...परी ग्रंथसंग्रहरूपे उरावे!

‘माणूस कुणाच्या सहवासात असतो यावरून जसा ओळखला जातो, तसाच तो कोणती पुस्तकं वाचतो यावरूनही ओळखला जातो’ असं लेखक-विचारवंत राल्फ वाल्डो इमर्सनचं वचन आहे.
charles darwin
charles darwinsakal

‘माणूस कुणाच्या सहवासात असतो यावरून जसा ओळखला जातो, तसाच तो कोणती पुस्तकं वाचतो यावरूनही ओळखला जातो’ असं लेखक-विचारवंत राल्फ वाल्डो इमर्सनचं वचन आहे.

हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे, उत्क्रांतिवादाचा जनक मानला गेलेला चार्ल्स डार्विन याचा ग्रंथसंग्रह! अनेक ठिकाणी विखुरलेला ग्रंथसंग्रह आता एकत्र करण्यात आल्यानंतर डार्विनच्या व्यक्तिमत्त्वाची नव्यानं ओळख अभ्यासकांना करून घेता येईल यात शंका नाही.

डार्विनच्या २१५ व्या जन्मदिनाचं औचित्य साधून ‘डार्विन ऑनलाइन’ (https://darwin-online.org.uk/) या संकेस्थळावर या महान संशोधकाच्या वैयक्तिक ग्रंथालयातली पुस्तकं, शोधनिबंध, वृत्तपत्रीय कात्रणं आणि विविध पत्रकं यांची सर्वंकष सूची नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादीच तीनशे पृष्ठांची आहे आणि तीत साडेसात हजार ग्रंथांचा समावेश आहे. डार्विनचा हा ग्रंथसंग्रह आता सर्वांना एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.

त्यासाठी जवळपास ९३०० लिंक्स पुरवण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प पूर्णत्वास नेणं सोपं नव्हतं. मात्र, केम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट झालेले आणि सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील विज्ञानेतिहासाचे संशोधक-अभ्यासक जॉन व्हॅन वायहे यांच्या नेतृत्वात तो नुकताच पूर्ण झाला. गेली अठरा वर्षं यावर काम सुरू होतं, त्यावरून याला किती सायास पडले असतील याची कल्पना येऊ शकेल.

हे सगळं करण्यामागचा हेतू काय, असा प्रश्न पडू शकेल. डार्विनचं वाचन अफाट होतं हे सर्वश्रुत आहे. तथापि, त्याच्या निधनानंतर त्याच्या संग्रहातले काहीच ग्रंथ शिल्लक राहिले. काही मोठ्या प्रमाणावर गहाळ झाले किंवा अन्यत्र हलवले गेले.

स्वतः डार्विननं आपल्या संग्रहातल्या ग्रंथांची ४२६ पानी सूची करून ठेवलेली होती; पण तीत अनेक नोंदी मोघमही होत्या. या सूचीचा आधार असला तरी हरवलेल्या ग्रंथांचा नेमका माग तीवरून काढायचा हे आव्हान होतं. डार्विनच्या संग्रहातले एक हजार ४८० ग्रंथ जतन करण्यात आले होते.

डार्विनचा तोच काय तो ग्रंथसंग्रह अशी समजूत होती; पण डार्विननं आपला सिद्धान्त मांडताना समकालीन कोणते आधार तपासले किंवा कोणत्या आधारांचं परिशीलन केलं असे प्रश्न अभ्यासक-संशोधक यांच्याकडून उपस्थित होत राहिले. त्यातून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प आकारास आला.

त्यासाठी डार्विननं तयार केलेली सूची हा एक आधार असला तरी डार्विनची पत्नी एम्मा हिनं केलेल्या पत्रव्यवहाराचे तीस खंड, एम्मानं लिहिलेल्या रोजनिशी, डार्विननं काढलेली टिपणं इत्यादींचा आधार घेण्यात आला. वेगवेगळ्या लिलावांचा धांडोळा घेण्यात आला. कारण, अशा लिलावांत प्राचीन ग्रंथांची खरेदी-विक्री होते. यातून मिळालेल्या संदर्भांच्या साह्यानं माग घेत वायहे यांची तुकडी एकेका ग्रंथापर्यंत, साहित्यापर्यंत पोहोचत होती आणि अठरा वर्षांच्या अखेरीस हाती आला तो हा खजिना.

