

Hridaynath Mangeshkar Memories
esakal
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आपल्या बहिणींपैकी लता आणि आशा यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लतादीदींनी रक्षाबंधनाच्या दिवशी आईला धीराने जो सल्ला दिला, तो आशाताईंनी अमलात आणला. लतादीदींच्या पुढाकारातून व माईंच्या आज्ञेवरून तो दिवस मंगेशकरांच्या आयुष्यात वेगळाच ठरला. त्याच दिवसाबद्दल सांगत आहेत, स्वतः पंडितजी...
आईने मला एका पाटावर बसविले होते,
समोर एक चांदीचे जड ताट होते.
(जे बाबांच्या श्राद्धाला गुजरीत विकले
जाणार होते.)
ताटामध्ये भगव्या रंगाच्या राख्या ठेवल्या
होत्या. हळद, कुंकू, तांदूळ, दोन मुटके
ठेवले होते.
माझ्या अंगातला ताप उतरला असावा,
कारण सर्व काही स्पष्ट जाणवत होते.
‘‘थोरली (लता) ! तू पहिली राखी बांध.
कारण तू सर्वांत थोरली. पहिला मान तुझा,
बाळ! लताने राखी बांधली की हा रुपया
तिला दे आणि पाया पड, समजलं ?’’
आईने करड्या आवाजात आज्ञा केली.
मग दीदीने मला हळदकुंकू लावून
ओवाळले. दोन मुटके माझ्या भोवती
फिरवले. राखी बांधली, काहीतरी पुटपुटली,
कंदी पेढ्याचा लहानसा तुकडा मला भरवला
आणि डोळे बंद करून, काहीतरी पुटपुटत
माझ्या डोक्यावर हात ठेवला.