Ekal mahila Sanghatana
Ekal mahila SanghatanaSakal

एकल महिला जेव्हा संघटित होतात...

‘तुम्ही या कार्यक्रमात गजरा भेट देता म्हणून मी या कार्यक्रमाला येते. वीस वर्षांनंतर मी गजरा केसात माळतेय...’ ‘एकल महिला संघटने’च्या कार्यक्रमात एक विधवा मनोगत व्यक्त करत होती.
Summary

‘तुम्ही या कार्यक्रमात गजरा भेट देता म्हणून मी या कार्यक्रमाला येते. वीस वर्षांनंतर मी गजरा केसात माळतेय...’ ‘एकल महिला संघटने’च्या कार्यक्रमात एक विधवा मनोगत व्यक्त करत होती.

‘तुम्ही या कार्यक्रमात गजरा भेट देता म्हणून मी या कार्यक्रमाला येते. वीस वर्षांनंतर मी गजरा केसात माळतेय...’ ‘एकल महिला संघटने’च्या कार्यक्रमात एक विधवा मनोगत व्यक्त करत होती.

महिलांच्या भावना इतक्या तरलपणे जपणारी ही संघटना...राज्यात अनेक संघटना आहेत महिलांच्या; पण फक्त एकल (विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, अविवाहित) महिलांची ही आगळीवेगळी संघटना आहे...केवळ भावनाच नव्हे तर, या महिलांचा आत्मसन्मान, संरक्षण, रोजगार यासाठीसुद्धा ही संघटना मराठवाड्यात काम करते. ग्रामसभेत गावाला जाब विचारण्यापासून ते निवडणुका लढवून राजकीय प्रक्रियेत उतरण्यापर्यंत....

मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यांतल्या १३ तालुक्यांत १९ हजार एकल (विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, अविवाहित) महिलांसंदर्भात या संघटनेचं काम चालतं. ‘कोरो इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकारानं मराठवाड्यात हे व्यापक संघटन उभं राहिलं आहे. ‘कोरो’च्या सुजाता खांडेकर यांनी काही वर्षांपूर्वी ३२ महिला कार्यकर्त्यांची सविस्तर चिंतनबैठक घेतली. त्यातून एकल महिलांचं संघटन करण्याचा मुद्दा पुढं आला व सामूहिक नेतृत्वाच्या अंमलबजावणीतून आज एकल महिलांचे प्रश्न उत्तरांच्या दिशेनं सरकत आहेत..

या कामाची सुरुवात १०५ गावांतील १९८५ महिलांचं सर्वेक्षण करून झाली. त्यातून महिला एकल होण्याची अनेक कारणं पुढं आली. दारूनं तरुण वयात पतीचा मृत्यू झाल्यानं विधवा झालेल्या महिलांची संख्या खूप मोठी होती. अपघातात झालेले मृत्यू, एड्सनं झालेले मृत्यू, भूंकपासारख्या दुर्घटनेत पती मृत्युमुखी पडल्यानं एकल झालेल्या महिला, सासरच्यांकडून, पतीकडून छळ होत असल्यानं एकट्या राहणाऱ्या महिला, पतीनं टाकून दिलेल्या (परित्यक्ता) महिला...अशा अनेकविध कारणांनी एकल झालेल्या महिला या संघटनेशी जोडल्या गेल्या.

Ram Shelake and Mahananda Chavan
Ram Shelake and Mahananda ChavanSakal

हे सर्वेक्षण करताना काही महिलांनी वेगळाच मुद्दा संघटनेच्या लक्षात आणून दिल्याची माहिती समजली. तो मुद्दा असा - सर्वेक्षणादरम्यान एक महिला सर्वेक्षणकर्त्यांना म्हणाली : ‘‘नवऱ्यानं टाकलेल्या महिलेला तुम्ही ‘परित्यक्ता’ म्हणता; पण मी माझ्या नवऱ्याला त्याच्या वागण्यामुळे झिडकारलं आहे तेव्हा मला आणि माझ्यासारख्या इतर महिलांना ‘परित्यक्ता’ न म्हणता MNT (मी नवऱ्याला टाकलं) म्हणा.’

राम शेळके (९४२१३२६८६०) व महानंदा चव्हाण हे दोघं पहिल्यापासून सुजाता खांडेकर यांच्यासमवेत आहेत. या कार्यकर्त्यांनी गावोगावी हे संघटन बळकट केलं. आज मराठवाड्याच्या ३५० गावांत ही संघटना काम करते. १९ हजार महिला या संघटनेच्या सदस्या आहेत. अर्थात्, पती असूनही संसारात एकटं वाटणाऱ्या महिलाही या संघटनेत सहभागी झाल्या आहेत.

‘या एकल महिलांचे प्रश्न नेमके काय असतात?’ असं विचारल्यावर मराठवाडा विभागाचे संघटक राम शेळके म्हणाले : ‘सामाजिक सन्मान न मिळणं, रोजगाराची समस्या, मालमत्तेचा अधिकार, संरक्षण, आत्मसन्मान हे महत्त्वाचे मुद्दे असतात. या व इतर सर्वच मुद्द्यावर संघटना काम करते.’

