लागलीसे भूक...

जयकिशन त्या दिवशी, म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी म्हणाले होते : ‘ये उन की इनायत ये उन का करिष्मा नही तो कहाँ मैं और कहाँ मेरे नगमें?’
Lata Mangeshkar
Lata Mangeshkarsakal

- हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com

जयकिशन त्या दिवशी, म्हणजे,

अनेक वर्षांपूर्वी म्हणाले होते :

‘ये उन की इनायत

ये उन का करिष्मा

नही तो कहाँ मैं

और कहाँ मेरे नगमें?’

या वाक्यातला ‘करिष्मा’हा

शब्द फार महत्त्वाचा आहे.

याला मराठीत दुसरा शब्दच नाही.

भाषातज्ज्ञ अनेक शब्द

या शब्दासाठी देतील;

पण ‘करिष्मा’ याचा गर्भितगंध ते देऊ शकणार नाहीत.

दीदी एक करिष्मा होती.

दीदी! तुला माहीत आहे?

माहीत असणारच म्हणा!

बाबांनी तुझं नाव ‘हृदया’ ठेवलं होतं.

बाबा किती द्रष्टे होते!!

या नावात, बाबांनी फार मोठं भविष्य मांडून ठेवलं होतं.

विश्वातल्या समस्त

सहृदय माणसांच्या हृदयातली

तू स्वरहृदया होणार.

जिथं जिथं जखमी हृदय असेल

तिथं तिथं तू अश्रुहृदया होणार.

जिथं जिथं आनंद-उत्सव होईल

तिथं तिथं तू आनंदहृदया होणार.

जिथं जिथं ज्ञानप्रज्ञेचं पूजन होणार

तिथं तिथं तू आशस्थ हृदयावास होणार.

जिथं जिथं मंगलपूजन होईल

तिथं तिथं तू गानहृदया असणार.

जिथं जिथं स्वातंत्र्यदेवतेचे घोष दुमदुमतील

तिथं तिथं तू जयोस्तुतेहृदया होशील.

सर्व रसांची तू गान-शब्दहृदया होशील.

मग बाबांनी तुझं नाव ‘लता’ असं ठेवलं

तेही सार्थ असंच होतं.

कल्पतरू या फळा-फुलांनी

लदबदलेली तू गानलता.

चेतनाचिंतामणींच्या गावा

वसणारी तू हृदयलता.

तू अमृताचं आरव, म्हणजे समुद्र, म्हणजे स्वरमहासागर.

तुझे आलाप, स्वरमूर्छा

तुझ्या हरकती, मुरक्या, सपाट ताना

हे या महासागरावरचे तरंग.

तुझा ‘आरोह’ म्हणजे भरतीची लाट,

तुझा अवरोह म्हणजे

षड्जावरून कोसळणारी स्वरांची ओहोटी.

तुझ्या जीवनाभूतीचा आकांत म्हणजे

या महासागरावर उठणारे प्रलयंकारी वादळी वारे.

तुझा जीवनाक्रोश म्हणजे

या प्रलयंकारी लाटा.

आणि, तुझी क्षमा म्हणजे

शांत-सदय सागर.

या सागराची खोली म्हणजे

तुझ्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची ईशवाणी.

आणि, या स्वरमहासागराचा

किनारा...तुझा स्वरसंयम.

या किनाऱ्यावर

माझ्यासारखे क्षुद्र जीव उभे राहून

फक्त या महासागराच्या

खोलीचं वर्णन करतात.

दीदी, तू किती महान होतीस,

किती मोठी होतीस

पण मला याचं कौतुक नाही.

तू फक्त आणि फक्त माझी दीदी होतीस!

हेच माझं आर्त आहे.

माझ्यावर आईपेक्षा, नव्हे,

दयाघनापेक्षा अधिक माया करणारी

तू फक्त माझी दीदी होतीस.

तुला माझी किती काळजी?

ईश्वर असला तर, तोही

जीवितांची इतकी काळजी घेणार नाही.

अरे! हा कसला सुगंध?

तू दिलेल्या अनेक सुगंधी

अत्तरांची कुपी तर फुटली नाही ना?

नाही, दीदी!

अत्तरातल्या सुगंधाप्रमाणे तू विरून गेलीस

मला रिकाम्या कुपी मोजण्यासाठी सोडून

दीदी, जगातल्या कुठल्याही शहरात

तुला सेंटची बाटली दिसली की

तुला फक्त माझी आठवण यायची.

