Gandhi Jayanti : गांधी अजूनही आहेत!

Gandhi Jayanti : गांधी अजूनही आहेत!

गांधींचा जन्म झाला, त्याला आता दीडशे वर्षे होत आली. ऑक्‍टोबर १८६९चा त्यांचा जन्म. ते जन्मले तेव्हा तिकडे युरोप-अमेरिकेत औद्योगिक क्रांती रुजली होती. सुवेझ कालव्याच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू होती. त्या कालव्यामुळे जागतिक व्यापार आणि त्यातून जगाचा नकाशा बदलणार होता. युरोपात कारखानदारीने कामगारांचे, भांडवलाचे नवे प्रश्न निर्माण केले होते. त्याचा शास्त्रशुद्ध विचार करणाऱ्या दास कॅपिटलचा पहिला खंड कार्ल मार्क्‍स यांनी दोन वर्षांआधी प्रसिद्ध केला होता. अमेरिकेत महिलांना मताधिकाराची चळवळ जोर धरू लागली होती... आणि हिंदुस्थानात १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाची धामधूम आटोपून बारा वर्षे उलटली होती. या देशावर आता राणीची सत्ता होती...

आज दीडशे वर्षांनी तेव्हाचे ते जग अक्षरशः उलटेपालटे झाले आहे. तेव्हाच्या वसाहतवादी साम्राज्यवादाने आज आर्थिक आणि सांस्कृतिक साम्राज्यवादाचे रूप धारण केले आहे. औद्योगिक क्रांतीची लाट तर केव्हाच ओसरली. त्या लाटेतून जन्माला आलेल्या वा तिने जोजविलेल्या साम्यवाद, उदारमतवाद अशा विचारप्रणालींना उतरती कळा लागली आहे. दुसऱ्या महायुद्धाने जग शहाणे झाले असेल असे वाटले होते. परंतु तसे झालेले नाही. तेव्हाचा राष्ट्रवाद आज अधिक भयकारी झालेला आहे. आर्थिक संरक्षणवाद आणि त्याच्या हातात हात घालून चाललेला नवराष्ट्रवाद साम्यवादी आंतरराष्ट्रीयवादाच्याच काय, परंतु जुन्या भांडवलवादाच्याही विरोधात उभा राहिलेला आहे. तेव्हाचा तो भांडवलवादही आज बदलला आहे. मार्क्‍ससमोर असलेला भांडवलशाहीचा क्रूर चेहरा आज बऱ्यापैकी मवाळ झालेला आहे. कल्याणकारी लोकशाहीचा हात धरून चालल्याचे नाटक का होईना, तो करीत आहे. आजचे हे जग माहिती-तंत्रज्ञान क्रांतीचे आहे. काळ प्रचंड बदलला आहे आणि या काळातही, दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला हा गांधी नावाचा महात्मा तितकाच कालसुसंगत ठरतो आहे. त्यामागचे गौडबंगाल समजून घेतले पाहिजे.

आपण हे लक्षातच घेत नाही, की गांधी हे हिंदू धर्माचे अपत्य होते, कृषिसंस्कृतीचा मूल्यविचार घेऊन ते चाललेले होते, तरी त्याचा सांधा औद्योगिकीकरणाच्या लाटेतील नितीमूल्यांशी जुळलेला होता. त्यांची धार्मिक सहिष्णुता जितकी हिंदू धर्मातून उगवलेली होती, तितकीच ती पाश्‍चात्य उदारमतवादाशीही नाते सांगणारी होती. यातून अनेकदा त्यांच्या व्यक्तित्वातील सुसंगतता धूसर होताना दिसते. मग प्रश्न पडतो, की चातुर्वण्य व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे गांधी दलितांच्या प्रश्नांना राष्ट्रीय चळवळीच्या केंद्रस्थानी कसे काय आणू शकतात? ब्रह्मचर्य या संकल्पनेत इंद्रियदमन जसे येते, तसाच स्त्री ही मोक्षमार्गातील धोंड हा विचारही येतो. गांधींनी एकीकडे हे ब्रह्मचर्याचे प्रयोग मनोनिग्रह व्रताच्या पातळीवर नेले. स्वपत्नीशीही अपत्यप्राप्तीपरता लैंगिक व्यवहार त्याज्य मानला आणि त्याच वेळी त्यांनी स्त्रीचा माणूस म्हणून सन्मानही केला. अगदी स्वातंत्र्यलढ्याशी जोडले त्यांना. म्हटले तर यात अंतर्विरोध आहे. परंतु तीच तर हिंदू धर्माची खासियत आहे. त्याची सर्वसमावेशकता, सहिष्णुता, विश्वात्मके देवे म्हणण्याची व्यापक दृष्टी याचे मूर्त स्वरूप म्हणजे गांधी होते.

