

Mecca Defense Pact
esakal
हुथींच्या हल्ल्याने पाकिस्तानने सौदी आणि तुर्कीसोबत केलेल्या मक्का संरक्षण कराराची कसोटी लागली आहे. एकावर हल्ला म्हणजे सगळ्यांवरचा हल्ला मानून प्रतिकाराची हमी या कराराचा गाभा आहे, मात्र हुथींशी येमेनमध्ये लढण्याची पाकिस्तानची तयारी नाही.
हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील बाब-अल-मंदेबवर जवळपास ताबा मिळवल्याने पश्चिम आशियातील आणखी एक संघर्ष क्षेत्र समोर आलं आहे. हा संघर्ष प्रामुख्याने येमेनमधील हुथी आणि सौदी अरबमधील आहे. सुरुवातीला तरी हुथी बंडखोरांनी सौदीला जोराचा धक्का दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अडवून इराणनं जगाला चकित करणारा पवित्रा घेतला, तसा हुथी घेऊ शकतात, अशी स्थिती तांबड्या समुद्रातील अरुंद जलमार्गावर आली आहे. यात सौदी अरब एकाकी पडणं आणि अमेरिकेशी विकत घेतलेली मैत्री संरक्षणाची हमी देत नाही, हे वास्तव तमाम अरब देशांसाठी बोचरी जाणीव करून देणारं आहे. जे पश्चिम आशियातील नव्या भू-राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतं.