तर त्यातल्या वर्षभरात तीस विकण्यायोग्य होतात. विक्रीचा भाव साडेतीन ते सात हजार रुपये असतो. सरासरी पाच हजार रुपये भाव धरला, तर दीड लाख ते दोन लाख मिळतात; पण आजकाल शेतात तणनाशकं मारली जातात. त्यातून मेंढ्या सतत आजारी पडतात, मरतात. त्यातून औषधावर खूप खर्च होतो.'' तिथं बसलेला एक जण म्हणाला ः ""वर्षाला ऐंशी हजार रुपये औषधावर खर्च झाले. सतत डोस द्यावे लागतात.'' मागच्या महिन्यात रोग पडून 35 मेंढ्या मेल्या होत्या. हे नुकसान तुम्ही कसं मोजणार?'' त्यांच्या एका नातेवाईकाच्या दोनशे मेंढ्यांतल्या 160 मेंढ्या मरण पावल्याचं एक उदाहरण ते सांगत होते. ""आमचा नफा कसा मोजायचा तुम्हीच सांगा?'' असं मला म्हणत होते. मीच खजील झालो. विचार केला, की समजा अगदी वर्षाला अगदी दोन लाख रुपये जरी मिळाले, तरी महिन्याचे सोळा हजार रुपये होतात आणि ही तीन माणसं रोज सोळा तास पूर्णवेळ काम करतात.

म्हणजे एका व्यक्तीची मजुरी पाच हजार रुपये. रोज सोळा तास काम म्हणजे आठ तासांचे अडीच हजार रुपये. म्हणजे दिवसाचे ऐंशी रुपये. त्यात औषधाचा खर्च वाढला, की हे सारे हिशेब कोलमडणार.

प्रश्न केवळ नफ्या-तोट्याचा नाही, तर या व्यवसायातल्या जोखमीचा आहे. दिवसभर इतकं थकूनसुद्धा रोज रात्री हे लोक शांतपणे झोपू शकत नाहीत. सध्या बिबटे अनेक ठिकाणी फिरत असतात. मेंढ्याचं वाघूर त्यांच्यासाठी मोठी शिकार असते. रात्रभर बिबटे घिरट्या घालतात. पूर्वी एकदा आम्ही रात्री 11 वाजता गेलो, तरी मेंढ्यावाले पहारा देत होते. एक जण सांगत होते, की "रात्री पांघरुण घेऊन वाघुराला टेकून झोपलो होतो. तेव्हा बिबट्यानं मेंढी समजून पंजा मारला. हालचाल केली नाही म्हणून वाचलो, नाहीतर त्यानं मारलं असतं.' एक पाहुणा म्हणाला ः ""एकदा दिवसाउजेडी माझ्या दोन मेंढ्या बिबट्यानं माझ्या डोळ्यांसमोर ओढून नेल्या.'' या जगण्याला काय म्हणायचं? दिवसभर मेंढ्यांमागं पळत राहायचे आणि रात्री सुखाची झोप नाही, वर मरणाची भीती...

लग्नाची बैठक सुरू होणार होती. त्यांच्यातही आता शिकलेल्या मुली मेंढ्यामागं जायला तयार होत नाहीत, त्यामुळं अशा मुलांना मुली मिळत नाहीत. लग्नं जमत नाहीत. त्यामुळं मुलांकडचेच पुढाकार घेतात. त्या अंधारात वाघुराशेजारी लग्नाची बैठक सुरू झाली. मी उठलो, निघालो. मुलाच्या आईनं मला अंधारात बाजूला बोलावलं. दिवसभर तिची धावपळ बघत होतो आणि इतके कष्ट केल्यानंतर आत्ता आलेल्या माणसांचा स्वयंपाक तिला एकटीला करायचा होता. मला म्हणाली ः ""एकदम आठ माणसं वाढली. आमच्याकडं तीनच ताटल्या आहेत. तुमच्या घरच्या ताटल्या देता का? भाकरीचं पीठ पुरणार नाही. द्याल का थोडं?'' मला गलबलून आलं. माझ्यासोबत घरी आली. ताटल्या, पीठ दिलं; पण मुलाचं लग्न जमण्याच्या आनंदापेक्षा जेवणाच्या ताटल्या आणि पीठ कुठून आणायचं ही तिची चिंता होती. ताटल्या आणि पीठ घेऊन अंधारात दिसेनाशी झाली...मेंढ्यांच्या आवाजात तिचा हुंदका ऐकू आला नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com