प्रश्‍नाला भिडणारा अधिकारी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Bhagwat

सामाजिक कार्यकर्ते काम करतच असतात; पण एखादा शासकीय पोलिस अधिकारी जेव्हा सामाजिक संस्थेच्या क्षमतेचं काम करून दाखवतो, तेव्हा त्याला अधिकारी म्हणावं की कार्यकर्ता, असा प्रश्न पडतो.

प्रश्‍नाला भिडणारा अधिकारी...

सामाजिक कार्यकर्ते काम करतच असतात; पण एखादा शासकीय पोलिस अधिकारी जेव्हा सामाजिक संस्थेच्या क्षमतेचं काम करून दाखवतो, तेव्हा त्याला अधिकारी म्हणावं की कार्यकर्ता, असा प्रश्न पडतो. पोलिसांचा संबंध गुन्हे हाताळताना सर्वच सामाजिक प्रश्नांशी येत असतो; पण एखादा अधिकारी त्या प्रश्नांना भिडून सामाजिक संस्थांना सोबत घेऊन किती मूलभूत काम करू शकतो, हे बघून आपण थक्क होतो. होय, नक्षलवाद, वेश्यांचा प्रश्न, वीटभट्टीवरील मुलांचं शिक्षण आणि बालविवाह या विषयांवर तेलंगण राज्यात असं काम करणारे मराठी अधिकारी आहेत पोलिस आयुक्त महेश भागवत (फोन ९४४०७००१०५).

मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेले महेश भागवत यांनी सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत चार वर्षं काम केलं, नर्मदा जनआंदोलनात भाग घेतला, त्यातून सामाजिक जाणिवा समृद्ध झाल्या व त्यानंतर आय.पी.एस. परीक्षा पास झाले व आज तेलंगण राज्यातील राचकोंडा विभागाचे पोलिस आयुक्त आहेत. नोकरीच्या निमित्ताने तेलंगण राज्यात अनेक ठिकाणी काम करताना विविध सामाजिक समस्यांशी संपर्क आला आणि केवळ गुन्हे दाखल न करता सामाजिक संस्थांशी जोडून घेत त्यांनी त्या प्रश्नांवर महत्त्वाचं काम करून दाखवलं.

नक्षलवादाचं आव्हान केवळ बंदुकीने न पेलता आदिवासींचा विश्वास संपादन करून विकास योजना राबवून नक्षलवादाचा वेगळ्या रीतीने मुकाबला केला. आदिलाबाद जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना त्यांनी ‘ मी कोसम ’ (पोलिस तुमच्यासाठी) ही योजना राबवली. प्रशासनावर विश्वास नसल्याने लोक नक्षलवादाकडे वळतात. तेव्हा जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी पोलिसांना आदिवासींशी मैत्री करायला शिकवलं, त्यांचे प्रश्न समजून घेत सोडवायला सांगितलं.

सुरुवातीला दीड लाख लोकांचं आरोग्य शिबिर घेतलं, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा कार्यक्षम केल्या, शाळेवर न जाणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल केले, बोअर रिपेअर करून पाण्याची सोय केली, श्रमदानातून १२ किलोमीटरचा रस्ता केला, तरुणांच्या शहरी भागात सहली काढल्या, पोलिस व गावकरी यांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या, सामुदायिक विवाह आयोजित केले... यातून १६० गावांतून नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला व २०० नक्षलवादी शरण आले. कायदा आणि सेवा अशी पद्धती वापरून नक्षलवाद कमी केला. या कामासारखंच वेगळं काम त्यांनी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी केलं. एलूर परिक्षेत्रात त्यांनी चाळीस कुंटणखाने बंद केले. महाराष्ट्रातील भिवंडीजवळ आंध्रचे पोलिस पाठवून २९ मुलींची सुटका केली.

नलगोंडा येथे पोलिस अधीक्षक असताना यादगिरीगुट्टा या पारंपरिक वेश्याव्यवसाय करणाऱ्या वस्तीवर धाड टाकून मुली व महिला मुक्त केल्या. वस्तीतील मुलांना शिक्षण नसल्याने ते या व्यवसायातच काम करायचे. या मुलांसाठी त्यांनी शाळा काढली. महिलांचे बचत गट काढले, त्यांना आर्थिक निधी देऊन व्यवसाय सुरू करायला मदत केली. तरुणांना होमगार्डमध्ये दाखल केलं. काहींना खासगी नोकरी मिळवून दिली. या यशस्वी पुनर्वसनानंतर अशा सोडवलेल्या मुलींचं प्रज्वला या प्रसिद्ध संस्थेच्यावतीने पुनर्वसन करण्यात आलं. पोलिसांना या मुलींची सुटका कशी करावी याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यातून या राज्यातील पोलिसांनी मुंबई, पुणे, चेन्नई, गोवा येथे धाडी टाकून तेराशे मुलींची सुटका व पुनर्वसन केलं. तीन मुली तर दुबईला घरकामाच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी नेल्या होत्या, त्यांचीही सुटका करण्यात आली. एक संपूर्ण वस्ती या व्यवसायातून मुक्त करून त्यांचं पुनर्वसन करून तेराशे मुली मुक्त करून त्यांचं आयुष्य वाचवलं. इतकं महत्त्वाचं समाजकार्य नोकरीत असताना केलं. या कामाबद्दल अमेरिकेत पोलिस प्रमुखांच्या जागतिक परिषदेत वेबरसेव्ही law इनफोर्सेंट अवार्ड व ह्युमन राइट्स प्रोटेक्शन अवार्ड देण्यात आला.

