‘आजच्या विद्यार्थी-चळवळी म्हणजे पक्षांच्या शाखा’

मोर्चा, पथनाट्य, जलसा, नाटक, पुस्तिका अशा विविध माध्यमांद्वारे ते प्रश्नांना भिडत असतात...त्यांच्या रस्त्यावर संघर्ष करण्याचा सुवर्णमहोत्सव लवकरच साजरा करावा लागेल!
‘आजच्या विद्यार्थी-चळवळी म्हणजे पक्षांच्या शाखा’
Summary

मोर्चा, पथनाट्य, जलसा, नाटक, पुस्तिका अशा विविध माध्यमांद्वारे ते प्रश्नांना भिडत असतात...त्यांच्या रस्त्यावर संघर्ष करण्याचा सुवर्णमहोत्सव लवकरच साजरा करावा लागेल!

मोर्चा, पथनाट्य, जलसा, नाटक, पुस्तिका अशा विविध माध्यमांद्वारे ते प्रश्नांना भिडत असतात...त्यांच्या रस्त्यावर संघर्ष करण्याचा सुवर्णमहोत्सव लवकरच साजरा करावा लागेल! या सच्चा कार्यकर्त्याचं नाव आहे सुबोध मोरे (९८१९९९६०२९).

मोरे यांचे आजोबा आर. बी. मोरे हे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे संयोजक. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार असलेले सत्येंद्र मोरे हे त्यांचे वडील. अण्णा भाऊ साठे यांचा सहवास, मूलभूत वाचन अशा भक्कम पायावर सुबोध मोरे यांचं काम उभं आहे. विद्यार्थी-चळवळीतून त्यांच्या कामाला सुरुवात झाली. थेट विधिमंडळात प्रवेश करून शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्याचं धाडस त्यांनी दाखवलं होतं. फीवाढीच्या विरोधात निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर तसाच मोर्चा थेट पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात नेऊन, रस्त्यावर झोपून सर्व वाहतूक मोरे यांनी बंद करून टाकली होती.

मोरे यांच्यातील चिवटपणाचं एक उदाहरण उल्लेखनीय आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी विद्यार्थ्यांना चर्चेला बोलावलं. दुपारपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर विद्यार्थी बसून राहिले; पण वसंतदादा न भेटताच निघून जाऊ लागले. विद्यार्थ्यांनी अडवल्यावर ‘परत येतो’ असं ते म्हणाले आणि निघून गेले. वैतागलेले विद्यार्थी तसेच बसून राहिले. वसंतदादा त्या दिवशी परत आलेच नाहीत. तेव्हा, ‘मुख्यमंत्री आम्हाला भेटले नाहीत, त्यामुळे आम्ही मंत्रालय सोडणार नाही...तुम्ही बाहेरून कुलूप लावू शकता,’ असा पवित्रा घेऊन संपूर्ण रात्रभर मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर मोरे आणि इतर विद्यार्थी बसून राहिले होते. सकाळी वसंतदादा मंत्रालयात आल्यावर पहिली भेट त्यांनी साहजिकच या विद्यार्थ्यांची घेतली. मोरे यांचं व्यक्तित्व समजून येण्यासाठी हा प्रसंग पुरेसा आहे.

केवळ मोर्चे आणि आंदोलनं करून कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, तर सांस्कृतिक आंदोलनाची जोडही दिली पाहिजे,’ अशी मोरे यांची आग्रही मांडणी आहे. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व सर्वच शाहिरांशी त्यांचा जवळून परिचय होता. त्यामुळे त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून कलावंतांना चळवळीशी जोडून घेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला. तरुणांच्या पथनाट्यांचे चौकाचौकात प्रयोग केले व अनेक नाटकंही सादर केली. राष्ट्रीय स्तरावरील लेखक-कवींची व्याख्यानं आयोजित केली. ‘हल्लाबोल’ हे पथनाट्य सादर करत असतानाच सफ़दर हाशमी या महान कलावंताची हत्या झाली होती. नंतर तेच ‘हल्लाबोल’ पथनाट्य मोरे यांनी मुंबईच्या रस्त्यांवर सादर केलं.

साहित्यिकांनी सामाजिक प्रश्नांवर मौन बाळगणं, सत्ताधाऱ्यांना विरोध न करणं, साहित्यसंमेलनातील राजकारण्यांचा हस्तक्षेप, तसंच विशिष्ट विचारसरणीच्या मंडळींचा साहित्यक्षेत्रावरील कब्जा...या सगळ्याला उत्तर म्हणून मोरे व त्यांच्या मित्रांनी १९९९ मध्ये साहित्यसंमेलनाच्या वेळीच बाबूराव बागूल यांच्या अध्यक्षतेत धारावीत विद्रोही साहित्यसंमेलन आयोजित केलं होतं. साहित्यक्षेत्रातील ती खळबळजनक कृती होती. महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, तसंच वीस हजार श्रोते त्या विद्रोही साहित्यसंमेलनात सहभागी झाले होते.

