

प्रशांत कोतकर, saptrang@esakal.com
सिन्नर शहरात नगरपालिकेची स्थापना १८६० मध्ये झाली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेले शहर हे पूर्व बिडी कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असे. त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. शहरातील नामवंत अशा वाजे घराण्यातील बालाजी गणपत वाजे यांना फी नसल्याने शाळेतून काढून टाकले. आपल्याजवळ फी भरण्यासाठी पैसे नसल्याची खंत मनात बोचत असल्याने बालाजी रावांनी शहर सोडून फिरत फिरत भिवंडी शहर गाठले. त्या ठिकाणी त्यांच्या नजरेस बिडी व्यवसाय दिसून आला. त्यांनी त्या ठिकाणी बिडी व्यवसायाचे धडे घेतले. व्यवसायाचे धडे घेतल्यानंतर गावात परतले. गावात बिडी व्यवसायाची मुहूर्तमेढ केली.
व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल इतर प्रांतातून आणला. शिवाजी, शिलेदार अशा नावाखाली बिडीचा ब्रॅण्ड बाजारात आणला. गावातील व्यक्तींना बिडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. सुरवातीला एकाच ठिकाणी सुरू झालेल्या व्यवसायाने आपली पाळेमुळे रोवली. या व्यवसायामुळे गावात सामाजिक एकोपा जपला जाऊ लागला. वाजे यांच्या सोबतच काही दिवसातच चांडक परिवाराचा कोंबडा, सारडा परिवाराचा कॅमल, चोथवे परिवाराचा गाय छाप, भिकुसा बिडी असे विविध ब्रँण्ड जिल्ह्यातच नव्हे देशभरात नावारूपास आले.
१९७२ साली आलेल्या दुष्काळाने गावाची लयच बिघडवली. आजही या दुष्काळाच्या झळांची चिन्हे गावात दिसतात. शहराचा पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिम व्यवस्थित आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कामगार कायदा, गुटखा बंदी, कच्च्या मालाचा वाढलेला भाव अन्य कारणाने बिडी व्यवसायाला घरघर लागली अन् बेरोजगारी वाढली.