
सन १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या निवडणुकीत शाहीर नामदेवराव सोळवंडे गावोगावी कार्यक्रम करत फिरत होते...त्यांचं कलापथक लोक डोक्यावर घेत होते...
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील उपेक्षित कार्यकर्ता
सन १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या निवडणुकीत शाहीर नामदेवराव सोळवंडे गावोगावी कार्यक्रम करत फिरत होते...त्यांचं कलापथक लोक डोक्यावर घेत होते... या गावाहून त्या गावाला फिरताना त्यांना घरी जाणंही जमत नव्हतं...आंदोलनाचं वेड काही सुचू देत नव्हतं. तिकडे घरी नऊ महिन्यांचा मुलगा आजारी पडला होता. पत्नी पतीला निरोपावर निरोप पाठवत होती; पण निरोप पोहोचत नव्हते. मुलाची तब्येत ढासळत जाऊन अखेर तो मरण पावला... दोन महिन्यांनी सोळवंडे घरी येतात. मुलगा त्यांना कुठंच दिसत नाही. ते पत्नीला विचारतात तेव्हा, राग अनावर होऊन ती हातातला पिठाचा आठवा संतापानं त्यांच्या दिशेनं भिरकावते आणि लेकराच्या नावानं हंबरडा फोडते...
आजचा आपला महाराष्ट्रदिन आणि संयुक्त महाराष्ट्र हा सोळवंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समर्पणावर उभा आहे.
रूढार्थानं पूर्ण निरक्षर असलेले नव्वदीतले सोळवंडे हे सांगली जिल्ह्यातील कुंडल इथं राहतात (७७२१९०८२५९). अजूनही खड्या आवाजात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णा भाऊ साठे यांच्या आठवणी सांगतात.
सोळवंडे यांच्यातील कार्यकर्तेपण लहान वयातच सुरू झालं. तो किस्सा असा : ‘चले जाव’ चळवळीत काही भूमिगत स्वातंत्र्यसैनिक झाडीत लपले होते. गुरं चारायला घेऊन गेलेला नामदेव त्यांना लपण्यात मदत करत असतानाच पोलीस जवळ येऊन पोहोचले. पोलिसांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नामदेवनं जवळच्या डाळिंबाच्या बागेत जाऊन बागेतील झाडं पेटवून दिली. मग पोलीस झाडीकडे न जाता बागेकडे धावले आणि बाग पेटवून देणाऱ्या नामदेवला त्यांनी पकडलं. तरीही नामदेवनं स्वातंत्र्य सैनिकांचीविषयी पोलिसांना काहीच सांगितलं नाही, त्यामुळे त्याला पोलिसांचा मार खावा लागला. त्याच्या मांडीला मोठी जखम झाली. त्याला तुरुंगातही धाडण्यात आलं. झाडीत लपलेले स्वातंत्र्यसैनिक या सगळ्या गडबडीत तिथून निसटून गेले...
लहानपणीच वडिलांच्या मृत्यूनंतर आईबरोबर मजुरी करत करत सोळवंडे यांनी कशी तरी गुजराण केली. ते कलावंत असल्यानं त्यांनी तमाशाचेही काही प्रयोग केले; पण त्यांच्यातील कार्यकर्ता जास्त प्रभावी होता, त्यामुळे त्यांनी कलापथक काढलं व कलापथकाचे प्रयोग सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत केले. ‘अकलेची गोष्ट’ व ‘शेठजीचे लगीन’ ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची दोन नाटके सोळवंडे सादर करत. त्यातील गट्टू सावकाराची भूमिका सोळवंडे वठवत असत. एकदा अण्णा भाऊंनी यातलं एक नाटक पाहिलं आणि ते भारावून गेले. नाटक संपताच त्यांनी स्टेजवर येऊन सोळवंडे यांना शाबासकी दिली...
