चकचकाटामागची घुसमट...

भारतीयांसाठी चांगली बाब म्हणजे, १४ दिवसांसाठी हाँगकाँगमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे
Hong Kong public transportation system aircraft runway Reclamation
Hong Kong public transportation system aircraft runway Reclamationsakal

- मालोजीराव जगदाळे

विमान रनवेवर उतरेपर्यंत कळत नव्हतं की विमान कुठं उतरेल, कारण चारही बाजूला पाणी दिसत होतं. विमानतळावर पोचल्यावर कळलं की, संपूर्ण विमानतळच रेक्लमेशन केलेल्या जमिनीवर होतं.

एकेकाळी मासे पकडून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळ्यांचं छोटं गाव एकोणिसाव्या शतकात अफूची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलं. पुढं ब्रिटिशांनी या गावाचं रूपांतर आशियातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेत केलं आणि निर्मिती झाली जगातील सर्वांत श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाँगकाँगची.

विमानतळावरून बाहेर पडताना मी बसचा वापर केला, कारण इथं टॅक्सी भलतीच महाग आहे; पण हाँगकाँगचं वैशिष्ट्य म्हणजे, इथली जबरदस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. बस, मेट्रो, जहाजं आणि हाय स्पीड क्रूज यांचं मोठं जाळं हाँगकाँगमध्ये असल्याने देश जरी महाग असला, तरी फिरणं मात्र त्यामानाने स्वस्त आहे.

भारतीयांसाठी चांगली बाब म्हणजे, १४ दिवसांसाठी हाँगकाँगमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. जाण्यापूर्वी फक्त एक प्री अरायव्हल रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मेनलँड कावलून, हाँगकाँग बेट, लांताऊ बेट आणि जुने प्रदेश अशा चार भागांचा मिळून हाँगकाँग तयार झालेला आहे.

यातल्या हाँगकाँग बेटावर जगभरातील अग्रगण्य बँका आणि मोठ्या कंपन्या यांची मुख्य कार्यालयं आहेत, त्यामुळे या भागाला कमर्शिअल डिस्ट्रिक्ट असं म्हणतात. तर, सर्वांत जास्त लोकवस्ती मेनलँड कावलून इथं आहे. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरइतक्याच प्रसिद्ध असलेल्या टीम शा सुई या भागातल्या एका आंतरराष्ट्रीय हॉस्टेलमध्ये मी मुक्काम केला.

कमी किंमत, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि उत्तम चव यामुळे जेवणाच्या वेळेला दुपारी आणि रात्री या स्ट्रीट फूड स्टॉलच्या बाहेर प्रचंड रांगा लागलेल्या असतात. काही ठिकाणी तर मी १०० मीटरपर्यंतची रांग बघितली होती. इथल्या अशाच एका जगप्रसिद्ध अशा टीम हो वान नावाच्या स्ट्रीट फूड जॉइंटमध्ये मी स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

या रेस्टॉरंटला खाद्य क्षेत्रातला नोबेल समजला जाणारा मिशेलिन स्टार हा पुरस्कार प्राप्त आहे. चायनीज भाषेपेक्षा थोडीशी वेगळी अशी कँटनिज भाषा इथं बोलली जाते; पण इथं भाषेची फारशी अडचण येत नाही, कारण बहुतांश सर्वांना इंग्रजी थोडीफार का होईना समजते.

इथल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक काम करतात, ज्यांमध्ये अमेरिकन, ब्रिटिश, भारतीय, मलेशियन, फिलिपिनी लोक जास्त प्रमाणात दिसतात. कष्टाची किंवा मोलमजुरीची कामं चायनीज लोक करतात.

जगभरातल्या अनेक शहरांमध्ये मी फिरलो, बऱ्याच शहरांची नाइट लाइफसुद्धा बघितली; परंतु हाँगकाँगमध्ये रात्री जो झगमगाट आहे, तो इतर कोणत्याही शहरांमध्ये मी बघितला नाही. लांताऊ बेट, व्हिक्टोरिया शिखर, हॉलिवूडच्या वॉक ऑफ फेमच्या धर्तीवर बनवलेलं अव्हेन्यू ऑफ स्टार्स, सिंफनी ऑफ लाइट्स हा लाइट-साउंड शो, डिस्नीलँड या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देतात.