महानंदा चव्हाण म्हणाल्या : ‘विधवेला धार्मिक पातळीवर नाकारलं जाण्याची भावना हा खूप वेदना देणारा मुद्दा आहे. त्यामुळेच तर आम्ही ‘विधवा’ हा शब्द न वापरता ‘एकल’ हा शब्द रूढ केला आहे.’

या महिला संघटित झाल्यानं स्वतःच्या हक्कांसाठी त्या संघर्ष करतात. एकमेकींना आधार देतात. कोरोनाकाळात या महिलांनी चार हजार ८०० किलो धान्य एकत्र करून त्यांच्यातील गरजू महिलांना वाटलं व एकटेपणा वाटू नये म्हणून रोज एकमेकींशी फोनवर संवाद साधला.

शेळके म्हणाले : ‘आमच्या बैठकांमध्ये महिलांची बंडखोरी अधिकच टोकदार होते. संघटित होऊन या महिला आपला विरोध आक्रमकपणे नोंदवतात. कोरोनानंतरच्या महागाईच्या मुद्द्यावर या महिलांनी आठ तालुक्यांत मोर्चे काढले. सात हजार महिला रस्त्यावर आल्या. महिलांनी अनेक गावांत ‘रास्ता रोको’ आंदोलन करून एसटी सुरू करायला लावली.’

रोजगार हमीची मजुरी न मिळणं, पेन्शन-मंजुरीचं काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करणं अशा अनेक मुद्द्यावर महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्या. ‘निराधार पेन्शन’मधले ‘मध्यस्थ’ हा प्रकार महिलांनी रोखला.

महिलांच्या रोजगारासाठी संघटनेनं रोजगार प्रशिक्षणाचा कार्यक्रमही आयोजिला. त्याअंतर्गत, उत्तम भाजीपाला लागवड कशी करावी याचं प्रशिक्षण महिलांना देण्यात आलं.

या महिलांच्या राजकीय जाणिवा कशा विकसित केल्या याविषयी चव्हाण म्हणाल्या : ‘या महिलांना राजकीय भान यावं म्हणून तालुका कार्यकारिणी निवडताना मतपत्रिका देऊन व प्रचाराला मुदत देऊन निवडणूक घेतली. पराभूत उमेदवारांनाही कामाची संधी दिली. यातून महिलांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग घेतला. १९४ महिलांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि त्यापैकी ६८ जणी निवडून आल्या. अनेकींना धमक्याही आल्या. एका महिलेचा गोठा जाळून टाकण्यात आला; पण ती डगमगली नाही.’

निवडणुकीबरोबरच या महिला ग्रामसभेला हजर राहतात. एकल संघटनेचे कार्यकर्ते त्यासाठी विशेष जागृती करतात व किती महिला उपस्थित राहिल्या याची नोंद ठेवतात. १९ हजारपैकी दहा हजार महिला ग्रामसभेला हजर होत्या, अशी माहिती शेळके व चव्हाण यांनी दिली.

मालमत्तेचा अधिकार हा एक क्लिष्ट विषय आहे. विधवांना सासरचे लोक संपत्तीत वाटा देत नाहीत. ‘हिचं आमच्या मुलाशी लग्नच झालं नव्हतं,’ इथपासून सुरुवात करतात. कारण, विवाहनोंदणीच झालेली नसते. त्यामुळे संघटनेनं विवाहनोंदणीची मोहीम राबवली. संपत्ती नावावर कशी करून घ्यायची, वारसनोंद कशी लावायची याचं प्रशिक्षण तलाठ्यांमार्फत महिलांना देण्यात आलं. संघटनेनं आतापर्यंत २५० महिलांना संपत्तीचा अधिकार मिळवून दिला, तर अनेक कुटुंबांत समुपदेशन केलं आहे. या महिलांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. तीही किमान एक हजार प्रकरणं संघटनेनं हाताळली आहेत.

शेळके म्हणाले : ‘किमान आठ हजार महिलांना विविध शासकीय योजनांसाठी कागदपत्रं संघटनेनं मिळवून दिली. विविध योजनांचा लाभ त्यांना त्यातून होऊ शकतो. एकल महिलांची नोंद प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर करावी असा ठराव ३५० गावांत करून घेतला आहे.’

महानंदा म्हणाल्या :‘हे काम सुरू झाल्यापासून सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे, एकल महिलांची स्थापन केलेली ‘स्वावलंबी महिला पतसंस्था.’ उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलांनी एकत्र येऊन ११ लाख रुपयांचं भागभांडवल जमवलं आणि अवघ्या दोन वर्षांत आज ५५ लाखांचा व्यवहार झाला आहे. एकल महिलांनी कर्जं घेतली आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून महिला स्वावलंबी होत आहेत.’

याचबरोबर विशेष काम म्हणजे, ज्या महिलांना पुन्हा विवाह करावासा वाटतो अशा महिलांच्या पाठीशी संघटना उभी राहते. आजपर्यंत ४८ महिलांचे पुनर्विवाह झाले आहेत. पूर्वी या महिला काळजीपोटी मुलींचे बालविवाह करायच्या. आता संघटना पाठीशी असल्यानं त्या मुलींना शिकवतात. आठशे महिलांनी आपलंही पुढचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

शेळके, चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोरो इंडिया’च्या मदतीनं उभं केलेलं हे काम थक्क करणारं आहे.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com