ज्यांना हिंदू धर्माची ही तत्वेच समजली नाहीत किंवा ती ज्यांच्या सत्ताकारणाच्या आड येतात, त्यांनी गांधींना या मुद्द्यावर हसावे, त्यांची टवाळी करावी, यात काहीही विशेष नाही. ते ती करीतच आहेत. अवघे व्हॉट्‌सॲप विद्यापीठ त्या कामी जुंपलेले आहे. समाजमाध्यमांतून यथेच्छ निंदानालस्ती केली जात आहे. गांधी सत्याचे पुजारी होते. त्यांच्या विरोधात असलेले सत्याची कास कशी धरू शकतील? त्यामुळे गांधींचे ब्रह्मचर्याचे प्रयोग, त्यांची साधी राहणी याबाबत गलिच्छ अफवा पसरवणे हेच त्यांच्या कुजबूज आघाड्या करू शकतात. आज त्या अधिक खुलेपणाने करीत आहेत, त्यांचा आवाजही मोठा आहे एवढेच. पण आवाज मोठा आहे म्हणून गांधीद्वेष्ट्यांमागे समाज मोठा आहे असे नाही. या देशात गांधींचा द्वेष करणारी मंडळी नेहमीच अल्पसंख्य राहिलेली आहेत. येथील बहुसंख्य जनता ही सातत्याने गांधीविचारांच्या बाजूची आहे. कारण हा विचार त्यांच्या धर्म आणि संस्कृतीतूनच उगवलेला आहे. आज गांधीवाद म्हटले की समोर येतात ते सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य यांसारखे व्रतविचार. पण मुळात गांधीजींनी हे सर्व विचार हिंदू धर्मातूनच घेतलेले आहेत. ते धर्माचा भाग आहेत. या विचारांचा गांधीजींनी अतिरेक केला असा आरोप करण्यात येतो. खराच आहे तो. पण हेही खरे आहे, की ज्या देशात लैंगिकतेबाबत प्रचंड ढोंगबाजी असते, तेथे ब्रह्मचर्याचे प्रयोग हे अतिरेकीच वाटणार. कट्ट्यावरच्या गप्पांत त्यावरचे असभ्य विनोदच सांगितले जाणार. जेथे पौरुषत्वाच्या कल्पना या हिंसकतेशी जोडलेल्या असतात, तेथे अहिंसा हा पुळचटपणाच वाटणार. त्याबाबत कोणाला दोष देणार? दोष आहे तो धर्मकल्पनांबाबतच्या आपल्या अडाणीपणाचा. एकीकडे आपण धार्मिक आहोत असे म्हणायचे आणि त्याचवेळी त्या धर्मातून आलेल्या विचारांची टवाळी करायची ही अतिरेकी विकृती आहे हे लक्षात घ्यायला हवे. गांधीच्या संदर्भातील टीकाकारांची ही दांभिकता अगदी फाळणीच्या वा त्यांच्या तथाकथित मुस्लिम अनुनयाच्या मुद्द्यापर्यंत येते. साधी गोष्ट आहे.

गांधी हे वैष्णव हिंदू. ते ज्या संघटनेचे नेते होते त्या काँग्रेसमध्ये बहुसंख्य हिंदू होते. ती तेव्हाही आणि आजही बहुसंख्य हिंदूंची संघटना आहे. याच कारणाने मुस्लिम लीगचे नेते गांधींना हिंदूंचे नेते म्हणत. दुसरीकडे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत, ते गांधींना मुस्लिमधार्जिणे म्हणत. प्रा. नरहर कुरुंदकरांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलेय, की गांधी तोंडाने काहीही बोलत असूदेत, परंतु लोकमान्य टिळकांनी लखनौ करारात बॅ. जिनांना जे दिले त्या पुढे एक पाऊलही गांधींनी टाकलेले नाही. याचा अर्थ गांधी हे मुस्लिमांची फसवणूक करीत होते असा नाही. तर त्याचा अर्थ हा आहे, की ते जसे संत होते, तसेच राजकारणीही होते. द्विराष्ट्रवादाला त्यांचा विरोध होता. आणि अखंड हिंदुस्थानची स्वप्ने रंगविणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा मात्र त्या सिद्धांताला पाठिंबा होता. त्याचा आधार हिंदुराष्ट्राच्या मागणीला दिला जात होता. यातून आपण देशाची फाळणी मागत आहोत हे त्यांना तेव्हाही समजले नव्हते आणि आजही कळलेले नाही. परिणामी हे लोक या देशातील बहुसंख्य हिंदूंचे प्रतिनिधी कधीच बनू शकले नाहीत. ते बनता यावे यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. पण तेथे आडवे येतात गांधीच. त्यावर उपाय म्हणजे गांधींना त्यांच्या स्वच्छतेसारख्या निवडक विचारांपुरतेच मर्यादित ठेवून त्यांचे बाकीचे विचार विस्मृतीत ढकलणे. पण हे अवघड आहे.

याचे कारण गांधींशी अनेक बाबतीत मतभेद नोंदवूनही तेच या काळात आधारभूत ठरू शकतात याची जाणीव येथील हवेत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या संकल्पना यांच्यायोगे आजची लोकशाहीसुद्धा दमनशाहीशी नाते सांगू लागली आहे. नव्या भांडवलशाहीची, अजस्त्र बहुराष्ट्रीय कंपन्यांची प्रतिनिधी म्हणून ती काम करताना दिसत आहे. दिवसेंदिवस भयावह पद्धतीने सत्तेचे आणि संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. त्याचा सामना करण्याची ताकद ही आज तरी गांधीविचारांतच दिसत आहे. किंबहुना विविध पातळ्यांवर तो संघर्ष सुरूही आहे...

कधी कुठेतरी समाजमाध्यमांतून सत्याग्रहाची हाक दिली जाते आणि मदांध तख्त पाहता-पाहता कोसळते. कोणी संगणकाच्या साह्याने अहिंसक लढाई लढत सत्याला वाचा फोडते आणि सरकारी ‘बिग ब्रदर’ना सरळ करते. कुठे अमेरिकेत एखादा कृष्णवर्णीय खेळाडू राष्ट्रगीत सुरू असताना खाली एका गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाच्या विरोधात आपला निषेध नोंदवितो आणि पाहता पाहता त्यातून एक आंदोलन उभे राहते. असे काही सुरूच आहे. संपविण्याचे अनेक प्रयत्न होऊनही गांधी अजूनही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com