'बिग बॉस'चा कुळाचार (प्रवीण टोकेकर) 

प्रवीण टोकेकर
रविवार, 30 जून 2019

'बिग बॉस'चा मराठीतला पुढचा सीझन सुरू झाला आहे आणि त्याबद्दल मोठी चर्चाही सुरू आहे. मूळ अमेरिकेतल्या 'बिग ब्रदर'पासून सुरू झालेला प्रवास अनेक वळणं घेत हा प्रवास जगभरात वेगवेगळ्या रूपांमध्ये सुरू आहे. अनेक वळणं घेतली असली, तरी त्याचा कुळाचार मात्र कायम राहिला आहे. हा शो, त्याबाबतची मानसिकता, या शोचं 'कूळ', त्यानं निर्माण केलेले प्रश्‍न आदी गोष्टींवर एक नजर. 
 

'बिग बॉस'चा मराठीतला पुढचा सीझन सुरू झाला आहे आणि त्याबद्दल मोठी चर्चाही सुरू आहे. मूळ अमेरिकेतल्या 'बिग ब्रदर'पासून सुरू झालेला प्रवास अनेक वळणं घेत हा प्रवास जगभरात वेगवेगळ्या रूपांमध्ये सुरू आहे. अनेक वळणं घेतली असली, तरी त्याचा कुळाचार मात्र कायम राहिला आहे. हा शो, त्याबाबतची मानसिकता, या शोचं 'कूळ', त्यानं निर्माण केलेले प्रश्‍न आदी गोष्टींवर एक नजर. 
 

जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'नाइन्टीन एटीफोर' या गाजलेल्या कादंबरीचा नायक विन्स्टन स्मिथ आपल्या एका सहकाऱ्याला, म्हणजेच ओब्रायनला विचारतो ः ''खरंच का रे...'बिग ब्रदर' अस्तित्त्वात आहे?'' 

''अर्थात!''ओब्रायननं उत्तर दिलं. 

''तो आपल्यावर खरंच चोवीस तास पाळत ठेवून आहे?,'' विन्स्टननं अविश्‍वासानं विचारलं. 

''नाही...तू कुठं अस्तित्वात आहेस?,'' ओब्रायन उत्तरला. 

ऑर्वेलसाहेबांनी ही कादंबरी लिहिली सन 1949च्या थोडी आधी. त्यांना क्षयानं ग्रासलं होतं. तसल्या तोळामासा प्रकृतीनिशी त्यांनी ही कादंबरी लिहिली. आठ जून 1949 रोजी ती प्रकाशित झाली- अजुनी ती गाजतेच आहे. आठ जून! म्हणजे गेल्याच महिन्यात या कादंबरीचा सत्तरावा वाढदिवस झाला. तब्बल 85 भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद झाले आहेत. 

त्यातला कुणालाही न दिसणारा, भेटणारा, तरीही सगळ्यांवर पाळत ठेवून असणारा सर्वशक्‍तिमान 'बिग ब्रदर' वाचकांना पार चक्रावून गेला. या कादंबरीवर आधारित नाटकं आली, चित्रपट आले. रेडिओ शोज झाले. 'बिग ब्रदर'बद्दलचं कुतूहल वाढतच गेलं. त्याचा न दिसणारा चेहरामोहराही बदलत गेला. 

काही लोक त्याला 'पर्व' किंवा 'महापर्व' असंही म्हणतात. परीक्षकांना 'महागुरू', 'महावस्ताद' वगैरे. दुय्यम तिय्यम कार्यक्रमांमध्ये थोडेफार झेंडे गाडले असले, की काम भागतं. 'महागुरू' बनून उंच पाठीच्या खुर्चीत जाऊन बसायचं. ही टिपिकल मनोरंजनाच्या दुनियेची आयडिया.

