मध्यमवर्गाचे रोल मॉडेल

ठाण्यात राहणारे संजय मंगला गोपाल यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतलं. डॉक्टरेट करून पुन्हा अमेरिकेत राहून ‘एनर्जी अँड एन्व्हॉयर्नमेंटल पॉलिसी’ या विषयावर संशोधन केलं.
Sanjay Mangala Gopal
Sanjay Mangala GopalSakal
Summary

ठाण्यात राहणारे संजय मंगला गोपाल यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतलं. डॉक्टरेट करून पुन्हा अमेरिकेत राहून ‘एनर्जी अँड एन्व्हॉयर्नमेंटल पॉलिसी’ या विषयावर संशोधन केलं.

त्यांनी अमेरिकेत पीएच.डी केली...असोसिएट डीन म्हणून नोकरी केली; पण हे करताना भारतभर फिरून जन-आंदोलनांचा समन्वयही साधला...त्यांनी नर्मदा-आंदोलनात काम केलं आणि अनेक सामाजिक उपक्रमही राबवले. नोकरी सांभाळून समाजसेवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी रोल मॉडेल असणारे हे कार्यकर्ते आहेत संजय मं. गो. (९८६९९८४८०३ )

ठाण्यात राहणारे संजय मंगला गोपाल यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतलं. डॉक्टरेट करून पुन्हा अमेरिकेत राहून ‘एनर्जी अँड एन्व्हॉयर्नमेंटल पॉलिसी’ या विषयावर संशोधन केलं. ‘व्हीजेटीआय’ या शैक्षणिक संस्थेत असोसिएट डीन म्हणून काम केलं. इतकं महत्त्वाचं करिअर असूनही सामाजिक आंदोलनांत झोकून दिलं. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात राष्ट्र सेवा दलाच्या अभ्यासमंडळातून झाली. हे काम करताना त्यांनी झोपडपट्टी बघितली...तिथल्या दारिद्र्याचा मध्यमवर्गीय मनावर परिणाम घडून आला...त्यातून जडणघडण झाल्यावर नामांतराविषयी जे सत्याग्रह सुरू होते त्यांच्या नियोजनात त्यांनी भाग घेतला. समता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. या आंदोलनाचा ‘नर्मदा जन-आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी ‘नर्मदा घाटी’ला भेट दिली आणि त्यानंतर ते नर्मदा जन-आंदोलनाचा भाग होऊन गेले. नर्मदा जन-आंदोलनाच्या नियोजनाची भूमिका त्यांनी निभावली. माध्यमं, वेगवेगळे बुद्धिजीवी आदींचा पाठिंबा आंदोलनाला मिळावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.

मेधा पाटकर यांनी जेव्हा नर्मदेत जलसमाधी घेण्याची भूमिका घेतली तेव्हा कार्यकर्त्यांना अटक झाली. अटक झालेल्यांमध्ये संजय हेही होते. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांवर पाटकर यांच्यासमवेत त्यांनी अनेक आंदोलनं केली.

याच दरम्यान ‘देशभरातील सर्व आंदोलनांनी एकत्र यायला हवं,’ अशी गरज सगळ्यांनाच वाटू लागली. सन १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा देशानं केलेला स्वीकार व १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली जाण्याची घटना यानंतर सर्व प्रमुख संघटना पश्चिम बंगालमध्ये एकत्र आल्या व १९९६ मध्ये ‘ राष्ट्रीय जन-आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’ हे नेटवर्क स्थापन करण्यात आलं. या ‘समन्वया’चे राष्ट्रीय निमंत्रक म्हणून संजय यांची निवड झाली.

देशभरातील गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था, तसंच पर्यावरण नष्ट करणाऱ्या प्रकल्पांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या संस्था यांचं संघटन करण्यात आलं. आदिवासी भागात ‘जल-जंगल-जमीन’ यांवर आक्रमण करणाऱ्या विकासाच्या या नवीन परिभाषेलाच आव्हान देण्यात आलं. त्यातून पर्यायी विकासनीतीची मांडणी करण्यात आली.

विकास नेमकं कशाला म्हणायचं व विकासाच्या केंद्रस्थानी नेमकं कोण असायला हवं असा महत्त्वाचा प्रश्न या राष्ट्रीय जन-आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयानं उपस्थित केला व पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांची ‘जनसुनवाई’ करण्यात आली व आंदोलन उभारण्यात आलं.

महाराष्ट्रातील एन्रॉन प्रकल्पाविरुद्ध मोठं आंदोलन झालं. त्यात पाटकर यांचा व या ‘समन्वया’चा महत्त्वाचा सहभाग होता. देशभर अनेक राज्यांत त्यानंतर अशी आंदोलनं झाली. पश्चिम बंगालचं ‘सुंदरबन’चं जंगल, केरळमधील ‘सायलेंट व्हॅली’ व दिल्ली-मुंबई-हैदराबाद अशा महानगरांतील गरिबांच्या वस्त्या अतिक्रमण म्हणून हटवण्याचे प्रयत्न या सगळ्याच्या विरोधात या ‘समन्वया’नं केलेली आंदोलनं महत्त्वाची ठरली व देशभरातील गरिबांना या संघटनाचा आधार वाटू लागला.

