पत्नी 'केस' करेल अशी भीती वाटते?

ॲड. मनीषा गवळी
Sunday, 11 August 2019

पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत
पत्नी केस करेल, अशी भीती वाटते
मूल दत्तक घ्यायचे आहे

पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत
माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. आमच्या दोघांच्या नोकरीच्या अनिश्‍चित वेळांमुळे तसेच मी मुलांच्या संगोपनात गुंतल्यामुळे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यावरून आमच्यात मतभेद होऊन दुरावा निर्माण झाला आहे. माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा मला संशय आहे. नवीन आलेल्या कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध हा गुन्हा होत नाही, अशी माहिती माझ्या एका मैत्रिणीने मला दिली. त्यामुळे मला प्रचंड मानसिक ताण आला आहे. हा कायदा मला जाणून घेण्याची इच्छा आहे. 
- विवाहबाह्य संबंध हा सध्या चर्चेत येणारा विषय आहे. वाढलेल्या गरजा, त्यासाठी लागणारा पैसा, पती-पत्नी दोघेही नोकरदार असणे, त्यातून आलेली व्यग्रता यामुळे पती-पत्नी आपल्या नात्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यातून संवाद कमी होऊन त्याचा नातेसंबंधावर परिणाम होतो. बऱ्याचदा आपला जोडीदार आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असे वाटल्याने अवाजवी संशय निर्माण होतो. त्यातून किरकोळ वादाला गंभीर स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन शांतपणे संवाद साधा. एकमेकांना वेळ कसा देता येईल, याचे नियोजन करा. वेळप्रसंगी जवळच्या अनुभवी व्यक्तींची अथवा समुपदेशकाची मदत घ्या. एकमेकांशी चर्चा करून गैरसमज दूर झाल्याने नाती सुदृढ व सुरळीत होतात. कायद्याची मदत हा पती-पत्नीच्या नात्यातील शेवटचा पर्याय असतो. विवाहबाह्य संबंध हा फौजदारी गुन्हा होत नाही. मात्र, क्रूरतेच्या कारणाखाली घटस्फोटाचा अर्ज करता येऊ शकतो, ही त्याची कायदेशीर बाजू आहे.

पत्नी केस करेल, अशी भीती वाटते
माझे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. लग्नानंतर एक वर्ष पत्नी सोबत राहिली. पण, ती संसारात रमलीच नाही. लग्नानंतरच्या तिच्या अवास्तव अपेक्षा व मागण्या मी पूर्ण शकत नसल्याने आमच्यामध्ये अधूनमधून भांडणे होऊ लागली. नंतर ती माहेरी गेली. अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपयोग झाला नाही. तिने कलम ४९८ अ अथवा महिलांसाठी असलेल्या इतर कायद्याखाली तक्रार केल्यास काय होईल, याची भीती वाटते. कारण महिलांकडून कायद्याचा गैरवापर होत असल्याचे ऐकून आहे. 
- ४९८ अ च्या दुरुपयोगाबद्दल बरेच बोलले जाते. परंतु, सर्रासपणे त्याचा गैरवापर होतो, असे म्हणता येत नाही. तुमचा प्रश्‍न नातेसंबंधातील तणावाचा आहे. त्याला स्त्री विरुद्ध पुरुष असे बघू नये. आपल्या समाजातील लिंगभाव जसा महिलांसाठी अन्यायकारक आहे, तसा तो पुरुषांवर अन्याय करणारा आहे. समाजात पुरुषांकडून खूप अपेक्षा केल्या जात असल्याने पुरुषांवर ताण येतो. पती-पत्नीचे सहजीवन हे आदर, विश्‍वासावर उभे राहायला हवे. बऱ्याचदा संवादाचा अभाव, गैरसमज यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. पत्नीशी समुपदेशक वा कोणत्या संस्थेमार्फत बोलायचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? नसेल तर एकदा तसा प्रयत्न करून पाहा. अनुभवी लोकांशी बोला. नारी समता मंच ही संस्था अनेक वर्षे पुण्यात काम करत आहे. या संस्थेत पुरुष संवाद केंद्र आहे. त्यांचा नंबर ०२०-२४४९४६५२ असा आहे. तेथील समुपदेशकांना तुमचा प्रश्‍न मोकळेपणाने सांगा. तुम्हाला वाटणारी भीतीही सांगा. यातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल.

मूल दत्तक घ्यायचे आहे
माझे वय ३९ असून, माझ्या पत्नीचे वय ३७ आहे. आमच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. खूप वैद्यकीय उपचार करूनही आम्हाला मूलबाळ झाले नाही. त्यामुळे माझी पत्नी खूप तणावाखाली असते. आम्हाला मूल व्हावे, अशी आम्हा दोघांचीही इच्छा आहे. मूल दत्तक घेण्याचा आम्ही विचार करत आहोत. घरचे तयार होतील का याबाबतही शंका आहे. मूल कुठून आणि कसे दत्तक घेता येईल, याबाबत मात्र आम्हाला फारशी माहिती नाही. शिवाय मूल दत्तक घेतलेच तर भविष्यात त्याच्या मूळ पालकांकडून अथवा इतर कोणत्याही कायदेशीर अडचणी तर येणार नाहीत ना, अशी भीती वाटते. यावर सल्ला मिळेल का?
- तुम्ही मूल दत्तक घेण्याचे ठरवत आहात हा खूपच चांगला सकारात्मक व कौतुकास्पद विचार आहे. पुरुषांपेक्षा महिलांना मूल होत नसल्याने आपल्या रुढीवादी समाजात बऱ्याच अवहेलना आणि प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. हे तुमच्या पत्नीचे तणावाचे कारण असू शकते. असे अनेक पालक आहेत की जे काही कारणास्तव आईवडील बनू शकत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला अशीही मुले आहेत जी निराधार आहेत. अशा मुलांना आधार देणे किंवा त्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेणे, हे वैयक्तिक आनंदाबरोबरच सामाजिक कर्तव्याचाही भाग आहे. परंतु, मूल दत्तक घेणे ही फार मोठी जबाबदारी असते. दत्तक मूल तुमच्या घरी आल्यावर ते तुमच्या कुटुंबाचाही भाग बनते. त्या दृष्टीने तुम्ही सर्वप्रथम तुमच्या घरातील, मित्र, नातेवाईक यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करा. त्यातूनच ते मूल तुमच्या कुटुंबात सहजपणे रुळेल. भविष्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींबाबत भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, केंद्र सरकारने मूल दत्तक देण्याच्या व घेण्याच्या प्रक्रियेचे केंद्रीकरण केले आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘कारा’ ही संस्था स्थापन केली आहे. तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर दत्तक प्रक्रियेची संपूर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन मिळेल. ‘कारा’मार्फत मूल दत्तक घेतल्यास तुम्हाला भविष्यात कायदेशीर अथवा अन्य कोणत्याही अडचणी येणार नाहीत. (संकेतस्थळ ः www.cara.nic.in) आवश्‍यकता वाटल्यास तुम्ही कायदेतज्ज्ञांची मदत घेऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband extramarital affairs