पण, माझ्यासाठी तिथली खरी आकर्षणं म्हणजे, तिथल्या फूड स्ट्रीट, स्ट्रीट शॉपिंग, मेट्रो सिस्टीम, संग्रहालयं होती. जगातील इलेक्ट्रॉनिक्सचं निर्मिती केंद्र असणारं शेंझेन शहर इथून फक्त ५० किलोमीटर असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू इथं प्रचंड स्वस्त मिळतात. टेम्पल स्ट्रीट नाइट मार्केट आणि मोंग कोग यासाठी प्रसिद्ध आहेत.

भारतीयांची घासाघीस करण्याची कला इथं उपयोगी पडते. हाँगकाँग त्याच्या अतिशय व्हायब्रंट नाइटलाइफसाठी जगप्रसिद्ध आहे, इथल्या LKF किंवा लान क्वाई फाँग ह्या भागात ९० जगप्रसिद्ध बार्स आणि क्लब आहेत,

तर शेकडो रेस्टॉरंट्स आहेत. इथल्या फायनान्स डिस्ट्रिक्टमधल्या रहिवासी इमारती डोंगराच्या उतरंडीवर असल्याने इथं पादचाऱ्यांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित जिने बनवले आहेत, ज्यांची लांबी तब्बल २ हजार ६०० फूट आहे. जगातील एकमेव अशी ही वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे. इथली मेट्रो बऱ्यापैकी जमिनीखाली असल्याने मेट्रोचं एक वेगळंच जग इथं पाहायला मिळतं. जमिनीखाली बनवलेले भव्य मॉल्स, कॅफे, रेस्टॉरंट आवर्जून बघायला हवेत.

हाँगकाँगची ओळख करून देण्यासाठी अनेक स्थानिक संस्था परदेशी पर्यटकांसाठी फ्री वॉकिंग टूर आयोजित करत असतात. यातल्याच एका टूरमध्ये मी सहभागी झालो. या टूरच्या माध्यमातून इथली संस्कृती, समाजव्यवस्था, इतिहास आणि सद्यःस्थिती यांची ओळख झाली. आर्मे नावाचा तरुण स्थानिक युवक या टूरचं नेतृत्व करत होता.

इथलं खानपान, लग्नसंस्कृती याबद्दलच्या अनेक मजेशीर बाबी त्याने सांगितल्या. यात आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे रेड बॉम्ब. रेड बॉम्ब म्हणजे लग्नाची निमंत्रणपत्रिका, जी लाल रंगाच्या कव्हरमध्ये दिली जाते. याचा अर्थ असा की, तुम्ही नवरा-नवरीच्या अतिशय जवळचे नातेवाईक किंवा मित्र आहात.

ज्यांना हा रेड बॉम्ब मिळतो, त्यांनी या लग्नात कमीत कमी २५०० हाँगकाँग डॉलर्स (२५ हजार रुपये) खर्च करायचे असतात. अशाप्रकारे इथल्या लग्नांमध्ये नातेवाईक आणि मित्रांकडूनच लग्नाचा खर्च वसूल केला जातो, त्यामुळे या रेडबॉम्बची हाँगकाँगमध्ये भलतीच दहशत आहे.

आर्मेने सांगितलं, ब्रिटिशांनी १८४८ पासून हाँगकाँगवर ताबा मिळवला आणि १८९८ मध्ये चिनी साम्राज्याकडून अधिकृतरीत्या ९९ वर्षांसाठी हाँगकाँग लीजवर घेतलं. १९९७ ला ही लीज संपल्यावर पुन्हा पन्नास वर्षं लीजचं नूतनीकरण करून घेता येईल, असं तत्कालीन चिनी साम्राज्याकडून सांगण्यात आलं होतं.