'नाइन्टीन एटीफोर' या भविष्यवेधी राजकीय कादंबरीला विज्ञान काल्पनिकेचा बाज होता. थोडक्‍यात कथासूत्रं असं : युद्ध, यादवीनंतरच्या दुष्कर युद्धमान स्थितीत ग्रेट ब्रिटन (कादंबरीत एअरस्ट्रिप वन) हा ओशनिया नामक एका अफाट साम्राज्याचा प्रांत झाला आहे. तिथं 'बिग ब्रदर'ची सत्ता चालते. त्याच्या सत्ताधारी पक्षाचं नावही 'द पार्टी' असंच आहे. 'बिग ब्रदर' हा त्या पार्टीचा सर्वेसर्वा, तर विन्स्टन स्मिथ हा एक छोटा कार्यकर्ता. त्याला पक्षशिस्त, पक्षहित, पक्षनिष्ठा वगैरे सगळं ठाऊक आहे; पण 'बिग ब्रदर'च्या काही गोष्टी त्याला खटकू लागल्या आहेत. मनातल्या मनात तो बिग ब्रदरचा तिरस्कार करू लागला आहे. बंड करण्याचे विचारही घोळताहेत. ते बरोबरच आहे. कारण 'दोन कानामधला काही घन चौरस सेंटिमीटरचा भाग (पक्षी : मेंदू) वगळता 'बिग ब्रदर'पासून काहीही लपून राहत नाही' हे वास्तवही त्याला कळून चुकलेलं आहे. 

रयतेचं लष्करीकरण, सरकारी दट्ट्याची दहशत, स्वातंत्र्याची करकचून गळचेपी अशा अनेक बाबींची चर्चा करत ही कहाणी पुढं सरकते. ऑर्वेलसाहेबांनी वर्णिलेला त्यातला 'बिग ब्रदर' हा सर्वव्यापी, दिव्यदृष्टी असलेला, सर्वशक्‍तिमान मनुष्य आहे. तो पोस्टरवर अर्धामुर्धा दिसतो. त्याचा गंभीर, हुकमतदार आवाज मात्र ऐकू येत राहतो. त्याचा आवाज ही आज्ञाच असते. 'बिग ब्रदर'ला आव्हान देता येत नाही. कुणालाच. 'नाइन्टीन एटीफोर' हे एक भविष्यातल्या राजकीय व्यवस्थांवरचं जळजळीत भाष्य होतं. या कादंबरीतले अनेक शब्द पुढं लोकशाही राजवटीतल्या नेहमी वापरल्या जाणाऱ्या संज्ञा ठरल्या. थॉटक्राइम, दोन अधिक दोन बरोबर पाच, न्यूस्पीक नावाची नवीन भाषा...अशा कितीतरी. 

ऑर्वेलसाहेबांनी लिहिलेल्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर पन्नास वर्षांनी आणखी एक बिग ब्रदर जगभर गाजू लागला. ऑर्वेलच्या कहाणीत वर्णिलेल्या 'टेलिस्क्रीन'वरूनच तो घराघरात पोचला होता. 'बिग ब्रदर' शो किंवा 'बिग बॉस!' 

'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून' अशी आपली एक मराठी म्हण आहे. म्हण कसली सुविचारच तो. माणसाच्या स्वभावाची एक काळीकरडी छटा त्यात अचूक डोकावते. इंग्रजीत यालाच 'व्हॉयुरिझम' असं म्हणता येईल. दुसऱ्याच्या खासगी गोष्टीत नाक खुपसणं हा मनोरंजनाचा भाग असतो.

सन 2000 मध्ये 'बिग ब्रदर' हा रिऍलिटी शो अमेरिकेतल्या सीबीएस चॅनेलवर दाखवला जाऊ लागला आणि हा भन्नाट अदृश्‍य बॉस जगप्रसिद्ध झाला. आज 'बिग ब्रदर' किंवा हिंदी-मराठी 'बिग बॉस' बघणाऱ्या लाखो प्रेक्षकांना जॉर्ज ऑर्वेल हे नावही माहिती नसेल. 'बिग ब्रदर' शोचे जगभरात जवळपास चाळीसेक देशात, वेगवेगळ्या भाषेत सहाशेच्या वर हंगाम पार पडतात. युक्रेन, बल्गेरिया, इटली, स्पेन, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, ब्राझिल अशा कितीतरी देशांमध्ये 'बिग ब्रदर' रिऍलिटी शो गाजत असतो. ऑस्ट्रेलियातही तो सुरू होता; पण दहा वर्षांपूर्वी सरकारनं त्यावर कडक बंदी लादली. 

