‘विवेक’शील लढवय्या!

आदिवासी गावांत विद्युल्लता पंडित आदिवासी तरुणांचे खेळ घ्यायच्या; पण काही तरुण खेळ दुरूनच बघायचे. त्याचं कारण विचारल्यावर, ते सालगडी आहेत, असं कळलं.
Vivek pandit and Viddyulata Pandit
Vivek pandit and Viddyulata Panditsakal
Summary

आदिवासी गावांत विद्युल्लता पंडित आदिवासी तरुणांचे खेळ घ्यायच्या; पण काही तरुण खेळ दुरूनच बघायचे. त्याचं कारण विचारल्यावर, ते सालगडी आहेत, असं कळलं.

ता. १९ ऑक्टोबर १९८२ ला स्थापन झालेल्या ‘श्रमजीवी संघटने’ला नुकतीच ४० वर्षं पूर्ण झाली. या संघटनेचे आज एक लाख ३३ हजार सदस्य आहेत. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार व सानेगुरुजींचा प्रभाव यातून विवेक पंडित यांनी कामाची सुरुवात केली.

विवेक पंडित (८२३७०४७००३), विद्युल्लता पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधलेल्या या संघटनेचं काम मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, जळगाव, नगर या जिल्ह्यांत चालतं. नामांतराच्या सत्याग्रहात पंडित यांनी चौदा दिवसांचा तुरुंगवास भोगला. श्रमजीवी संघटनेची संघटनात्मक पायाभरणी ही त्या कारावासात झाली आणि मग कारावासातून बाहेर आल्यानंतर ता. १९ ऑक्टोबर १९८२ रोजी ती आकाराला आली. जे जे श्रमावर जगतात त्या त्या सर्वांची ही संघटना.

आदिवासी गावांत विद्युल्लता पंडित आदिवासी तरुणांचे खेळ घ्यायच्या; पण काही तरुण खेळ दुरूनच बघायचे. त्याचं कारण विचारल्यावर, ते सालगडी आहेत, असं कळलं. लग्नासाठी कर्ज काढल्यामुळे, पालकांनी अन्य कारणांसाठी कर्ज काढल्यामुळे ते फेडण्यासाठी या तरुणांना अठरा अठरा तास कर्जदार मालकाकडे काम करावं लागे. संघटनेनं सुरुवातीला वेठबिगारी-मुक्तीसंदर्भात काम सुरू केलं. मजुरांची सुटका करणं व मालकांवर गुन्हे दाखल करणं सुरू झालं. अशा मालकांना महाराष्ट्रात प्रथमच शिक्षा होऊ लागल्या. त्यातून मालकांचे हल्लेही झाले, संघटनेनं तेही झेलले; पण संघर्ष करून या प्रथेचं निर्मूलन करण्यात संघटनेला यश आलं.

आजपर्यंत संघटनेनं पाच हजार वेठबिगार मुक्त केले आहेत. नंतरच्या काळात देशाच्या विविध राज्यांत व नेपाळमध्ये जाऊनही प्रशिक्षण घेतलं. गुलामगिरी संपवण्यासाठी करत असलेल्या या आंतरराष्ट्रीय कामाबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला. शेतमजुरांना किमान वेतन मिळावं म्हणून १४ दिवसांचा संप त्यांनी घडवून आणला. ‘मजुरी वाढवली नाही तर कामावर जाणार नाही,’ असा इशारा देत शेतमजूर प्रत्येक गावात फेरी काढायचे व संप सुरू करायचे. अनेक गावांत मजुरांना मारहाण झाली. वेढेपाडा गावात सभा घेतली म्हणून ३०० स्त्री-पुरुष मजुरांना सात दिवस तुरुंगात धाडण्यात आलं तरीही मजूर डगमगले नाहीत. किमान मजुरी मिळाल्यावर मजुरीची बाकी संघटनेनं मजुरांना मिळवून दिली. सिद्धपीठ गणेशपुरी येथील मजुरांसाठीही किमान मजुरीचा लढा संघटनेनं उभारला. वीटभट्टीमजुरांची मालकांकडून होणारी फसवणूक, भट्टीवर होणारे मृत्यू यांविषयी लढा दिला. नुकसानभरपाई मिळवून दिली. मजुरी वाढवून घेतली.

वसई पट्ट्यातील गुंडगिरीविरुद्ध संघटनेनं लढा दिला. गरिबांकडून लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम परत करायला लावली. संघर्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणवर्ग सातत्यानं घेतले. विविध कायदे, तक्रार करण्याच्या प्रक्रिया यांविषयीचं प्रशिक्षण दिल्यानं संघर्षाची धार वाढली. किमान वेतन लढा, लाटलेल्या जमिनीच्या विरोधात लढा, वीटभट्टी कामगारांचा लढा, किमान वेतनासाठी संघर्ष, शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा, वनजमिनींच्या हक्कांविषयीचा लढा असे अनेक लढे संघटनेनं लढले.

