मुलांशी सायबर-संवाद साधायचा कसा?

डिजिटल-पालकत्वाच्या प्रवासात मुलांशी डिजिटल-स्पेसबद्दल संवाद कसा साधला पाहिजे याविषयी अनेकदा पालकांचाच गोंधळ उडालेला असतो.
cyber communicate with children
cyber communicate with childrensakal

- मुक्‍ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

डिजिटल-पालकत्वाच्या प्रवासात मुलांशी डिजिटल-स्पेसबद्दल संवाद कसा साधला पाहिजे याविषयी अनेकदा पालकांचाच गोंधळ उडालेला असतो. असा संवाद आवश्यक आहे हेच मुळात अनेकांच्या लक्षात येत नाही. ‘मुलांना आमच्यापेक्षा ऑनलाईनबद्दल जास्त कळतं,’ या विचारात काही पालक अडकलेले असतात.

‘त्यांना आम्ही काय सांगणार,’ असंही त्यांना वाटत असतं; पण जगण्याचा आणि जगण्यातल्या खाचखळग्यांचा अनुभव अर्थातच पालकांना मुलांपेक्षा जास्त असतो. जगण्याच्या या शहाणपणातून आपण काही ना काही शिकत असतो हे विसरू नये. सायबर-पालकत्व हेही संवादावर अवलंबून आहे आणि हा संवाद जितक्या लवकर सुरू होईल तितकं उत्तम.

अनेकदा पालक संवाद सुरू करतात मूल टीनएजर झाल्यावर; पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. त्या वयात मुलं संवादासाठी मोकळी असतील असं नाही. काही पालकांचा संवाद हा फक्त शाळा, अभ्यास, मार्क, क्लासेस...इतकाच मर्यादित असतो. मूल जन्माला आल्यापासून ज्या त्या वयात, वयानुरूप संवाद आवश्यक असतो.

सायबर-पालकत्वालाही हेच लागू होतं. मुलांच्या हातात फोन जाण्याआधी संवाद सुरू झाला पाहिजे; पण समजा, तुम्ही तसं केलेलं नाही, तरीही उशीर झालेला नाही.

पुढं दिलेल्या काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्यात :

स्वतःपासून सुरुवात

मुलांनी डिजिटल-स्पेस शहाणपणानं वापरावी असं वाटत असेल तर मोठ्यांच्या वर्तनात ते शहाणपण दिसणं आवश्यक आहे. मुलांना सांगायचं ‘फोन बाजूला ठेवा’ आणि आई-बाबा सतत फोनमध्ये गुंतलेले हे चित्र फारसं शहाणपणाचं नाही. तीच गोष्ट आजी-आजोबांच्या बाबतीत. माझ्या कामाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा लहान मुलांशी संवाद होतो तेव्हा तेव्हा ते आजी आणि आजोबा सतत व्हाट्सॲपमध्ये किंवा यूट्यूब बघण्यात गुंतलेले असतात. या बाबीची नोंद मुलं घेत असतात. त्यामुळे स्वतःचं उदाहरण तयार करणं आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूचे मोठे लोक फोनमध्ये गुंतलेले असले तरी इतरही गोष्टी करत असतात हे मुलांना दिसलं पाहिजे.

उदाहरणार्थ : पुस्तकवाचन, बागकाम, व्यायाम, प्रत्यक्ष भेटीगाठी... इत्यादी. मुलांना हे दिसणं-जाणवणं आवश्यक आहे.

पालक आणि आजूबाजूचे मोठे दोन्हीकडं - ऑनलाईन आणि ऑफलाईन जगात - वावरत असतात आणि त्याचा समतोल साधत असतात हे आपोआप मुलांपर्यंत पोहोचतं. आणि, मुलं तुमच्या आजूबाजूला असताना या गोष्टी घडल्या पाहिजेत. मुलं शाळेत गेल्यावर आई किंवा बाबा पुस्तक वाचत असतील आणि मुलं सोबत असताना मोबाईल वापरत असतील तर मुलांपर्यंत तेच पोहोचेल, जे मुलं बघतील.

स्क्रीनशिवायची जागा आणि वेळ

घरात ‘नो स्क्रीन जागा आणि वेळा’ तयार करा. घरात असे प्रसंग सुनिश्चित करा, जेव्हा कुणीही फोन वापरायचा नाही. अशा वेळा ठरवा, जेव्हा फोन बाजूला ठेवला जाईल.

उदाहरणार्थ : झोपताना फोन बंद...बाथरूममध्ये फोन न्यायचा नाही...जेवताना फोन बाजूला ठेवायचा...अभ्यासाच्या वेळी फोन नको. हे करत असताना घरातल्या सगळ्यांना समान नियम अपेक्षित आहे. जेवताना मुलांनी फोन बाजूला ठेवायचे; पण ऑफिस-मेसेजच्या नावाखाली आई-बाबा फोन बघत जेवणार, असं चालणार नाही. किंवा, झोपताना मुलांचे फोन काढून घ्यायचे; पण आई-बाबा सीरिअल बघत झोपणार, हे जमायचं नाही. मुलं पालकांच्या सवयी उचलतात हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.

सहज-सजग डिजिटल-संवाद

डिजिटल-स्पेसमध्ये तुम्ही काय करता त्याविषयी मुलांशी बोला. एखादी बातमी वाचली, चांगली वेब-सीरिअल बघितली, कुणाबाबत काही सायबर-गुन्हा घडल्याचं कानावर आलं तर त्या गोष्टी मुलांशी ‘शेअर’ करा. हे शेअरिंग जितकं जास्त होईल तितकी मुलं सायबर-सजग व्हायला मदत होते. आणि, पालकांनी त्यांच्या जगातल्या गोष्टी मुलांना सांगितल्या की, मुलंही आपोआप त्यांच्या जगातल्या गोष्टी पालकांना सांगतात.

आपलं मूल सायबरच्या जगात सुरक्षित आहे की नाही हे समजून घेण्यासाठी हा संवाद अतिशय उपयोगी पडतो. आणि, हा संवाद असं समोर बसवून होत नाही. सोशल मीडियावर, गेमिंग करतानाचे मोठ्यांचे अनुभव मुलांना समजणं आवश्यक असतं. त्यातूनच मुलं शिकत जातात आणि सजगही होतात.

विश्वासाचं नातं

सायबरचं जग जितकं सुरेख आहे, उपयोगी आहे, आकर्षक आहे तितकंच ते धोकादायकही आहे. आपली मुलं त्या जगात सुरक्षित राहावीत यासाठी मुलांचा पालकांवर दृढ विश्वास हवा. आपण पालक आहोत म्हणून तो विश्वास असेलच असं नसतं. मुलांच्या मनात तो निर्माण करावा लागतो. मुलं चुकली, कशात फसली, कुणी त्यांना त्रास दिला तरी पालक आपल्याबरोबर आहेत, मदतीला उपलब्ध आहेत हे मुलांना माहीत असणं आवश्यक आहे.

हा दिलासा मुलांसाठी फार महत्त्वाचा असतो. सायबर-बुली होणारी बरीच मुलं घरात वेळेवर गोष्टी सांगत नाहीत आणि घटना हाताबाहेर जातात. त्यामुळे ‘आभासी आणि प्रत्यक्ष जगातसुद्धा काहीही समस्या आली, त्रास झाला तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत’ हा विश्वास पालकांनी मुलांच्या मनात निर्माण करायला हवा आणि ‘जजमेंटल’ न होता निर्माण करायला हवा.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com