पण, नंतर चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आली आणि त्यांनी १९९७ नंतर लीज वाढवून द्यायला नकार दिला. चीन दिलेल्या शब्दाला पलटल्यामुळे ब्रिटिशांनी आक्रमक पवित्रा घेतला, त्यामुळे यावर तोडगा असा निघाला की, १९९७ ला ब्रिटिश हाँगकाँग सोडतील; पण पुढील पन्नास वर्षं म्हणजे २०४७ पर्यंत हाँगकाँग एक स्वायत्त प्रदेश असेल.

हाँगकाँगला स्वतःची घटना, स्वतःची लोकशाही व्यवस्था व स्वतःची वेगळा देश म्हणून ओळख असेल. पण, असा हातातोंडाशी आलेला घास सोडेल तो चीन कसला. मानवी हक्कांची पायमल्ली, हुकूमशाही पद्धतीची राजवट, पत्रकारितेवर सरकारचा वचक यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनचाच एक भाग असलेला हाँगकाँग लोकशाही पद्धतीने राज्य चालवतो, जनतेला सर्वाधिकार देतो, मुक्त पत्रकारितेचं नंदनवन म्हणून ओळखला जातो, हे चीनच्या डोळ्यांत खुपत होतं.

हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी आघाडी आणि प्रो बीजिंग आघाडी असे दोन राजकीय गट आहेत, ज्यांमध्ये लोकशाहीवादी आघाडी कायमच निवडणुका जिंकत आली. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर चायनीज लेबर हाँगकाँगमध्ये आणण्यात आले, ज्यांना नंतर हाँगकाँगचे नागरिक बनवण्यात आलं,

निवडणुका मॅनेज करण्यात आल्या, तिथल्या असेंब्लीची रचना बदलण्यात आली. प्रत्यार्पण कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा अशा गोंडस नावांखाली मानवी हक्कांवर गदा आणणारे, मुक्त पत्रकारितेला धोका निर्माण करणारे आणि लोकशाहीवादी नेते, विचारवंत, लेखक यांना देशद्रोही ठरवणारे कायदे आणले गेले.

गेल्या पाच वर्षांत फ्री प्रेस म्हटल्या जाणाऱ्या अनेक वर्तमानपत्रांवर, टीव्ही चॅनेल्सवर बंदी आणली गेली. लोकशाहीवादी चळवळींचे प्रमुख रातोरात गायब करण्यात आले. देशद्रोहाचे आरोप लावल्याने लोकशाहीवादी आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी जपान, इंग्लंड, अमेरिका अशा देशांत आश्रय घेतले. १९९७ मध्ये स्वातंत्र्य मिळालेला हा देश अवघ्या २३ वर्षांत पुन्हा पारतंत्र्यात गेला.

मी ज्या वेळी हाँगकाँगमध्ये होतो, त्या वेळीसुद्धा मोठ्या प्रमाणावर चीनच्या सरकारविरोधी आंदोलनं सुरू होती. माझा गाइड असणारा आर्मे हासुद्धा या चळवळीचा कार्यकर्ता होता. ब्रिटनने १९९७ पूर्वी जन्म झालेल्या प्रत्येक हाँगकाँगच्या नागरिकाला ब्रिटिश पासपोर्ट दिला आहे,

जेणेकरून कम्युनिस्ट राजवटीत राहायची इच्छा नसलेल्या हाँगकाँगवासीयांना ब्रिटन, अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये स्थलांतरित होता येईल. मागच्या चार वर्षांत जवळपास दहा लाख नागरिक या देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

हाँगकाँगमध्ये प्रवेश करताक्षणीच जाणवणारा चकचकाट आणि झगमगाट पर्यटकांच्या डोळ्यांना सुखावणारा जरी असला, तरी हाँगकाँगवासीयांची होणारी घुसमट ठिकठिकाणी जाणवत राहते. चिनी ड्रॅगनच्या घशात हा सुंदर देश पूर्णपणे जाण्याअगोदर आवर्जून हाँगकाँगला भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com