हे संघर्ष करताना वैतरणा येथे विवेक व विद्युल्लता यांच्यावर हल्ला झाला. कार्यकर्त्यांवर ११ वेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही लढा सुरूच राहिला. मराठवाड्यातील अंबादास सावणे या दलितहत्येतील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी संघटनेनं पाठपुरावा केला. चाळीस वर्षांच्या संघर्षात संघटनेनं पाच हजार वेठबिगार मुक्त केले, २० हजार आदिवासींच्या अतिक्रमित वनजमिनींचे प्लॉट व ३० हजारांहून अधिक एकर जमिनी व एक हजार एकर हस्तांतरित जमिनी ज्यांच्या त्यांना मिळवून दिल्या. सामाजिक वनीकरणांतर्गत १५ लाखांहून अधिक झाडांची लागवड केली. वीटभट्टीवर येणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी भोंगाशाळा सुरू केल्या व जवळपास २५ हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले व अशा मुलांसाठी ‘महात्मा फुले योजना’ हे धोरण शासनाला राबवायला भाग पाडलं. हे नुसते आकडेच कामाचा आवाका आणि परिणामकारकता स्पष्ट करतात. हे संघर्षाचं काम सुरू करताना आदिवासींच्या मदतीसाठी विधायक काम करणारी ‘विधायक संसद’ ही स्वतंत्र संस्था पंडित यांनी सुरू केली.

त्या संस्थेमार्फत सुरुवातीला दवाखाना काढला, बालवाड्या काढल्या व लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून शेळीपालन केलं, गाई पाळल्या, डुकरं पाळली. त्यानंतर सामूहिक शेतीसारखे प्रयोग केले. कलिंगडाची लागवड करायला प्रोत्साहन दिलं. त्यासाठी बियाणं, खतं, डिझेल पंप पुरवण्यात आले. अतितीव्र कुपोषित मुलांसाठी कायमस्वरूपी छावणी उभारण्यात आली व तिथं या मुलांना नियमित आहार दिला गेला...उपचार केले गेले व शेकडो मुलांचे प्राण वाचवण्यात संघटनेला यश मिळालं. १५० सरपंच, ७०० सदस्य, ११ जिल्हा परिषदसदस्य, तीन पंचायत समित्यांचे अध्यक्ष अशा विविध पदांवर संघटनेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निवडून आले. त्यांनी प्रभावीपणे काम केलं.

स्वत: पंडित वसई-विरारचे आमदार झाले. सध्या ते मंत्र्याचा दर्जा असलेल्या सरकारच्या ‘आदिवासी क्षेत्र आढावा समिती’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्थापन केलेली आणखी एक संस्था आहे. तिचं नाव ‘समर्थन.’ लोकांचे प्रश्न धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवणं, विधानसभेत ते मांडले जातील असं पाहणं, मंत्रिमंडळात निरनिराळ्या मंत्र्यांच्या भेटी-गाठी, विधानसभेतील निरनिराळ्या आमदारांना, विधान परिषदेतील आमदारांना, माध्यमांना प्रश्नांविषयीची माहिती देणं अशा पद्धतीचं काम आणि अर्थसंकल्पाचं विश्लेषण करून ते आमदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम ‘समर्थन’मार्फत सुरू झालं. रूपेश कीर आणि हिंदप्रभा कर्वे सध्या हे काम करतात. ‘समर्थन’नं पत्रकारांची संघटना म्हणून ‘मानवी हक्क वार्ता पुरस्कार’ द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत ११० पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

‘‘या ४० वर्षांत आदिवासींच्या जीवनात तुम्हाला काय बदल दिसतो?’’ या प्रश्नावर पंडित म्हणतात :‘‘गेल्या चाळीस वर्षांच्या कामात आदिवासींच्या जीवनात झालेला बदल हा माझ्या डोळ्यांसमोर घडलेला आहे. केवळ संघटनेमुळे लोकांचा आर्थिक स्तर वाढला. पूर्वी जे भूमिहीन होते, ज्यांचा सामाजिक दर्जा भूमिहीन म्हणून होता, ते आता वनजमिनीचे मालक झाले. संघटनेच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही शिबिरं घेत असू तेव्हा एखाद्-दुसरा शिकलेला असायचा. आज जे पंचविशी-तिशीच्या पुढं आहेत ते सर्वच्या सर्व शिकलेले आहेत. शिवाय, नव्या तंत्रज्ञानाचा वापर ही मुलं करतात.’’

‘‘संघटनेपुढं आता - चाळीस वर्षांनंतर - कोणती आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं?’’ यावर पंडित म्हणाले : ‘‘नंतरची पिढी तयार करणं आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते काम सोपवणं हे फार आव्हानात्मक काम आहे. नव्या पिढीला नवी आव्हानं पेलायची आहेत...कारण, विरोधक बदललेला आहे, विरोधकाचा पोत बदललेला आहे. विरोध करण्याच्या पद्धती त्यांच्या बदललेल्या आहेत, तेव्हा हा सगळा बदल या कालखंडात झालेला आहे. तेव्हा या बदलाला सामोरं जाणं यासाठी तयारी करणं हे मला आवश्यक वाटतं.’’

संघटनेनं दिलेल्या आत्मविश्वासाबद्दल ते म्हणतात : ‘‘अमुक व्यक्ती संघटनेची सभासद आहे किंवा अमुक व्यक्ती संघटनेची सभासद नाही हे मी चेहऱ्यावरून ओळखू शकेन! एक लाख तेहतीस हजार लोकांची ताकद जेव्हा प्रत्येक सभासदाच्या मागं उभी राहते तेव्हा संघटनेचं तेज सभासदाच्या चेहऱ्यावर झळकतंच!’’ तर असे हे लढवय्ये विवेक पंडित. आदिवासींना चाळीस वर्षं सातत्यानं संघटित करत त्यांचे प्रश्न सोडवत आहेत व त्यांना आत्मविश्वास देत आहेत.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com