हे सारं संघटन करण्यात, आंदोलनं उभी करण्यात संजय यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यासाठी त्यांनी देशभर सतत प्रवास केला. हे नियोजन व सर्व संघटनांना जोडून ठेवणं हे महत्त्वाचं काम संजय यांनी केलं. त्यासाठी पोस्टकार्डांद्वारे पत्रव्यवहार केला. त्या काळात रात्री उशिरा व पहाटे एसटीडी फोन-कॉल स्वस्त असायचे. त्या वेळी देशभर फोन करून निरोप द्यावे लागायचे. अशा रीतीनं संघटन उभं झालं. राष्ट्रीय पातळीवर काम करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणविषयक अनेक परिषदांत संजय सहभागी झाले. अमेरिका, अर्जेंटिना, दक्षिण अमेरिका, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, फ्रान्स, फिनलंड या देशांत विविध परिषदांच्या व अभ्यासाच्या निमित्तानं त्यांनी भेटी दिल्या.

जागतिकीकरणानंतर सर्वच अविकसित व विकसनशील देशांत नैसर्गिक संसाधनांवर होणाऱ्या आक्रमणांविरुद्ध अनेक देशांमधील संघटना संघटित झाल्या व त्यांनी जागतिक पातळीवर निदर्शनं केली, परिषदा घेतल्या. त्यातील अनेक परिषदांना संजय यांना उपस्थित राहता आलं. एके ठिकाणी त्यांनी भारतातील पर्यावरणावरील आक्रमणाविषयी भाषण केल्यावर एका अविकसित देशातील महिलेनं भाषण केलं व त्या वेळी ती म्हणाली होती : ‘फक्त ‘इंडिया’ऐवजी माझ्या देशाचं नाव टाका. बाकीचं सगळं भाषण जसंच्या तसं लागू आहे.’

‘पर्यावरणाची इतकी विदारक स्थिती जगभरात आहे,’ असं निरीक्षण यावर संजय नोंदवतात.

Think globally, act locally या उक्तीनुसार, जागतिक पातळीवर चिंतन करताना स्थानिक पातळीवरही संजय सक्रिय आहेत. ‘एकलव्य पुरस्कार’ ही गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची अभिनव योजना त्यांनी सुरू केली. झोपडपट्टीतील व गरीब कुटुंबातील गरीब विद्यार्थ्यांना दहावी पास झाल्यावर बक्षीस व प्रमाणपत्र दिलं जातं व त्यानंतर पदवी घेईपर्यंत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. पुढील शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत याबाबत मार्गदर्शन केलं जातं. यातून आतापर्यंत सात हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली असून, आज अनेक क्षेत्रांत हे विद्यार्थी काम करत आहेत. गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शहरातील समाजानं त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही कल्पनाच अतिशय उदात्त आहे. याचं विविध शहरांत अनुकरण व्हायला हवं. ‘समता आंदोलना’त त्यांनी सुरू केलेलं ‘आंदोलन’ हे मासिक आज ‘राष्ट्रीय जनसमन्वया’चं मुखपत्र आहे. त्याचे संपादक संजय आहेत. आंदोलनं व सततचा प्रवास हे सांभाळून मासिकासाठी लेख मिळवणं, त्यांचं संपादन, अंक वेळेत प्रकाशित करणं ही कामं करावी लागतात.

‘‘नोकरी करताना इतका प्रवास व काम कसं केलंत? वेळेचं नियोजन कसं केलंत?’’ यावर संजय म्हणाले : ‘‘क्षणाक्षणाचं नियोजन करणारे व पूर्ण क्षमतेनं काम करणारे अनेक कार्यकर्ते मी पाहिले. बाबा आढाव व मेधा पाटकर यांच्यासारख्या सतत कार्यमग्न नेत्यांचा माझ्यावर प्रभाव पडला. परदेशात प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानून चालणारी कामं मी पाहिली. त्यातून मी आठवडाभर महाविद्यालयाची कामं पूर्ण करायचो व शुक्रवारी दुपारी निघून शनिवार-रविवार देशभर प्रवास करून सोमवारी परत यायचो. असं अनेक वर्षं केल्यानं कामं पुढं जाऊ शकलं. ठाणे शहरात ‘एकलव्य पुरस्कार’ व इतर सामाजिक उपक्रम करताना तरुण सहकारी तयार झाले. एकलव्य पुरस्कार मिळालेले विद्यार्थीच नंतर संयोजक झाले. प्रत्येक विषयात बारकाईनं नियोजन केलं की वेळ वाचतो. पाटकर यांच्या प्रवासात असं नियोजन केलं जाई व त्यातून कमी वेळेत जास्त कार्यक्रम होत असत.’’

समाजकार्य करण्यासाठी घरदार सोडण्याची गरज नाही, तर आपली नोकरी, आपलं संशोधन करूनही उरलेला वेळ समाजासाठी, सामाजिक कामांसाठी दिला जाऊ शकतो, याचं संजय हे एक महत्त्वाचं उदाहरण आहेत. त्याअर्थानं, ते मला मध्यमवर्गासाठीचे रोल मॉडेल वाटतात.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com