मला काही सांगायचंय

I want to say something
I want to say something

‘मॅडम, माझी यातून सुटका करून द्या. तिच्यासोबत राहणं मला अगदीच अशक्‍य झालंय. माझी व्यथा मी कोणालाही सांगू शकत नाही. मित्रांना सांगावं तर माझं हसं होतं. याला साधी बायको सांभाळता येत नाही म्हणून ते माझी खिल्ली उडवतात. नातेवाइकांशी बोलावं तर आपल्याच घराची इज्जत बाहेर टांगल्यासारखं होतंय. माझ्या सख्ख्या आई-वडिलांना मी माझ्या घरी आणू शकत नाही. त्यांना या वयात एकटं राहावं लागतंय. एकुलता एक मुलगा असून त्यांना निपुत्रिक केलंय मी. त्यांच्याजवळ मी माझं दुःख कसं सांगणार? एक पुरुष असल्यामुळे मला रडताही येत नाही. दोन मुलं आहेत.

मला त्यांना सोडून जाताही येत नाही. नाहीतर घर सोडून कुठेतरी निघून गेलो असतो. घटस्फोट घेतला तर मुलांचे हाल होणार. ती मला घटस्फोटही देणार नाही आणि सुखानं जगूही देणार नाही. मी आता करू तरी काय?’’ 
समुपदेशनासाठी आलेला एक हतबल तरुण माझ्याशी बोलत होता. ही व्यथा या एकट्या तरुणाची नाही, तर अनेक पुरुषांची आहे. ‘‘अन्याय फक्त बायकांवरच होत नाही, पुरुषांवरही होत असतो. पण हे कोणी समजूनच घेत नाही’’, असे अनेकजण येऊन सांगतात. 

वर्षानुवर्षे स्त्रियांवर अन्याय होत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री जातीलाच नमतं घ्यावं लागतं, हे आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत. स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक कायदेही करण्यात आले आणि स्त्रीला सन्मानाने जगण्याच हक्कही देण्यात आला. त्याची गरजही होती आणि अजूनही काही ठिकाणी स्त्रियांचा अतोनात छळ होत असून बदलत्या कायद्यांचा स्त्रियांना आधारही मिळाला आहे. परंतु, बदलत्या जीवनशैलीत काही पुरुषांवरही अन्याय होत आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. 

पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया शिकत आहेत. करिअरिस्ट होत आहेत. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकालाच हवं आहे. समानतेचा आग्रह धरून प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराला वेठीस आणणाऱ्या अनेक स्त्रिया स्त्री स्वातंत्र्याचा अवडंबर करतात. कोणत्या बाबतीत कोणी कोणाला प्राधान्य द्यायचं हे न ठरवता केवळ स्त्री पुरुष समानता म्हणून पुरुषाला वेठीस आणण्याचे प्रकार सर्रास घडतात. बऱ्याच वेळा स्त्रियांच्या मनात काही पूर्वग्रह असतात. पुरुष फक्त स्वतःपुरतं पाहतात, आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाकडे लक्षच देत नाहीत. पुरुषांना करिअरशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नसतं. त्यांच्या आयुष्यात एखादी मैत्रिण आलीच तर ती संसार उद्ध्वस्त करेल आदी कारणांमुळे आपल्या जोडीदाराचा स्वभाव न ओळखता सर्वांना एकाच मापात तोलून त्याच्यावर सतत आरोप केले जातात. संशय घेतले जातात. त्यामुळे त्या पुरुषाने कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून काहीतरी गैरअर्थ काढून त्याला मानसिक त्रास देणे सुरूच राहते. बदलत्या जीवनशैलीत पुरुषांचाही छळ झालेली उदाहरणे समोर येतात.

सासरच्या लोकांचा संसारातील हस्तक्षेप, कायद्याची भीती दाखवणे, अपमानास्पद वागणूक, संशय घेणे, विनाकारण पत्नी माहेरी निघून जाणे, शारीरिक संबंधास नकार देणे अशा अनेक पुरुषांच्या तक्रारी असतात. अनेक जण संसार मोडू नये म्हणून मुकाटपणे सहन करतात. पुरुषांना आपले मन मोकळे करता येत नाही आणि स्त्रियाप्रमाणे अश्रूही ढाळता येत नाहीत.