डार्विनच्या संग्रहात शास्त्रीय विषयांना वाहिलेले ग्रंथ अथवा संदर्भ असणं स्वाभाविकच. सन १८२६ मध्ये एका जर्मन शोधनिबंधात प्रसिद्ध झालेलं ‘जिवाणूचं पहिलं छायाचित्र’ त्याच्या संग्रहात आहे; तसंच पक्षीतज्ज्ञ जेम्स औदोबन यानं लिहिलेल्या ‘टर्की बझार्ड’ या पक्ष्याच्या सवयींसंबंधी लिहिलेल्या लेखाची प्रत आहे. जंगलातल्या गोरिलांवर संशोधन करणाऱ्या पॉल दुशाल्यू या जीवशास्त्रज्ञानं लिहिलेल्या पुस्तकाचा समावेश आहे. कोलोरॅडो नाकतोडा, श्वानांच्या प्रजाती इत्यादी असंख्य विषयांवरचे ग्रंथ, निबंध, पत्रकं डार्विनच्या संग्रहात असल्याचं आता प्रकाशात आलं आहे.

यातला लोभसवाणा भाग हा की, केवळ वैज्ञानिक विषयांना वाहिलेलेच ग्रंथ त्याच्या संग्रहात होते असं नाही. ऑलिव्हर गोल्डस्मिथ लिखित ‘हिस्ट्री ऑफ इंग्लंड’ होतं...विविध कलाकुसरींची छायाचित्रं असणारे १८७२ मधलं एक कॉफी टेबल बुक होतं...भूगोलावरचं पुस्तक होतं, तसंच जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, धर्म, शेती, कला, इतिहास, पर्यटन अशा विविध विषयांचे ग्रंथ त्यानं आपल्या संग्रही ठेवले होते. यांतले अर्धेअधिक इंग्लिश भाषेतले असले तरी फ्रेंच, इटालियन, जर्मन, स्पॅनिश, डच इत्यादी भाषांमधलेही ग्रंथ आणि निबंध डार्विनच्या संग्रहात होते असं आढळलं आहे. हे सगळं अचंबित करणारं आहे.

७३ वर्षांचं आयुष्य लाभलेला डार्विन हा अफाट वाचणारा होता, हे यातून स्पष्ट होतंच; पण महान सिद्धान्त मांडणाऱ्या या संशोधकाला किती निरनिराळ्या विषयांमध्ये रुची आणि गती होती हेही कळून येतं. तो केवळ आपल्या संशोधनात व्यग्र होता असं नव्हे तर, देशोदेशीचे समकालीन संशोधक करत असलेलं संशोधन जाणून घेण्याची त्याला जिज्ञासा होती याचाही प्रत्यय येतो. यापलीकडे जाऊन जाणवते ती डार्विनची ज्ञानलालसा.

आता हा सर्व ग्रंथसंग्रह सर्वांसाठी उपलब्ध झाला असल्यानं डार्विननं मांडलेल्या सिद्धान्ताकडं नव्यानं पाहता येईलच; पण व्यक्ती म्हणून डार्विन किती प्रगल्भ होता याचाही वेध अभ्यासकांना घेता येईल. वायहे आणि त्यांच्या चमूनं केलेलं हे काम केवळ ऐतिहासिक आहे. असा थक्क करणारा ग्रंथसंग्रह करणारा डार्विन एकटाच होता असंही नव्हे, तर लेनिनच्या मृत्युसमयी त्याच्या संग्रहात नऊ हजार ग्रंथ होते. नेपोलियननं आपला ग्रंथसंग्रह सांभाळण्यासाठी एक ग्रंथपाल नेमला होता.

‘तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी

बाब कोणती,’ असा प्रश्न विचारला चार्ल्स द गॉलला एकदा विचारण्यात आला होता तेव्हा ‘तू किती मेंढरं फस्त केलीस असं तुम्ही सिंहाला विचारता का?’ असा प्रतिप्रश्न त्यानं केला होता. तो अखंड वाचत असे असा त्या प्रतिप्रश्नाचा अर्थ. स्टॅलिन हा हुकूमशाह म्हणून ओळखला जातो; मात्र तोही अफाट वाचणारा होता.

त्याच्या संग्रहात वीस हजार ग्रंथ होते. त्यावर त्यानं केलेल्या खुणा, टिप्पणी आहेत. त्यानं ती पुस्तकं वाचली होती त्याचाच हा पुरावा! ‘स्टॅलिन्स लायब्ररी’ या पुस्तकाच्या लेखकानं म्हटले आहे की ‘यातून कदाचित स्टॅलिनच्या मनात डोकावणं शक्य होणार नाही; परंतु त्याच्या चष्म्यातून जगाकडं पाहण्याची संधी आपल्याला अवश्य मिळेल.’ डार्विनलाही आता हे लागू होईल.

श्रेष्ठत्वाला पोचलेल्या व्यक्ती अफाट वाचन करतात हा संस्कार त्या समाजांत वाचनसंस्कृती विकसित करण्यास प्रेरणा देत असतो, हा यातील ठळक विशेष. ‘मरावे परी ग्रंथसंग्रहरूपे उरावे’ अशी उक्ती लागू होणाऱ्यांच्या मांदियाळीत आता डार्विनचादेखील समावेश झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com