भटक्यांसाठीचा समर्पित शिक्षक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Narsing Jhare

महाराष्ट्रात आज सर्वांत उपेक्षित समूह हा भटके विमुक्त आहे. यांच्या वेदनेची उत्तरं सोडाच; पण प्रश्नही माहीत नाहीत. या भटके विमुक्तांतही गोपाळ-डोंबारी यांसारख्या जातींची स्थिती तर अधिकच विदारक आहे.

भटक्यांसाठीचा समर्पित शिक्षक!

महाराष्ट्रात आज सर्वांत उपेक्षित समूह हा भटके विमुक्त आहे. यांच्या वेदनेची उत्तरं सोडाच; पण प्रश्नही माहीत नाहीत. या भटके विमुक्तांतही गोपाळ-डोंबारी यांसारख्या जातींची स्थिती तर अधिकच विदारक आहे. गावोगावी रस्त्यावर कसरतीचे खेळ करत गुजराण करतात. या खेळांचं लोकांना पूर्वीसारखं आकर्षण वाटत नाही, त्यामुळे पैसेही मिळत नाहीत. घरोघरी व्यसन आणि पालावर अनारोग्य, अशा स्थितीतल्या भटक्या विमुक्तांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अन्सारवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नरसिंग झरे (फोन ९८८१४३३४०८) यांनी यशस्वीपणे करून दाखवला.

अन्सारवाडा गावाच्या बाहेर दूर हागणदारीपलीकडे या लोकांची वस्ती. तिकडे कोणीच जात नव्हतं. नरसिंग गावातील मुलांसाठी शिकवणी वर्ग घ्यायचे. तिथं येऊन या वस्तीतील मुलं खिडकीतून बघायची, खोड्या काढायची. एक दिवस वैतागून त्या मुलांना पकडायला त्यांच्या पाठीमागे नरसिंग त्या वस्तीत गेले, तेव्हा ती वस्ती बघून हादरून गेले. अतिशय वाईट स्थितीत हे लोक जगत होते. राहायला घर नव्हतं, लोक दारूने झिंगलेले होते. एकही मूल शाळेत जात नव्हतं.

नरसिंग यांनी हळूहळू तिथे नियमित जायला सुरुवात केली व अगदी लहान मुलांसाठी बालवाडी सुरू केली. पालक मुलं पाठवायला तयार नव्हते, कारण डोंबारी खेळ करायला ही मुलंच त्यांचं भांडवल होती. तरीही खूप प्रयत्न करून ही मुलं शाळेत बसवली. एकदा त्यांनी या मुलांचे वाढलेले केस कापले, त्यांना अंघोळी घातल्या, पावडर लावली. पालकांनी येऊन नरसिंग यांना मारहाण केली, कारण ती मुलं अस्वच्छ राहतील तितकी भिक्षा मिळायची. झरे यांनी अशा अनेक अडचणींना तोंड दिलं आणि मुलं शिकवली. नंतर शासनाची वस्तीशाळा ही पर्यायी शिक्षणाची योजना आली. तिथं वस्तीशाळा सुरू केली व वस्तीशाळेचं रूपांतर जिल्हा परिषद शाळेत झालं. आज वस्तीतील विद्यार्थी शिकत आहेत.

बालविवाह ही या वस्तीतील मोठी समस्या होती. ५ ते ७ वर्षांच्या मुला-मुलींचं लग्न व्हायचं, त्यामुळे या शाळेत सगळेच विद्यार्थी लग्न झालेले होते. मुलं शिकलेली नव्हती, त्यामुळे मुली शिकल्या तर त्यांना शिकलेला नवरा मिळत नव्हता, त्यामुळे मुलींना पालक शिकवत नव्हते. तरीसुद्धा श्रीदेवी बंडीधनगर या मुलीला हट्टाने ७ वीपर्यंत शिकवलं, तर त्या मुलीला शिकलेला नवरा मिळेना, तिचं लग्न जमेना. तिचे पालक नरसिंग यांना दोष देऊ लागले. शेवटी एका निरक्षर मुलाशी तिचं लग्न करून द्यावं लागलं; पण हळूहळू प्रबोधनाने विवाहाचं वय वाढू लागलं. आता या वस्तीतील मुलं आणि मुलीसुद्धा १२ वीपेक्षा जास्त शिकून महाविद्यालयात जात आहेत.