नेदरलॅंड्‌समधल्या जॉन डे मॉल नामक कल्पक माणसाला या रिऍलिटी शोची कल्पना स्फुरली. जगातल्या सर्वांत महागड्या रिऍलिटी शोजपैकी 'बिग ब्रदर' हा शो आहे. किंबहुना हा शो हीच एक छोटीशी अर्थव्यवस्था आहे. जॉन डे मॉलनं हा शो त्याच्या नेदरलॅंड्‌समध्ये चालू केला. मग अमेरिकेच्या सीबीएस या वाहिनीनं त्याचे हक्‍क तब्बल दोन कोटी डॉलर्सना खरेदी केले. जगभरातल्या अनेक वाहिन्यांनी त्याचे हक्‍क विकत घेतले. पुढं जॉन डेमॉलनं त्याची कंपनी विकली; पण त्याचे स्वामित्वाचे हक्‍क शाबूत ठेवून. ज्या ज्या वेळी तुम्ही या कार्यक्रमासाठी टीव्ही लावता, तेव्हा तेव्हा त्या कोण कुठल्या जॉन डे मॉलच्या खात्यात पैसे पडत जातात. वास्तविक त्याचा आता 'बिग ब्रदर'शी कॉपीराइट वगळता फारसा संबंध नाही; पण हे डे मॉल गृहस्थ धनाढ्य झाले ते या 'बिग ब्रदर'मुळंच, हे निर्विवाद. जॉन डे मॉल आता चौसष्ट वर्षांचा आहे. ऍमस्टरडॅमपासून चोवीस किलोमीटर अंतरावरल्या सिल्वरडम नामक झक्‍क ठिकाणी तो आलिशान राहतो आहे. धुळे किंवा कवठे-एकंदचा कुणी बाळुश्‍या किंवा बाळी मराठी 'बिग बॉस' बघून त्याला घरबसल्या पैका मिळवून देतेय, हे त्याच्या गावीही नसेल. 

सन 2000 मध्ये सीबीएसनं पहिल्यांदा हा शो दाखवला, तेव्हा जॉर्ज ऑर्वेलसाहेबांच्या 'इस्टेट'नं ताबडतोब कोर्टात धाव घेतली. जॉन डे मॉलनं ऑर्वेलसाहेबांची आयडिया चोरली. इतकंच नव्हे, तर आख्खं 'बिग ब्रदर' हे कॅरेक्‍टरच ढापलं असा दावा त्यांनी ठोकला. बरीच भवति न भवती झाल्यानंतर कोर्टाबाहेर सेटलमेंट झाली, असं सांगितलं जातं. बहुधा 'बिग ब्रदर'नंच काही जमवून आणलं असेल. त्याला काय, काहीही शक्‍य आहे... 

जॉन डे मॉलला ऑर्वेलसाहेबांच्या '1984' नं प्रेरणा दिली, तर मग ऑर्वेलसाहेबांना कुठून ही 'बिग ब्रदर'ची आयडिया सुचली असेल? यावर शेकडो पानं लिहून झाली आहेत. किंबहुना अनेकांनी चक्‍क त्याबद्दल संशोधनही केलं आहे. कुणी म्हणतं, त्याकाळी रशियात जोसेफ स्टालिनचं प्रस्थ होतं. सोविएत संघाच्या पोलादी पडद्याआडच्या खबरी येत असत. त्यातून ऑर्वेलसाहेबांना 'बिग ब्रदर' दिसला. कुणी म्हणतं, ऑर्वेलसाहेब बीबीसीच्या भारतीय सेवेत काही काळ ब्रॅंडन ब्रॅकन नामक बॉसच्या हाताखाली काम करत. हे ब्रॅकनसाहेब 'बीबी' अशी सही करायचे. त्यांचा दबदबा होता. त्यापासून ऑर्वेलसाहेबांनी स्फूर्ती घेत आपला 'बीबी' म्हणजे 'बिग ब्रदर' कागदावर उतरवला. 