स्थलांतरित मजुरांच्या मुलांचं शिक्षण हा सर्वांत दुर्लक्षित विषय असतो. आंध्र प्रदेशातील वीटभट्टीवर ओरिसा राज्यातून मजूर येतात. या मजुरांना दलाल रेल्वेच्या बोगीतून कोंबून आणतात. यात गुदमरून काही मृत्यूही झालेत. इकडे वीटभट्टीवर राहण्याची स्थिती आरोग्यपूर्ण नसते. मुकादम लहान मुलांना आणून त्यांच्याकडून बालमजुरी करून घेतात. अशा मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाकडे देशातील कोणत्याच राज्य सरकारने लक्ष दिलेलं नाही. दरवर्षी बालकामगार मुक्तीसाठी operation smile राबवलं जातं. महेश यांनी बालकामगार असलेल्या वीटभट्टीवर धाडी टाकल्या व मालकांना अटक केली. २० दिवस तुरुंगात राहिल्यावर या मालकांना या विषयाचं गांभीर्य कळालं. महेश भागवत यांनी वीटभट्टीजवळच शाळा सुरू केल्या. मुलं ओरिसाची असल्याने सामाजिक संस्थेच्या मदतीने ओरिसातून शिक्षक आणले व ते मुलांना शिकवू लागले. पाठ्यपुस्तकं आणून दिली. ओरिसातून आणलेल्या शिक्षकाला १२ हजार मानधन व रेशन वीटभट्टी मालक देतात. शाळा जर वीटभट्टीपासून दूर असेल, तर तिथे मुलं नेऊन सोडण्याची जबाबदारी ते मालक घेतात. यातून ही मुलं बालकामगार न होता आता शिकू लागली आहेत. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून मुलं गेलीत, त्यांच्याही शाळा सुरू झाल्या. आज ५००० विद्यार्थी या शाळेत शिकतात. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाचं अनुकरण करायला हवं.

महेश भागवत यांच्या टीमचं आणखी लक्षणीय काम म्हणजे, तेलंगण राज्यात स्त्रियांसाठी खास SHE team बनवलेल्या आहेत. या टीम महिलांच्या संदर्भात गुन्हे, जागृती मोहीम असे कार्यक्रम करतात; पण राचकोंडा येथील SHE team ने बालविवाह थांबवण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. आजपर्यंत या टीमने १५५ बालविवाह थांबवले आहेत. वास्तविक इतर ठिकाणी पोलिस हे आमचं काम नाही इथपासून सुरुवात करत महिला बालकल्याण विभागाकडे हा विषय ढकलतात; पण इथे १५५ बालविवाह थांबवले आहेत. दुसरं वेगळेपण हे की, इतर ठिकाणी वर्षभरात थांबवलेली अशी लग्नं २० ते २५ असतात, कारण माहितीच येत नाही; पण यांच्याकडे विविध पद्धतींनी माहिती येत राहते. याचं कारण ही SHE team गावागावांत, शाळेशाळेत व जिथे लोक दिसतील तिथे जाऊन सतत जनजागरण कार्यक्रम करत असते. अगदी रोजगार हमीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन मजुरांसमोरही महिलांच्या संदर्भातील कायदे सांगितले आहेत. याचा फायदा असा होतो की, या टीमकडे महिला अत्याचार व बालविवाहाविषयीच्या तक्रारी लगेच येतात. यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने बालविवाह थांबवणं शक्य झालं, कारण माहिती मिळत राहते.

असे हे मराठी अधिकारी. परराज्यात जाऊन नक्षलवाद, आदिवासी विकास, वेश्यांची सुटका आणि पुनर्वसन, वीटभट्टीवरील मुलांचं शिक्षण आणि बालविवाह अशा सामाजिक विषयांकडे केवळ आरोपी पकडणं इतकं न करता त्या प्रश्नाशी भिडून शासनाचे इतर विभाग व सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन कसं काम करता येतं याचा वस्तुपाठ महेश भागवत आहेत. अंगावर नेहरू शर्ट, पायजमा असो की खाकी वर्दी असो; खांद्याला शबनम असो की कमरेला पिस्तुल असो; त्याआतील मन कार्यकर्त्याचं असेल, तर ते कुठेही काम करोत, ते कार्यकर्तेच असतात...!!!

(सदराचे लेखक हे शिक्षक व सामाजिक चळवळीत कार्यरत असून विविध विषयावर लेखन करतात.)