दीदी! सेंटच्या खूप बाटल्या साठल्या आहेत...

पण सुगंध कुठं आहे?

त्या सुगंधी कुप्या देणारे

ते अत्यंत नाजूक हात

कुठं आहेत?

ते क्षणाक्षणाला मला सांभाळणारे

नाजूक, सदय; पण भक्कम हात कुठं आहेत?

माझा हात अर्ध्यात सोडून गेलीस...

मी आता कुणाचा हात धरू?

तो नाजूक आधारस्थ हस्त कुठाय?

मी गावा जायला निघालो की

तुझी अवस्था दयनीय व्हायची

म्या पामराला तुझी ती काळजी कधी कळलीच नाही.

मोटारीत तुझे फोन यायचे

‘कुठं पोहोचलास?’

‘पनवेलला’ मी सांगायचो.

थोड्या वेळानं पुन्हा फोन यायचा

‘घाटामध्ये आहेस? खरं सांग’

‘नाही दीदी...खंडाळा घाट

केव्हाच उतरलो...

एक तासात पुण्याला पोहोचेन’

मी खोटं बोलायचो.

घाटात ट्रक्सची गर्दी असायची.

कधीही अपघात होईल असं

वातावरण असायचं

परत फोन वाजायचा.

मी कंटाळून फोन घेतच नसे.

दीदी, तू गेलीस!

आता मी फोनची वाट पाहतो...

कुणी फोन करत नाही

सारा प्रवास शांतपणे होतो.

दीदी! ती शांतता

माझा जीव घाबरा करते.

आता फोन वाजणार नाही.

‘तू घाटात आहेस का?’

हे आता कुणीही काळजीनं विचारणार नाही.

फार असहाय्य झालोय मी.

‘जखमों से भरा है

किसी मजबूर का सीना

बेकस पे करम कीजिये

सरकारे मदिना’

या जखमेची टीस आता कळतेय.

‘मजबूर’ म्हणजे काय, हे आता कळतंय.

‘बेकस’चा अर्थ तर आता

माझा जीव कासावीस करतो.

अशक्त दीदी

काळजीनं माझ्यासाठी

खायला घेऊन यायची.

पक्षिणी कशी घरट्याकडं झेप घेते

आणि

भुकेल्या पिल्लांना घास भरवते,

तशी दीदी कुठूनही येऊन

माझ्या भुकेल्या तोंडी घास भरवायची.

एकदा मी खानदेशहून मुंबईत आलो.

दोन दिवस फक्त पाणी पिऊन काढले होते.

वय फक्त सात.

दुखरा पाय

सारा आनंदच!

संध्याकाळी मात्र जीव कंठाशी आला.

रस्त्यावर अनेक ठेले

चटपटीत पदार्थ विकत होते.

फक्त डोळ्यांनी अन्नाची चव घ्यायची.

फार अवघड!

‘तुका म्हणे मज

लागलीसे भूक’

या ओळींचा आध्यात्मिक अर्थ

काही वेगळा असेल...

पण मला तो

माझ्या लौकिक भुकेशी

जोडावासा वाटतो.

कारण, मी उपाशी होतो.

एवढ्यात एक बग्गी (घोडागाडी) थांबली आणि

दीदी तीमधून उतरली.

सावळी...अशक्त...तोंडावर देवीचे व्रण...

पांढरी, सुती साडी नेसलेली दीदी आली.

बऱ्याच वर्षांनी मी तिला पाहत होतो.

ओळखलंच नाही.

दीदी सरळ माझ्याकडं आली.

माझ्या डोक्यावरून हात फिरवला.

पिशवीतून एक बटाटावडा काढला.

आणि, काहीही न बोलता

माझ्या तोंडी तो घास भरवला.

दोन-अडीच दिवसांच्या भुकेल्या तोंडी

तो घास अमृताहीपेक्षा महत्त्वाचा होता.

भुकेची व्याख्या, तृप्तीची व्याख्या

एका क्षणात कळली, कायमची.

आणि, संत तुकाराममहाराजही कळले.

दीदी! फार भूक लागली आहे...

कुठं आहेस?

‘तुका म्हणे मज लागलीसे भूक...’

दीदी...कळले; मला संत तुकाराममहाराज कळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com