कुणी म्हणतं, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण घेऊन परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी कुणी एक बेनेट नामक गुरुजी क्‍लासेस चालवत असत. त्यांची होर्डिंगं ठिकठिकाणी दिसत. त्यावर लिहिलेलं असे ः 'लेट मी बी युअर फादर!' पुढं बेनेटगुरुजींचं निधन झालं. त्यांच्या मुलानं क्‍लासेस चालवायला घेतले. त्यानं जाहिरात केली ः लेट मी बी युअर बिग ब्रदर!'' ऑर्वेलसाहेबांना हे होर्डिंग बघूनही आपली व्यक्‍तिरेखा सुचली असेल, असं म्हणतात. काहीही असो, 'नाइन्टीन एटीफोर' प्रसिद्ध झाल्यानंतरच्या काळात 'बिग ब्रदर इज वॉचिंग यू' हा जणू जगभरातला मुहावराच झाला. जगभरात कुठंही अन्यायी, जुलमी राजवटी दिसली, की ही संज्ञा माध्यमांमध्ये डोकवायचीच. 'बिग ब्रदर' अस्तित्त्वात नव्हता; पण त्याची दहशत मात्र खरीखुरी होती. जॉन डे मॉलनं इंग्रजी अभिजातातला हा जडावाचा दागिना उचलला आणि त्याला बेगडाचं कोंदण देऊन बाजारात आणलं. या गुन्ह्यासाठी आधुनिक जगतानं त्याची झोळी करोडो डॉलर्सनं भरून दिली. 

आत्ता जो 'बिग ब्रदर' किंवा 'बिग बॉस' आपल्याला टीव्हीवर दिसतो, त्याचा त्या अभिजात वाङ्‌मयाशी सुतराम संबंध नाही, हे तर उघड आहे. किंबहुना, तो काडीमोड घेऊनच हा रिऍलिटी शो घराघरात शिरला आहे. आपल्याकडे त्याचं रूप 'बिग बॉस' म्हणून येतं. कारण उघड आहे. 'बिग ब्रदर' ही संकल्पनाच आपल्याकडे कोणाला ठाऊक नाही. नाही म्हणायला 'बिग बॉस' या नावाचा ब्रूस लीचा एक मारधाडपट आपल्याकडे बऱ्यापैकी धंदा करून गेला होता. 

या शोच्या निमित्तानं करोडो डॉलर्सची उलाढाल होते. ती मोजदादीपलीकडली आहे. कारण या महागड्या रिऍलिटी शोचे बहुतेक सगळेच व्यवहार गोपनीय असतात. स्पर्धकांच्या मानधनापासून ते स्वामित्वाखातर मिळणाऱ्या पैशांपर्यंत. आपल्या हिंदीतल्या 'बिग बॉस'चा सूत्रधार असलेल्या सलमान खानला एका हंगामासाठी शेकडो कोटी रुपये मिळतात, असं म्हणतात. भारतात सात भाषांमध्ये हा शो दिसतो. सध्या आपल्या मराठी 'बिग बॉस'चा दुसरा हंगाम सुरू आहे. त्यातही यथास्थित सवंगपणासहीत सर्व गुणदोष दिसू लागले आहेत. 'बिग ब्रदर' किंवा 'बिग बॉस' या रिऍलिटी शोचं हे एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. वादग्रस्तता हाच या कार्यक्रमाचा आत्मा आहे. 

'बिग बॉस'सारखे शोज हे विकृतीशी इमान राखून असतात. तिथं कलाकर्तृत्व, चांगुलपणा, भलाई, गुणवत्ता असल्या गोष्टींना थारा नाही. 'टॅलंट हण्ट'च्या निमित्तानं कुणी गाणं शिकायला प्रेरित होईल, कुणी नृत्याच्या क्‍लासला जाऊ शकेल. कुणी काही वाद्य शिकण्यासाठी धडपडेल; पण 'बिग बॉस'मुळे कोणालाही काही प्रेरणा मिळण्याची शक्‍यता नाही. तशी अपेक्षाच नव्हती आणि नाही. 

दहा-बारा स्पर्धक शंभर दिवस एका पॉश घरात कोंडायचे आणि दीडेकशे कॅमेरे लावून त्यांना अहर्निश टिपायचं. रोज रात्री त्यातला संपादित अंश दाखवून टीआरपीची गणितं मांडायची. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर काढायचा. त्यासाठी घरातल्या स्पर्धकांमध्ये ईर्ष्या सुरू होईल, असं खेळ मांडायचे. पब्लिकला व्होटिंग करायला भाग पाडायचं आणि उरलेल्या एकमेव स्पर्धकाला लाखालाखांची बक्षिसं द्यायची....असा हा शो. त्याला संहिता नाही, दिग्दर्शन नाही. व्यक्‍तिरेखाही जशा आहेत तशा. 