केवळ एका वस्तीवर काम करून नरसिंग थांबले नाहीत, तर राज्यातील भटके विमुक्त परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर काम सुरू केलं. या संस्थेचे राज्य सचिव म्हणून नरसिंग काम करतात. शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा व सन्मान या सूत्रानुसार काम केलं जातं. भटक्यांतील ५३ जातीपैकी ४७ जाती थेट संपर्कात आहेत. महाराष्ट्रातील ७५८ पालांवर काम सुरू आहे. शासकीय कागदपत्रं नसल्याने भटके विमुक्त यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे भटक्या विमुक्तांतील ४७ जाती त्यांनी जोडल्या आहेत. तीन लाख लोकांना आतापर्यंत जातीचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला अशी १२ प्रकारची प्रमाणपत्रं मिळवून दिली, घरकुलं मिळवून दिली. ६० बचत गट सुरू केले. कुटुंबांना शासकीय कागदपत्रं मिळवून दिली, त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळतो. पाच ठिकाणी उद्योग केंद्र सुरू केलं, १२ ठिकाणी अभ्यासिका सुरू झाल्या आहेत, ७० ठिकाणी आरोग्यविषयक काम सुरू झालं आहे. पारंपरिक उत्पादनं करणाऱ्यांना बाजारपेठ मिळवून दिली. ४२ पालांवर आरोग्यसेविका नियुक्त केली आहे. पालावरची शाळा हे विकासाचं केंद्र म्हणून काम करते, तिथं शिक्षक, आरोग्यरक्षक व उद्योगप्रमुख एकत्र येऊन काम करतात. आरोग्यपेटी असते, त्यातून त्या वस्तीतील आरोग्य आणि रोजगारावर काम केलं जातं व कागदपत्रं मिळवून दिली जातात.

गावोगावची भटकंती थांबावी म्हणून ‘भटके विमुक्त विकास परिषदे’च्यावतीने तिथं उद्योग केंद्र उभं केलं. तिथं गोधडी, सतरंजी, पायपुसणं अशा विविध वस्तू महिला बनवतात, त्यांची विविध ठिकाणी विक्री केली जाते. यातून कुटुंबं स्थिर झाली. दरवर्षी पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. वाद्य वाजवणं ही कला या लोकांना अवगत असते. त्यांनी बॅन्ड पथकं तयार केली. आज लग्नसराईत या बॅन्ड पथकांना खूप मागणी असते. कदाचित विश्वास बसणार नाही; पण ज्या वस्तीत उपासमार होत होती, त्याच वस्तीत आता ११ बॅन्ड पथकं स्थापन झाली आहेत आणि ही पथकं दरवर्षी किमान ५० लाख रुपये कमावतात. मी स्वतः या वस्तीत जाऊन या पथकांचं वादन ऐकलं आहे. अगदी व्यावसायिकरीतीनं ही पथकं काम करतात. यांचं बघून २६ पथकं इतरत्र भटक्या वस्तींत सुरू झाली आहेत.

भटक्या पालांवरची मुलं बोलीभाषा बोलतात, त्यामुळे एकदम शाळेत दाखल केलं, तर त्यांना काहीच समजत नसल्याने ती शाळेत टिकत नाहीत, त्यांना परक्या शिक्षकांची भीती वाटते, यामुळे अशा वस्तीतील मुलं थेट गावाच्या शाळेत जात नाहीत. मोठ्या वयाची मुलं लहान वयाच्या मुलांमध्ये शाळेत बसायला लाजतात, तेव्हा या मुलांना शाळेची सवय व्हावी म्हणून भटक्यांच्या पालावरच शाळा सुरू केल्या. ‘पालावरची शाळा’ या नावाने सुरू झालेल्या या शाळांमध्ये त्यांच्यातीलच शिकलेला तरुण/तरुणी यांना शिक्षक केलं जातं. मुलांना रोज खाऊ दिला जातो. यातून शाळेची सवय होते व नंतर ही मुलं गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केली जातात. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत आज अशा ६३ शाळा सुरू केल्यात व त्यांतून आजपर्यंत ७००० विद्यार्थी मुख्य शाळेत दाखल केले आहेत. भटक्या पालावरच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारा हा खूप महत्त्वाचा प्रयोग आहे, अन्यथा ही मुलं शालाबाह्य राहिली असती. शासनाने याचं सार्वत्रीकरण करण्याची आवश्यकता आहे.

नोकरी सांभाळून नरसिंग राज्यभर हे काम करतात. एकाही रविवारी ते घरी नसतात. सगळ्या सुट्या, रजा याच कामासाठी वापरल्या जातात व त्यातून आज ७०० पेक्षा जास्त वस्त्या बदलत आहेत. भटक्यांच्या विकासासाठी सरकारने काय करायला हवं, असं विचारल्यावर नरसिंग सांगतात, ‘सर्वप्रथम भटक्यांची जनगणना आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर बोलीभाषेचा वापर असणारी पुस्तकं हवीत. पालावरच्या शाळा प्रत्येक वस्तीत असाव्यात व त्यांच्यातील अंगभूत कला-कौशल्यातून विविध वस्तू निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांना बँकेने कर्ज द्यावं व विक्रीची शासनाने व्यवस्था केली तर चांगलं जीवन ते जगतील. पक्की घरं सर्व पालांवर दिली पाहिजेत.’

एक प्राथमिक शिक्षक एका समूहाच्या उत्थानासाठी किती काम करू शकतो, याचं नरसिंग हे शिक्षक समुदायासाठी व तमाम मध्यमवर्गासाठी एक प्रेरक उदाहरण आहेत. आपल्या गावातील वस्तीसाठी आपण असं नक्कीच करू शकतो.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळीत कार्यरत असून, विविध विषयांवर लेखन करतात.)