

human body vitality
esakal
आहाहा!
वस्तू म्हणजे आकार, घाट. शरीर वस्तू आहे. शरीराला आकार, घाट असतो. निर्जीव वस्तूची वस्तुमयता आतून-बाहेरून एकच असते.
सजीव वस्तूची वस्तुमयता बाहेरून वेगळी, आतून वेगळी. निर्जीव वस्तू निसर्गातल्या घटनांना जवळ करत नाही, की विरोध करत नाही. सजीव वस्तू.. शरीर.. निसर्गातल्या घटनांना जवळ करते किंवा विरोध करते.
आपण पृथ्वीवरच्या व्यक्तीच्या शरीरावर ध्यान द्यायचे.
सर्व सजीवांच्या शरीरात आणि व्यक्तीच्या शरीरात महत्त्वाचा फरक म्हणजे व्यक्तीच्या शरीराला हात असतात.
मानव दोन पायांवर उभा राहिला. मानवाला उंची हे परिमाण प्राप्त झाले. चार पाय असतात, तेव्हा उंची हे परिमाण दुय्यम असते. लांबी हे परिमाण महत्त्वाचे असते. सिंह उंच... असे आपण म्हणत नाही. लांबडा म्हणतो. म्हैस लांबडी. हत्ती मानवापेक्षा उंच, तरी लांबीच जास्त.
पक्ष्यांना हात नसतात, पंख असतात, दोन पाय असतात. दोन बारक्या पायांवर त्या मानाने मोठे शरीर पेलले जाते. आश्चर्य! पक्षी दोन पायांवर उभे राहतात किंवा चालतात, तरी पक्ष्यांचा लांबडेपणाच त्यांच्या उंचीपेक्षा जास्त असतो.
मानवाला हात प्राप्त झाले. डोळ्यांना पाहाणं हे आपोआप काम. कानांना ऐकणे हे आपोआप काम. नाकाला श्वासोच्छ्वास, वास ही आपोआप कामे. तोंडाला खाणे, आवाज करणे आपोआप कामे. छातीला, पोटाला बाह्य कामे नाहीत. पायाला चालणे, पळणे, नाचणे आपोआप कामे. कामेंद्रियांना, मलमूत्र विसर्जन... आपोआप काम.