या फॉरमॅटमध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे आपण- पब्लिक! अमक्‍या स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी व्होटिंग करायचं किंवा वाचवायला, हे पब्लिकनंच ठरवायचं असतं. थोडक्‍यात तो हुकमतदार आवाजाचा धनी असलेला 'बिग बॉस', दुसरा तिसरा कोणीही नसून आपणच, याने की पब्लिक असतो. 

'बिग बॉस'च्या घरात होणाऱ्या अनेक गोष्टी पब्लिकमध्ये चर्चेत राहतात. सोशल मीडियावर तर त्याचं महामूर पीक असतं. कुठला स्पर्धक कसा वागेल, कसा बोलेल याचे आडाखे बांधले जातात. अमका कसा नतद्रष्ट आहे, आणि तमकी किती उर्मट आहे, असल्या प्रतिक्रिया उमटत राहतात. हे बघत असताना सर्वसामान्य प्रेक्षक आपोआप एकप्रकारे स्पर्धकांचं मानसिक आरोग्य तपासायला लागतो. त्यावर आपली मतं द्यायला लागतो. याला इंग्रजीत 'पॉप सायकॉलॉजी' असं म्हटलं जातं. हे शास्त्र शिकायला कुण्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज लागत नाही. 

'बिग ब्रदर' या अमेरिकेतल्या शोमध्ये तर काही वर्षांपूर्वी एका स्पर्धकानं स्वयंपाकाची सुरी दुसऱ्या एका स्त्री स्पर्धकाच्या गळ्यावर टेकवून अर्वाच्च भाषेत धमकी दिली होती. सीबीएस वाहिनीनं तो प्रसंग बेधडक दाखवला. पुढं प्रचंड गदारोळ उठून त्या स्पर्धकाला घराबाहेर काढावं लागलं. त्या 'बळी' ठरलेल्या स्त्री स्पर्धकानंही शो संपल्यावर शांतपणे सीबीएस वाहिनीला कोर्टात खेचून 'माझ्या जीवावर बेतूनही चॅनेलनं काहीही केलं नाही. त्यामुळे मला भयंकर मानसिक ताणाला सामोरं जावं लागलं. सबब मला काही दशलक्ष डॉलर्स नुकसानभरपाई मिळावी,' असा दावा ठोकला. कोर्टाबाहेर ही केस सेटलही झाली. काही वर्षांपूर्वी आपली भारतीय तारका शिल्पा शेट्‌टी ब्रिटनमधल्या 'बिग ब्रदर शो'ची स्पर्धक होती. तिला वर्णभेदी टोमणे सहन करावे लागले. तेव्हाही प्रचंड गदारोळ झाला. काही देशांमध्ये तर हा शो जवळपास अश्‍लीलतेकडेच झुकला. छुपे कॅमेरे लावल्यावर काय होणार? शिवराळ भाषा, धमक्‍या, विकृत चाळे हे सगळे प्रकार असल्या रिऍलिटी शोमध्ये गृहीत धरावेच लागतात. 

'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून' अशी आपली एक मराठी म्हण आहे. म्हण कसली सुविचारच तो. माणसाच्या स्वभावाची एक काळीकरडी छटा त्यात अचूक डोकावते. इंग्रजीत यालाच 'व्हॉयुरिझम' असं म्हणता येईल. दुसऱ्याच्या खासगी गोष्टीत नाक खुपसणं हा मनोरंजनाचा भाग असतो. कुणाच्या अध्यात ना मध्यात अशी माणसंही असतात जगात- नाही असं नाही; पण असला भोचकपणा नसेल तर जगण्याला काय अर्थय? हा आधुनिक विचार आहे. गॉसिप ही चीज माणसाला जगण्यासाठी प्रचंड उमेद देत असते. अगदी फारच कोरडं सत्य सांगायचं तर गॉसिप नसतं तर आपला मीडिया तरी कसा असता? माध्यमं जगली कशी असती? बातमी पवित्र असते हे खरं; पण हवीय कोणाला इथं पवित्र बातमी? त्या पावित्र्याबरोबरच भाराभर अपवित्र असं गॉसिप असेल तरच काहीतरी टिकाव लागतो. पण ते एक असो. इथं साधनशुचितेची चर्चा करण्याचं काही कारण नाही. 