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सोळवंडे यांच्या कलापथकाला बहर आला. अण्णा भाऊंची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावाकडं राहिली...’ या दोन रचनाही सोळवंडे सादर करत असत. क्रांतिसिंह नाना पाटील, एन. डी. पाटील हे त्यांना प्रोत्साहन देत. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर सोळवंडे हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झाले. कष्टकऱ्यांच्या प्रत्येक मोर्च्यात ते सहभागी होत असत. त्यांच्या शाहिरीनंच मोर्च्याची सुरुवात व्हायची. दलितांमधील सर्व जाती बंधुभावानं एकत्र याव्यात व त्यांनी एकत्रित संघर्ष करावा म्हणून सोळवंडे यांनी ‘भीमसेने’च्या कामाला वाहून घेतलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा संदेश गावोगावी फिरून ते देत राहिले. गरिबांना सतत संघटित करणं हे सोळवंडे यांचं मोठं काम आहे. ‘प्रतिसरकार’चे सेनानी जी. डी. लाड यांनी त्यांना ‘लाल तारा’ नावाचं कलापथक काढून दिलं. त्याद्वारे ते समाजजागृती करत फिरले.
मात्र, हे सारं करत असताना घराची आबाळ झाली. केळी विकून, मजुरी करून त्यांच्या पत्नीनं चार मुलांना वाढवलं. राहायला नीट घरही नव्हतं. दोन स्मशानभूमींच्या मधोमध त्यांचं घर होतं. अगदी दारापासून लगेचच स्मशानभूमीचा परिसर सुरू व्हायचा. शेवटी वैतागून सोळवंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना पत्र लिहिलं. नंतर चव्हाण जेव्हा कुंडलला आले तेव्हा त्यांनी सोळवंडे यांना बोलावून घेतलं व अडीच एकर गायरान जमीन त्यांना दिली. या जमिनीच्या माध्यमातून सोळवंडे खूप काही करू शकले असते; पण त्यांनी त्या जमिनीबाबत केवळ स्वत:चा विचार न करता तिथं गरिबांनाही घरं बांधायला लावली . १०० पेक्षा जास्त दलितांनी त्या ठिकाणी घरं बांधली. आज कुंडलमध्ये ‘साठेनगर’ नावानं ही वस्ती उभी आहे.
इतक्या मोठ्या लढ्यांत सहभागी झालेले, सामाजिक काम करणारे सोळवंडे कफल्लकच राहिले. कलापथकात पैसे मिळत नसत. लोक थोडंफार धान्य देत. त्यामुळे सोळवंडे हे गावाकडे आले की विहिरीच्या कामावर मजुरीला जात. दोरखंड वळण्याचा व्यवसाय करत. कुटुंबाची आबाळ सुरूच राहिली. दोन मुलं नीट शिकू शकली नाहीत. ‘मुलांना नोकरी द्या’ म्हणून ते राजकीय नेत्यांकडे जात आणि निराश होऊन येत...उमेदीच्या वयात समाजासाठी झोकून दिलेल्या माणसांचा हा असा उत्तरार्ध बघणं उदास करणारं असतं...
स्वातंत्र्य-आंदोलनात व संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात भाग घेऊनही सोळवंडे यांना स्वातंत्र्यसैनिकांसाठीचं पेन्शन मात्र आजही मिळत नाही. स्वत: निरक्षर असल्यानं त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ‘लक्ष द्या,’ असा आग्रह घरच्यांनी धरला की सोळवंडे त्यावर उलटा प्रश्न विचारतात... ‘‘मी माझ्या आनंदासाठी हे सारं केलं, त्याचा मोबदला कशाला?’’
सोळवंडे यांना २००३ मध्ये राज्य सरकारचा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार’ मिळाला. सरकारी पातळीवर झालेला इतकाच हा सन्मान...त्यात मोफत एसटी पास मिळाला. तो घेऊन गरिबांना तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावी दवाखान्यात नेण्यासाठी तो ते वापरतात. इतरांना मदत करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
शाहीर सोळवंडे आता नव्वदीत आहेत. महाराष्ट्राच्या त्या सुवर्णकाळातील आठवणी ते सांगत राहतात आणि ते पोवाडे, ती कवनं घरात मोठ्यानं गात राहतात... सोळवंडे यांच्यासारख्या असंख्य माणसांच्या खांद्यावर आजचा संयुक्त महाराष्ट्र उभा आहे; पण खरंच, अशा या माणसांना समाज म्हणून आपण काय दिलं, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)