अशी आली होती भारतावर आणीबाणी #ThisDayThatYear

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जून 2019

इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये आणीबाणी लागू केल्याच्या घटनेस ४४ वर्षं झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कशी असते, याचा अनुभव भारतीयांनी या दोन वर्षांत घेतला. आणीबाणी का लागू करण्यात आली आणि त्यामध्ये काय झाले, याचा धावता आढावा.

इंदिरा गांधी यांनी प्रत्यक्षात आणीबाणी पुकारली ती 25 जून 1975 रोजी; पण आणीबाणीची पार्श्‍वभूमी तशी 1971 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती.

1971 च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघ (आजचा भाजप) स्वतंत्र-समाजवादी आणि संघटना काँग्रेसने एकत्र येऊन 'बडी आघाडी' निर्माण केली होती. काँग्रेस पार भुईसपाट होणार आणि 'बडी आघाडी' घवघवीत यश मिळविणार, असेही चित्र तेव्हा विरोधकांनी रंगविले होते; पण निवडणुकीचे निकाल घोषित झाले आणि काँग्रेसने 518 पैकी 352 जागी घवघवीत यश मिळविले. तसेच बहुसंख्य विधानसभांतूनही काँग्रेस पक्षाची सरकारे आली. 

अरब-इस्रायल युद्धामुळे पेट्रोलियम तेलाच्या दरांत वाढ झाली होती. महागाई वाढली. बांगलादेशातील एक कोटी निर्वासित, शरण आलेले 90 हजार पाक सैनिक यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची जबाबदारी जिनिव्हा करारानुसार भारतावर येऊन पडली. हा खर्च वाढला. याच काळात देशात अभूतपूर्व दुष्काळ पडला. 

इंदिरा गांधींनी लोकसभेची निवडणूक जेव्हा जिंकली त्याच काळात पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगलाही बहुमत मिळाले होते; पण तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांनी मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगकडे सत्ता सुपूर्द करण्यास नकार दिला. पूर्व पाकिस्तानात तेव्हा असंतोषाचा भडका उडाला. हा उद्रेक दडपण्यासाठी भुत्तोंनी पूर्वेत लष्कर घुसविले. बंगाली जनतेवर अनन्वित अत्याचार केले. परिणामी एक कोटी निर्वासित भारतात आले. पाकिस्तानने भारतीय सीमेवरही आक्रमण केले. तेव्हा इंदिरा गांधी यांनी पाक पक्षपाती अमेरिकेची दादागिरी मोडून काढून पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले व याचवेळी बांगलादेश निर्माण झाला. दरम्यानच्या काळात अरब-इस्रायल युद्धामुळे पेट्रोलियम तेलाच्या दरांत वाढ झाली होती. महागाई वाढली. बांगलादेशातील एक कोटी निर्वासित, शरण आलेले 90 हजार पाक सैनिक यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची जबाबदारी जिनिव्हा करारानुसार भारतावर येऊन पडली. हा खर्च वाढला. याच काळात देशात अभूतपूर्व दुष्काळ पडला. 

याचवेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला. देशाच्या राजकीय कॅनव्हासवर अशा भयंकर विपरीत घटना एकीकडे घडत असतानाच दुसरीकडे 1973-74 मध्ये गुजरात आणि नंतर बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलने पेटली. या आंदोलनांना 'नवनिर्माण' असे नाव देण्यात आले. 1958 नंतर राजकारणसंन्यास घेतलेले जे.पी. याचवेळी आव्हानात्मक राजकारणात उतरले. दरम्यान, 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची 1971 ची निवडणूक रद्द केली. जे.पी. गरजले, ""सरकारशी संपूर्ण असहकार करा. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराओ घाला. लाठीमार होईल. गोळीबार होईल; पण हटू नका. पोलिसांनी व लष्करानेही सरकारचे आदेश पाळू नयेत.'' आणीबाणी येण्यास ही अशी अंतर्गत अराजकसदृश राजकीय स्थिती कारणीभूत होती. 

इंदिरा गांधींनी आणीबाणी सैल करून 1977 साली ज्या लोकसभेच्या निवडणुका घेतल्या, त्या निवडणुकांत इंदिरा गांधी आणि संजय गांधींचा काँग्रेस पक्ष पराभूत झाला. 

सरकारशी संपूर्ण असहकार करा. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराओ घाला. लाठीमार होईल. गोळीबार होईल; पण हटू नका. पोलिसांनी व लष्करानेही सरकारचे आदेश पाळू नयेत.

जेपींनी नवनिर्माणाचे आंदोलन करताना संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. जाती मोडण्याचे आवाहन केले होते. स्टंटबाजीच्या आहारी जाऊन काहींनी मग जानवीही तोडली होती; पण सत्तेवर येतना जनता पक्षाला जातीचे राजकारण काही सोडता आले नाही. बाबू जगजीवनरामसारख्या दलित नेत्याला पंतप्रधान करण्याची संधीही जनता पक्षाने घालविली. समाजवाद्यांनी जनसंघाच्या दुहेरी निष्ठेचा वाद उकरून काढला व आपल्याच कर्माने जनता सरकार मुदतीपूर्वीच कोसळले आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत दाखल झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Emergency was declared in India by Indira Gandhi in 1975