गेले काही दिवस आपल्याकडे 'बिग बॉस'ची चर्चा आहे. 'बिग बॉस'चा मराठी अवतार आपल्याकडे प्रकट झाला, त्याचा आता दुसरा सीझन चालू आहे. सीझन...सीझनच म्हणायचं बरं का! काही लोक त्याला 'पर्व' किंवा 'महापर्व' असंही म्हणतात. परीक्षकांना 'महागुरू', 'महावस्ताद' वगैरे. दुय्यम तिय्यम कार्यक्रमांमध्ये थोडेफार झेंडे गाडले असले, की काम भागतं. 'महागुरू' बनून उंच पाठीच्या खुर्चीत जाऊन बसायचं. ही टिपिकल मनोरंजनाच्या दुनियेची आयडिया. 'बिग बॉस' शोमध्येही तसंच काहीसं आहे. स्पर्धकानं देदिप्यमान कर्तृत्व दाखवलेलं असलं पाहिजे अशी काही अट नाही. नैतिकता ढिली असली तरी चालेल. तुम्ही वादग्रस्तच असाल तर मोस्ट वेलकम. काहीही करा; पण वाद, भांडणं हे हवंच. तेच खरं 'कंटेट' आहे आणि 'कंटेट इज द किंग' हेदेखील आधुनिक जगाचं तुळईवरचं वाक्‍य आहे. 

आशय म्हणजेच कंटेट हा राजा असतो, हे मान्य केलं, तरी तो असा भिकार असावा ही पूर्वअट कुठली? लोकांना आवडेल ते द्या, तेच कंटेट...हा सरधोपट अविचार कशातून येतो? चार पैसे मिळावेत म्हणून गावातल्या चौकात किरकोळ जादूचे प्रयोग करणारासुध्दा आपलं कसब दाखवून जातो. त्याच्याकडे कंटेंट असतंच. 'बिग बॉस' सारख्या शोमध्ये जे काही घडतं, दिसतं, त्याला 'कंटेंट' का म्हणायचं? असे अनेक अनुत्तरित सवाल आहेत. 

मुळात 'रिऍलिटी शो' या संज्ञेतच केवढा तरी विरोधाभास आहे; पण तो लक्षात कोण घेतो? 'रिऍलिटी'मध्ये 'शो' नसतो, आणि 'शो'मध्ये रिऍलिटी नसते. वास्तव देखावा? संगीतावर आधारित अनेक 'रिऍलिटी शोज' होत असतात. त्यातले काही खरोखर विस्मयकारक कंटेट देतातही; पण संगीत, नृत्य आदी कलांनी सजलेले हे शोज संस्कृतीशी इमान राखून असतात. 'बिग बॉस'सारखे शोज हे विकृतीशी इमान राखून असतात. तिथं कलाकर्तृत्व, चांगुलपणा, भलाई, गुणवत्ता असल्या गोष्टींना थारा नाही. 'टॅलंट हण्ट'च्या निमित्तानं कुणी गाणं शिकायला प्रेरित होईल, कुणी नृत्याच्या क्‍लासला जाऊ शकेल. कुणी काही वाद्य शिकण्यासाठी धडपडेल; पण 'बिग बॉस'मुळे कोणालाही काही प्रेरणा मिळण्याची शक्‍यता नाही. तशी अपेक्षाच नव्हती आणि नाही. 

जॉर्ज ऑर्वेलच्या अभिजात साहित्यकृतीचं, आधुनिक मनोरंजनाच्या नावाखाली आपण किती लीलया पोतेरं करू शकतो, त्याचं हे एक ढळढळीत उदाहरण. ऑर्वेलसाहेबांचा 'बिग ब्रदर' एका घरापुरता मर्यादित करून त्याला टीव्ही मनोरंजनाच्या बाजारू धंद्यात ओढणं हे एखाद्या रसिकाला केविलवाणं वाटेलही. हे म्हणजे बालगंधर्वांच्या अतिगोड नाट्यपदांचं फ्युजन करण्यासारखं झालं. नव्या युगात त्याचीही मानसिक तयारी ठेवायला हवी. 'बिग बॉस' आदेश देत आहेत की अभिजाताकडे डोळेझाक करा...तसं तर तसं. आपल्या दोन कानांमधल्या काही घनचौरस सेंटिमीटर भागावर त्या बिग बॉसचं नियंत्रण नाही, एवढं भान ठेवलं तरी पुष्कळ आहे. 

'सप्तरंग'मधील सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Big Boss is becoming a TV culture writes Pravin Tokekar