तक्रार करायला गेलं तर बऱ्याच वेळा तक्रारीची दखलही घेतली जात नाही. कुटूंबातून आणि समाजातून अनेक अपेक्षा पुरुषांकडून केल्या जातात आणि या अपेक्षांचा ताण असह्य होऊन अनेक पुरुष नैराश्‍येमध्ये जातात. घरासाठी सुखसोयींची तरतूद करणे, अर्थाजन करणे, घरातील सर्वांची मर्जी राखणे, घरातील कर्ता म्हणून सर्व जबाबदारी पार पाडणे हे सर्व पुरुषाला करावे लागते. अनेक स्पर्धांना त्याला सामोरे जावे लागते. कुटुंबामध्ये होणाऱ्या कलहामध्ये पुरुष अधिक होरपळला जातो. सासू, सुनांच्या वादात तोच वाईट होतो. 

लग्नाअगोदर प्रत्येक लहान गोष्टीत आईवर अवलंबून असणारा मुलगा लग्न झाल्यानंतर बायकोच्या तंत्राने वागायला लागला तर तो आईच्या दृष्टीने ‘बायल्या’ होतो. लग्न झाल्यानंतरही आईला प्राधान्य देणारा ‘ममाज बॉय’ म्हणून चेष्टेचा विषय होतो. ‘बायकोची किंमत नाही तर आईबरोबरच संसार कर’, इतक्‍या टोकापर्यंत बायका नवऱ्याला हिणवतात. त्याच्यावर आरोप करतात. त्या बिचाऱ्याला कळतच नाही कुणाशी कसं वागायचं. त्याला आईही हवी असते आणि पत्नीचीही साथ हवी असते. पण हे विळ्या भोपळ्याच गणित सोडवताना तोच पेचात पडतो. समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी नाही, हे अनेक स्त्रियांच्या अजूनही पचनी पडलेलं नाही. त्यामुळे सर्वांना एकाच तराजूत तोलून पुरुष हाच अन्याय करणारा असा समज स्त्रियांच्या मनातून जातच नाही.  कायदा समाजात सुव्यवस्था आणण्यासाठी आहे. परंतु काही ठिकाणी त्याचा गैरवापरही केलेला दिसून येतो. 

मध्यंतरी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त वर्तमानपत्रात वाचले. एका विवाहीत महिलेने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या तणावाखाली त्याने मरण स्वीकारले आणि, ‘तिच मला ब्लॅकमेल करीत होती. परंतु कायदा बायकांच्या बाजूने असल्याने माझं कोणी ऐकून घेतले नाही’, असं त्यानं लिहून ठेवलं होतं. अनेक वेळा पती पत्नीचा वाद पोलिस चौकीत गेल्यानंतर ‘‘आमचं ऐकून घेतलं जात नाही’, अशी पुरुषांची तक्रार असते. भारतीय दंड विधान ३०४ ब आणि ४९८ अ या कायद्यान्वये पुरुषाला आणि त्याच्या कुटुंबीयांना वेठीस धरण्याचे अनेक प्रकार घडले. म्हणूनच जुलै २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्देशानुसार हुंडा घेतल्याचे किंवा मागितल्याचे आरोप आहेत अशा ठिकाणी तक्रारीतील तथ्य तपासून आरोपांची नीट पडताळणी झाल्याशिवाय अटक करू नये अशी तरतूद झाली. न्यायव्यवस्था अशा गोष्टींकडे नक्कीच लक्ष पुरवत आहे. 

सामाजिक स्वास्थ्यासाठी स्त्री-पुरुषांमध्ये समन्वय साधणे पुरुषांनाही ‘तुम्ही शोषक आहात’ असे लेबल न लावता त्यांचीही बाजू समजावून घेणे गरजेचे आहे. यासाठीच १९ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक पुरुष दिन’ म्हणून साजरा केला जातो. फक्त तो व्यापक दृष्टीने व्हायला हवा. पुरुषांवरील ताणतणाव कमी व्हावा त्यालाही मोकळं होण्यासाठी व्यासपीठ असावं, त्याच्या प्रश्‍नांवर विचार केला जावा हे स्वागतार्ह आहे. परंतु, त्यामध्ये स्त्री द्वेष नसावा. स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकमेकांचा आदर करून अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी सर्वसमावेशक विचार करणे जरुरीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com