फायरब्रँड कलेक्‍टर बी. चंद्रकला

फायरब्रँड कलेक्‍टर बी. चंद्रकला

चंद्रकला यांचा जीवनपट खरंच आश्‍चर्यकारक आहे. करिमनगर जिल्ह्यातील (तेलंगणा राज्य) गर्जना पल्ली हे त्यांचं गाव. या गावात लंबाडी (बंजारा) समाजातील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. राज्यात लंबाडींची लोकसंख्या वीस लाखाच्या घरात आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण करिमनगरमध्ये झाले. पदवीपूर्ण होण्यापूर्वी त्यांचा विवाह ए. रामूल्ला यांच्याशी झाला. पती श्रीराम सागर प्रोजेक्‍टवर कार्यकारी अभियंता आहेत. त्यांना किर्ती मीना ही मुलगी आहे. मुलगी झाल्यानंतर एकदोन वर्षांनी पत्नीने पदवीचे शिक्षण पूर्ण करावे असे पतीला वाटत होते. पुढे उस्मानिया विद्यापिठातून पदवी आणि अर्थशास्त्रातच एमए केले. 

आता पुढे काय असा जेंव्हा प्रश्‍न आला तेंव्हा रामूला यांनी त्यांना "यूपीएससी'ची तयारी कर असा सल्ला दिला. "यूपीएससी'चे शिवधनुष्य आपणास पेलणार नाही असे त्यांना वाटत होते. मात्र पतीचा भक्कम आधार मिळाल्याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले. नवऱ्याची नोकरी, मुलीचे संगोपन. संसार ही तारेवरची कसरत करतानाच यूपीएससीचा रात्रदिवस अभ्यास हेच लक्ष्य केले. सलग तीन वेळा परीक्षा दिल्यानंतरही यश मिळाले नाही. आपले कलेक्‍टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत अशी मनाची ठाम समजूत झाली. पण, पतीने पुन्हा समजूत काढली. आणखी एक संधी घेऊन बघ ! असा सल्ला दिला. आश्‍चर्य म्हणजे चौथ्यावेळेस त्यांनी यश खेचून आणले . 2008 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटच ठरले. एका बंजारा समाजातील मुलीचे कलेक्‍टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्ष वास्तवात उतरले. 

पहिली पोस्टींग बुलंदशहर 
कलेक्‍टरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली पोस्टींग उपजिल्हाधिकारी म्हणून बुलंदशहर (उत्तरप्रदेश) मिळाले. अधिकारी म्हणून त्यांनी जेंव्हा कामकाजास सुरवात केली तेंव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. एखाद्या कलेक्‍टरने जर ठरविले तर तो काय करू शकतो हे त्यांनी आपल्या अधिकारात दाखवून दिले. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचतात की नाही याची दक्षता चंद्रकला नेहमीच घेत आल्या आणि हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ठ्य आहे. 

त्या नेहमीच लोकांचा आवाज बनल्या. त्या मेरट आणि उत्तर बैजोरेच्या न्यायदंडाधिकारी होत्या. त्यांचे राजकारण्यांशी फारसे कधी जमले नाही. त्यामुळे त्यांचे बदलीशी तर खुपच जवळचे नाते. बदलीला कधीही न घाबरणाऱ्या कलेक्‍टर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. ज्या ठिकाणी जातात तेथे आपल्या कामाचा ठसा उमठवितात. तत्वाशी तोडजोड कदापी करीत नाहीत. मग कोणी किती का मोठा नेता असो. चंद्रकला कलेक्‍टर म्हणून उत्तरप्रदेश सारख्या राज्यात खूपच गाजल्या. कोणाच्या धमकीला आणि राजकीय दबावाला बळी न पडणाऱ्या या कलेक्‍टरबाईंनी भ्रष्ट टेकेदारांना धडा शिकविला. अधिकाऱ्यांवरही जरब बसविली. 