याविषयी मोरे म्हणाले : ‘पुरोगामी म्हणवणाऱ्या अनेक साहित्यिकांची दुटप्पी भूमिका यातून उघड झाली. काहींनी दोन्ही डगरींवर हात ठेवले; पण यातून साहित्यातला विद्रोही प्रवाह बळकट व्हायला मदत झाली. कारण, साहित्यसंमेलनावर बहिष्कार घालणारे महात्मा फुले यांचाच विचार आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न केला होता. पुढं त्यांत मतभेद झाले तरी किमान पंधरापेक्षा जास्त विद्रोही साहित्यसंमेलनं यशस्वी झाली आहेत.’

जातीय अत्याचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा हे मोरे यांचं महत्त्वाचं काम. नामांतराच्या प्रश्नावर ते १४ दिवस तुरुंगात होते. ‘खैरलांजी’पासून त्यांनी जातीय अत्याचारांच्या ठिकाणी जाऊन सत्यशोधन केलं व अत्याचारग्रस्त कुटुंबांशी बोलून, प्रशासनाशी बोलून, त्याविषयीचा अहवाल शासनाला सादर केला. यातून, अत्याचाराच्या अनेक प्रकरणांना तोंड फुटलं व त्या काळात माध्यमं सर्वदूर पसरलेली नसताना त्या दबलेल्या अत्याचारांचा हुंकार राज्यकर्त्यांपर्यंत आणि समाजातील मान्यवरांपर्यंत पोहोचला. महाडजवळील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यावर तिला मोरे यांनी न्याय मिळवून दिला व त्याच वेळी तिच्या शिक्षणासाठीही प्रयत्न करून तिचं पुनर्वसन केलं. नगर जिल्ह्यातील सोनई-हत्याकांड, जवखेडे-हत्याकांड, नितीन आगे खूनप्रकरण, पारधी-अत्याचाराचं प्रकरण, पुणतांबे येथील गोळीबार, मराठवाड्यातील दलितांचे डोळे काढण्याचं प्रकरण....अशा कितीतरी प्रकरणांची तड लावण्याच्या कामात मोरे यांचा सहभाग होता व त्या कुटुंबांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.

‘मुंबई ही एकेकाळी डाव्या चळवळीचा बालेकिल्ला होती, असं असताना मुंबईत व महाराष्ट्रात डाव्या चळवळीची पीछेहाट का झाली?’’ असं विचारल्यावर मोरे म्हणाले : ‘‘पुरोगामी चळवळीतील फाटाफुटीनं अन्य शक्ती वाढण्याला बळ मिळत गेलं. काही कामगारनेत्यांच्या खुनांच्या घटनांनी गिरणीकामगारांची चळवळ मोडून काढली गेली व गिरणीकामगार हाच डाव्या चळवळीचा पाया असल्यानं त्याचा फटका चळवळीला बसला. मुंबईच्या जाती-धर्मविरहित असलेल्या चेहऱ्याचं धार्मिक विभाजन १९८४ व १९९२ च्या दंगलींनंतर केलं गेलं.’

ज्या विद्यार्थी-चळवळीतून सुबोध मोरे घडले ती तरुणाई आज डाव्या चळवळीकडे का येत नाही, या प्रश्नावर बोलताना मोरे म्हणाले : ‘‘पूर्वीच्या विद्यार्थी-चळवळींचे नेते हे राजकीय चळवळींशी, कष्टकऱ्यांच्या चळवळींशी जोडले गेलेले होते. त्या अभ्यासवर्गातून त्यांची वैचारिक जडणघडण होत असल्यानं ते व्यापक पातळीवरून प्रश्नांकडे बघत असत, चळवळींत सहभागी होत असत. आज विद्यार्थी-चळवळी राजकीय पक्षांच्या शाखा झाल्या आहेत. विद्यार्थी-चळवळींचं रूपांतर सामाजिक चळवळीत होत नाही. तरुणांना पुन्हा चळवळीकडे आणण्यासाठी सांस्कृतिक माध्यमातून आकर्षित करायला हवं. तरुण जी माध्यमं वापरतात त्या माध्यमांचा वापर वाढवायला हवा.’’

इतकं गंभीर काम करणारे मोरे हे सदैव हसतमुख असतात.

‘निराशा येत नाही का?’ या प्रश्नावर ते म्हणाले : ‘‘अण्णा भाऊ साठे यांच्यापासून ते एन. डी. पाटील यांच्यापर्यंत सर्व मान्यवर सहकारी एकेक करून निघून गेले. यानं भावनिक एकटेपण नक्कीच वाटतं; पण तरीही मी निराश होत नाही. समूहांशी माझं जैव नातं सतत जोडून असतो मी. संघटनेपलीकडेसुद्धा समविचारी सर्वांशी मैत्री करत राहतो. जो मैत्री करू शकतो तो कधीच निराश होत नाही. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम आहे...’’

असे हे सुबोध मोरे. समजायला अतिशय सुबोध आणि नितळ मनाचा कार्यकर्ता!

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com