चंद्रकला यांचा बुलंदशहरमधील एक व्हिडिओ आहे. एका शाळेचे बांधकाम सुरू असताना त्या अचानक पाहणी करण्यासाठी गेल्या. तेंव्हा त्यांना विटा कच्च्या आणि तुटलेल्या दिसल्या. बांधकामाचे साहित्यही निकृष्ठ असल्याचे आढळले. हा सर्व प्रकार पाहताच त्या इतक्‍या संतापल्या, की त्या कंत्राटदाराला घाम फुटला होता. या कामाच्या चौकशीचे आदेश देतानाच चोवीस तासात दर्जेदार साहित्याचा वापर करून बांधकाम सुरू करण्याचे फर्मान बजावले होते. जर चूक केली तर काळ्या यादीत टाकण्याबरोबरच तुरूंगात जावे लागेल ही धमकी दिली. 

शिक्षणाविषयी जिव्हाळा 
शिक्षण हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मुला-मुलींना शिक्षकांनी उत्तम ज्ञानदान करावे. कष्ट घ्यावेत. गोरगरीबांच्या आणि वंचित समाजातील मुला-मुलींनी उत्तम शिक्षण घेतानाच ते मोठ्या पदावर पोचले पाहिजेत. यासाठी त्या नेहमीच आग्रही असतात. सरकारी शाळेला अचानक भेट देऊन मुलांना कशाप्रकारे शिकविले जाते याचा अनुभव घेतात. वेळात वेळ काढून अचानक एखाद्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. मुलांना प्रश्‍न करतात. त्यांना उत्तरे देता आली नाही की शिक्षकांना फैलावर घेतात. शिक्षण आणि कठोर परिश्रम घेतल्यास कोणत्याही माणसाचे आयुष्य बदलू शकते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. 

जे शाळेचे तेच प्रत्येक सरकारी खात्याचे. मॅडम, कधी आपल्या कार्यालयात येतील हे सांगता येत नसल्याने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते. लोकांचे प्रश्‍न सोडविताना त्यांना कोणताही त्रास देऊ नका. गरिबांना नाडू नका. त्यांना मदत करा हा आदेश असतो. मग हा आदेश मोडण्याची हिम्मत अधिकारी दाखवूच शकत नाही. रोडरोमिओंना तर त्यांनी अनेकवेळा धडा शिकविला. एका तरूणांने त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला थेट तुरूंगातच धाडले होते. अशा एक ना अनेक घटना. भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तर त्या कर्दनकाळ बनल्या. 

आमदार, मंत्री जर चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर त्यांनाही खडे बोल सुनावण्यास त्या मागेपुढे पाहत नाहीत. एक प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख असली तरी दुसरीकडे त्या गोरगरीबांच्या कैवारीही आहेत. आदिवासींची लहान मुले असोत की गावखेड्यातील मुली त्यांच्या मदतीसाठी या कलेक्‍टरबाईंचा हात पुढे असतो. तेलंगणासारख्या राज्यातील एका भटक्‍याविमुक्त समाजातील एक मुलगी, गरीबीचे चटके सहन करतानाच मेहनतीने भारताच्या स्वच्छ अभिमानाच्या संचालक बनल्या. या अधिकाऱ्याची कहाणी मात्र इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. 

तसेच सोशल मिडिया कसा हाताळायचा आणि प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे याची कलाही त्यांना चांगलीच अवघत असल्याने त्यांचा चंद्रकला फॅन क्‍लब चांगलाच गाजला आहे. या फॅनक्‍लबवर दररोज शुभेच्छांचा पाऊस पडत असतो. 

 पंतप्रधानांकडून गौरव 
बी. चंद्रकला यांची नुकतीच दिल्लीत बदली झाली आहे. कोणी म्हणते की त्यांना ही शिक्षा आहे. उत्तरप्रदेशातील भाजपचे वादग्रस्त नेते साक्षीमहाराज आणि संगीत सोम यांनाही त्यांनी वटणीवर आणल्याचे बोलले जाते. हे दोन्ही नेतेही त्यांच्याविरोधात होते. पण, वास्तव असे आहे की बुलंदशहर आणि मेरठमध्ये त्यांनी यशस्वीपणे राबविलेल्या स्वच्छता मोहीमेची देशभर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत मिशन हे स्वप्न आहे. हे मिशन यशस्वी होण्यासाठी ते प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या शोधात होते. बुलंदशहर आणि मेरठविषयीची माहिती त्यांच्या कानावर पडली होती. या शहरासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन चंद्रकला यांची मार्च 2017 मध्ये स्वच्छ भारत मिशनच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ही शिक्षा नसून गौरवच झाला असे म्हणावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com